तुम्हाला बिटकॉईन करन्सी बद्दल माहीत असेलच. बिटकॉईन ही एक क्रिप्टो करन्सी आहे. ज्याच्यामाध्यमातून तुम्ही बरेच व्यवहार करू शकता. आता या करन्सीमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची की नाही, ती करणे योग्य की अयोग्य? या प्रश्नांच्या खोलात न जाता तुम्हाला आम्ही बिटकॉईनचाच भाऊबंध असलेल्या NFT बद्दल सांगणार आहोत.
२०१५ साली वायरल झालेलं हे मीम NFT च्या माध्यमातून तब्बल ३८ लाखांना विकले गेले. पाकिस्तानी मुहम्मद आसिफ रज़ा राना आणि त्याचा मित्र मुदस्सिर या दोघांचं हे मिम होते. या तुटलेल्या मैत्रीवरच्या मीमने सर्वांना हसविले होते. आता तुम्हीच पहा ३८ लाखांचं हे मीम.
आता निश्चीतच तुम्हाला NFT बद्दल जाणून घ्यायचं असेल. NFT म्हणजेच ‘Non Fungible Token’. हे टोकन बिटकॉईनसारखेच डिजीटल टोकन असून ते ब्लॉकचेन सिध्दांतावर काम करते. म्हणजेच ब्लॉकचेन वरचा डिजिटल संपत्तीचा डेटा.
आता तुम्हाला डिजीटल जगातली एखादी कलाकृती आवडली, म्हणजे एखादं पेंटिंग, गेम, म्युझिक अल्बम, कार्डस् किंवा मिम काहीही तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला वाटलं हे फक्त मला हवं आहे किंवा विकत घ्यायचं आहे तर तुम्ही NFTच्या माध्यमातून ते विकत घेऊ शकता . म्हणजे एखादा कलाकार डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याची कला विकू शकतो आणि विकत घेणारा ग्राहकही कालांतराने घेतलेली कलाकृती मार्केट रेट आणि मागणी नुसार परत विकू शकतो. या डिजिटल संपत्तीची क्रिप्टो करंसीच्या माध्यमातूनच खरेदी विक्री होऊ शकते. कारण त्यांचे एन्क्रिप्शन हे या करंसीच्या सॉफ्टवेअर सारखेच असते.
आता तुम्ही म्हणाल इंटरनेटवर सगळं फुकट मिळत असताना आपण कशाला पैसे घालवून आभासी जगातल्या गोष्टी खरेदी करायच्या? पण NFT युनिक असते. म्हणजेच तुम्ही खरेदी केलेल्या कलाकृतीवर तुम्हाला युनिक आयडी कोड दिला जातो. त्यामुळे त्या कलाकृतीचे हक्क केवळ तुमच्याकडेच राहतात आणि तुम्ही एकमेव त्याचे मालक राहता. तुम्ही कलाकृती खरेदी केल्यावर ब्लॉकचेन टेक्नोलॉजीतर्फे त्याचे प्रमाणपत्रही दिले जाते.
तुम्ही एखादा फोटो किंवा डिजीटल आर्ट किंवा एखादा व्हीडिओ बनवून ब्लॉकचेनवर अपलोड करुन त्याबदल्यात टोकन घेऊ शकता. एखादी फाईल जशी तुम्ही अपलोड कराल तसा लागलीच तुमचा युनिक टोकन आयडी जनरेट होतो. हा आयडी तुमच्या अपलोड केलेल्या आर्टसाठी असतो. ते आर्ट कोणाला विकत घ्यायचे असल्यास त्याचा खरा मालक कोण याबाबत माहिती त्या युनिक कोडवरुन ग्राहकांपर्यंत पोहचते. त्यानंतर त्या फाईलची कितीही वेळा खरेदी विक्री झाली तरी फाईलच्या मेन ओनर विषयी म्हणजेच मुख्य मालकाची माहिती कायम उपलब्ध राहील, यालाच NFT म्हणजेच Non Fungible Token असे म्हणतात.
वर जे मीमचं उदाहरण दिलं ना तसंच एक ट्विटचं उदाहरण आहे बरं. म्हणजे तुम्ही तुमचं ट्विटही NFT करू शकता. ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांचे पहिले ट्विट तब्बल २० कोटींना विकले गेले. २१ मार्च २००६चं हे ट्विट २२ मार्च २०२१ ला विकलं गेलं.
करड्या रंगाच्या दगडाचं पेटिंग कितीला विकलं गेलं माहितीए? तब्बत ७५ लाखांना… एकूणच काय तर डिजीटल संपत्ती वाढवायचा लोकांचा हा सध्या ट्रेंडच आलायं. बर तुम्हाला म्हणून सांगते हे खूळ आत्ताचे नाही बरं. २०१४ पासून NFT अस्तित्वात आहे. मात्र आत्ता चर्चेत आलं आहे इतकंच.
तर काय मग मित्र-मैत्रिणींनो….चला तर मग तुमच्या कल्पकतेला जरा डिजिटल प्लॅटफॉर्मची हवा लागू द्या… काय माहीत तुम्हीही एका रात्रीत मालामाल व्हाल आणि मवालीवर तुमची स्टोरी असेल….
0 Comments