आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तर क्रिकेटच्या बाबतीत भारतीय जास्तच क्रेझी आहेत हे म्हणणं वावगं ठरणार नाही. बरं हे वेड हल्लीचं नाही बरं तर अगदी स्वातंत्र्यापूर्वीचे आहे. त्याचमुळे कुठल्याही क्रिकेट प्रेमींना विजय आनंद गजपति राजू उर्फ विझी बद्दल ठाऊक असेलच. ते खरंतर भारतातल्या सर्वात वाईट कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. मग त्यांना भारतीय संघाचे कर्णधारपद कसे मिळाले? चला आज यामागचीच रंजक कथा जाणून घेऊया.
तर महाराजकुमार ऑफ विजयनगरम अर्थात विजय आनंद गजपति हे विजयनगरमचे राजा पुष्पति विजय रामा गजपति राजू यांचे दुसरे सुपुत्र. त्याचमुळे त्यांना महाराजकुमार ही पदवी मिळाली.
तर या महाराजकुमारांना क्रिकेटची प्रचंड आवड. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राजवाड्यात क्रिकेटचे ग्राऊंड बनविले आणि १९२६ साली विझीने चक्क आपली क्रिकेट टीम बनवली. या टीममध्ये भारतीयांसह परदेशी खेळाडूंचाही समावेश होता. १९३० साली MCC संघाने राजकीय अस्थिरतेचे कारण पुढे करत भारत दौरा करण्यास नकार दिला. या गोष्टीचा फायदा उचलत त्यांनी भारत- श्रीलंका दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्या संघातून जॅक हॉब्स आणि हरबर्ट सटक्लिफ सारखे दिग्गज खेळाडू खेळले.
त्यानंतर १९३२ च्या इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांनी आर्थिक पाठबळ दिले आणि स्वतःला उपकर्णधार म्हणून घोषित केले. मात्र आरोग्याचे कारण पुढे करत त्यांनी संघातून माघार घेतली. असं असलं तरी त्यापुढे इंग्लंड दौऱ्यात कर्णधार म्हणून ते सामिल झाले.
महाराजा उर्फ विझी यांनी पहिल्यांदा २७ जून १९३६ रोजी पहिल्यांदाच भारताचे नेतृत्त्व करत कसोटी सामना खेळला. त्यांच्या कारकिर्दीत भारताकडून फक्त ३ कसोटी सामने खेळले आणि त्या तिन्ही सामन्यात ते भारतीय संघाचे कर्णधार होते. भारताचे पहिले कर्णधार सीके नायडू सुद्धा विझींच्या नेतृत्त्वाखाली तीन कसोटी सामने खेळले.
खरंतर महाराजकुमार विझींनी त्यांच्या अफाट संपत्तीच्या जोरावर भारतीय संघाचे सदस्य होण्याचा मार्ग खुला करुन घेतला होता. त्यामुळेच त्यावेळी क्रिकेटविश्वात त्यांचीच चलती होती. त्यांच्या श्रीमंतीचा फटका हा लाला अमरनाथ, सी.के. नायडू, सय्यद मुश्ताक अली आणि विजय मर्चंड यांनाही बसला.
मॅंचेस्टर कसोटी सामन्यात त्यांनी चक्क मुश्ताक अली यांच्याकडे मर्चंट यांना धावबाद करण्याची गळ घातली होती. मात्र अली आणि मर्चंट यांनी त्या सामन्यात २०३ धावांची विक्रमी सलामी भागिदारी दिली. हे तर काहीच नाही, बाका जालाणींनी एकदा नाश्ता करताना नायडूंची थट्टा केली म्हणून विझींनी त्यांना कसोटी संघात स्थान दिले होते. कहर म्हणजे प्रतिस्पर्धी गोलंदाजाला विझी सोन्याचे घड्याळ लाच म्हणून देत. अपेक्षा इतकीच की गोलंदाजाने चेंडू फुल टॉस किंवा सोपा टाकावा.
तर असे होते आपल्या भारताचे माजी कर्णधार, बी.सी.सी.आय अध्यक्ष महाराजकुमार विझी. क्रिकेटच्या मैदानात त्यांची जादू कधीच चालली नाही. मात्र पैशाच्या जोरावर त्यांनी मैदान गाठलं होतं हे नक्की.
0 Comments