जगातील एक अशी रहस्यमयी जागा जिथे दगड स्वत:हून चालतात!

१९४०च्या सुमारास काही शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं. मात्र त्यावेळी त्यापैकी कोणीच दगडांना सरकताना नाही पाहिलं.


या जगात आपण विचारच करु शकत नाही इतक्या अद्भूत गोष्टी दडलेल्या आहे. सुंदर अशा निर्सगाने नटलेल्या या सृष्टीत, निसर्गाची अनेक रहस्ये सुद्धा दडली आहेत. चंद्र- मंगळापर्यंत झेप घेतलेल्या माणसाला अजून त्याच्याच मातीतली अनेक रहस्य उलगडली नाहीत. तुम्हीही अशा रहस्यांबाबत अनेकदा वाचलं असेल, ऐकलं असेल, काहींनी पाहिलंही असेल. त्यानंतर तुम्हाला जाणवलं असेलच की, आपल्या कल्पनेपलिकडलं विश्व दडलं आहे या पृथ्वीतलावर.

आज तुम्हाला अशाच एका कल्पनेपल्याडच्या रहस्यमय विश्वात घेऊन जाणार आहोत. तर तयार आहात ना? कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये जायला? घाबरु नका राव! ही तर फक्त शब्दांचीच सफर आहे. पण वाचल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षात तिथे जाऊन सफर करायला आवडेल हे नक्की.

Source: booking.com

कॅलिफोर्नियाच्या पूर्वेला ही डेजर्ट व्हॅली आहे. तिला डेथ व्हॅली असही म्हणतात. खरंतर स्पष्ट मराठीत सांगायचं झालं तर डेजर्ट व्हॅली म्हणजेच वाळवंटातली दरी.

उन्हाळ्यात इथे जगातील सर्वाधिक उष्ण आणि कोरडे तापमान असते. या वाळवंटाच्या नावावरुनच डेथ व्हॅलीचे एक राष्ट्रीय उद्यान सुद्धा उभारण्यात आले आहे. ही जागा तिथल्या गुढ गोष्टींमुळे जगभरात प्रसिध्द आहे. तुम्हाला माहीत आहे का, इथे असणारे मोठ्ठाले दगड..दगड कसले खडकच, ते आपोआप एका जागेवरुन दुसऱ्या जागी सरकत पुढे जातात. खरंच… म्हणूनच या जागेला रेसट्रॅक प्लाया (Racetrack Playa)म्हणूनही ओळखतात.

तुम्ही म्हणाल वाळवंटी भाग आहे. जोरदार वारं आलं की लहानसहान खडी इकडची तिकडे होत असेल त्यात काय येवढं? तर तसं नाहीये बरं. तुम्ही इथे दिलेला फोटोच पहा ना. (उगाच शंका घेऊ नका तो फोटो फोटोशॉप नाहीये.) तर या फोटोमध्ये दिसणाऱ्या दगडांचे वजन सुमारे ३२० किलोच्या आसपास आहे. मात्र इतके अवजड दगड इथे रांगत असल्यासारखे सरकतात हो… म्हणूनच या दगडांना सेलिंग स्टोन्स म्हणतात.

आता तुम्हाला वाटेल की चला जाऊन पाहूया हे रांगणारे दगड. तुम्ही तिकडे गेलात तर तुम्हाला ते दगड नक्कीच दिसतील. पण ते आपल्याला रांगताना दिसत नाहीत बरं. पण, ते सरकल्याचे निशाण तुम्हाला उमटलेले दिसतील. बरं इथे कोणाला हौस आली म्हणून ३०० ते ३५० किलो दगड सरकवत बसले आहेत असही नाही. ते तितकं सहज शक्यही नाही. मग हे दगड सरकतात कसे आणि कधी?

असं म्हटलं जातं की, १९४०च्या सुमारास काही शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं. मात्र त्यावेळी त्यापैकी कोणीच दगडांना सरकताना नाही पाहिलं. काही शास्त्रज्ञांचं म्हणणं पडलं की या वाळवंटाच्या आसपास डोलोमाईट आणि सायनाईट खडकांचे डोंगर आहेत. तिथला डोंगर ढासळून हे दगड या व्हॅलीपर्यंत पोहचतात आणि क्षितिजाच्या दिशेने सरकू लागतात. त्यामुळेच वाळवंटात त्या दगडांच्या सरकण्याचे निशाण जमिनीवर उमटतात.

हे झालं १९४०च्या शास्त्रज्ञांचं म्हणणं. २०१४ साली शास्त्रज्ञांनी परत एकदा आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने संशोधन करण्याचे ठरविले. टाईम-लॅप्स फोटोग्राफीच्या माध्यमातून त्यांनी संशोधन केले आणि त्या कॅमेरात हे दगड सरकताना त्यांना दिसलेही. मग यामागची कारणमिमांसा करण्यासाठी त्यांनी तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला.

या शास्त्रज्ञांच्या मते इथली हवा, बर्फ आणि पाणी यांचा असा काही परफेक्ट बॅलेंस होतो, ज्यामुळे दगड त्यांच्या जागेवरुन हलू लागतात. म्हणजे असं होतं की, पावसाळ्यात इथे पाण्याचं तळं साठतं, तेच तळ हिवाळ्याच्या रात्री गोठतं आणि त्यावर बर्फाची चादर जमा होते. मात्र दुसऱ्या दिवशी सुर्यनारायणाच्या दर्शनाने ही चादर विरघळू लागते. त्यात हवेचा जोरही वाढलेला असतो. त्यामुळेच इथले मोठ्ठाले दगड पुढे सरकू लागतात. एकूणच काय तर ही आहे निसर्गाची किमया. जोपर्यंत ती घडण्यामागचे शास्त्र आपल्याला माहीत नव्हतं तोपर्यंत प्रत्येकाला ही काहीतरी भयंकर आणि गुढ जागा वाटत होती.

निसर्गाच्या अनोख्या खेळामुळे ही जागा खरंच खूप सुंदर दिसते. ज्यांना निसर्ग आवडतो. त्याचे अनेक रंगढंग बघायला अनुभवायला आवडतात. त्या प्रत्येकालाच या डेथ व्हॅलीचा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *