टीव्हीवर एक मुलाखत सुरु होती. त्या मुलाखतीमध्ये आमंत्रित केलेल्या गेस्टला विचारण्यात आले की, “लहानपणी तुझ्याकडे किती गाड्या होत्या?” त्यावर तो गेस्ट म्हणाला, “खूप गाड्या होत्या, पण त्या खेळण्यातल्या होत्या. खरी खुरी एकही गाडी नव्हती.” त्यावर होस्टने अजून एक प्रश्न केला, “आता तुझ्याकडे किती गाड्या आहेत?” त्या गेस्टने अगदी काही सेकंद विचार केला आणि उत्तरला, “नाही माहित.” त्याच्या या उत्तरावर जोरदार हशा पिकला, पण सोबत त्या हसण्यात टाळ्यांचा कडकडाट सुद्धा ऐकू आला.
हाच कडकडाट त्या गेस्टच्या यशाची साक्ष देत होता. त्याच्या “नाही माहित” या उत्तरात एक बेफिकिरी तर दडली होतीच पण ती बेफिकिरी त्याच्या कष्टाची आणि मेहनतीची होती. आज त्या गेस्ट कडे इतक्या गाड्या आहेत की त्याला एकूण गाड्या किती ते आठवत सुद्धा नाहीये. तो गेस्ट म्हणजे आजवरच्या महान फुटबॉलरपैकी एक ख्रिस्तीयानो रोनाल्डो होय.
वडिलांच्या पुण्याईने कधीकाळी अत्यंत गरिबी अनुभवलेला रोनाल्डो आज वर्षाला तब्बल 700 कोटी रुपये कमावतो…हो 700 कोटी आणि हा फक्त अंदाज आहे. दरवर्षी त्याच्या या कमाईमध्ये भर पडतच चालली आहे.
पोर्तुगालच्या साओ पेद्रो बेटावर José Dinis Aveiro आणि Maria Dolores dos Santos Viveiros da Aveiro यांच्या पोटी चौथे अपत्य जन्माला आले आणि त्याचे नाव ख्रिस्ताच्या नावावर ख्रिस्तियानो रोनाल्डो ठेवण्यात आले. खरंतर जन्मापासूनच रोनाल्डोच्या नशिबी लढणे आले होते. जेव्हा त्याच्या आईला ती आता चौथ्या मुलाला जन्म देणार आहे हे कळले तेव्हा तिने गर्भापाताचा निर्णय घेतला होता. त्याला कारण म्हणजे घरी पाचवीला पुजलेली गरिबी! घरातील कर्ता पुरुष अर्थात रोनाल्डोचा बाप हा दारूच्या आहारी गेलेला माणूस आणि कामाच्या नावाने ठणठण गोपाळ! केवळ नावाला एक म्युनिसिपल गार्डनर (आपल्या मराठी भाषेत माळी) म्हणून त्याच्याकडे नोकरी होती. दुर्दैवाने त्यात संपूर्ण घर चालायचं नाही. पण जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू होण्याचं नशीब नियतीने आधीच लिहून ठेवलं होतं, त्यामुळे रोनाल्डोचा जन्म होणं भाग होतंच.
रोनाल्डोचा जन्म सुद्धा त्या देशात झाला ज्या देशात फुटबॉल हा खेळ प्रचंड लोकप्रिय होता. त्यामुळे साहजिकच रोनाल्डोची पावले फुटबॉल कडे वळली. मात्र आपल्याला पुढे जाऊन यातच करियर करायचे आहे हे काही त्याने ठरवले नव्हते. घरात कोणी नियंत्रण ठेवणारे नाही, वस्तीमधली पोरं सुद्धा उडाणटप्पू, अभ्यास केला तर केला नाहीतर मरू दे ही स्थिती, त्यामुळे दिवसभर फुटबॉलच्या मैदानात थिरकरणाऱ्या रोनाल्डोच्या पावलांनी कधी एका प्रोफेशनल प्लेयर प्रमाणे कसब कमवले हे त्याला सुद्धा कळले नाही. त्याचा खेळ अधिक बहरू लागला.
वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी याच खेळाच्या जोरावर त्याला Andorinha फुटबॉल क्लबने साईन केले. पुढे फक्त २ वर्षांत त्याने अशी काही कमाल करून दाखवली की वयाच्या १० व्या वर्षी त्याला पोर्तुगालच्या सर्वात मोठ्या फुटबॉल क्लबने आपला मेंबर बनवून घेतले. रोनाल्डो मात्र प्रांजळपणे एक गोष्ट कबूल करतो की तो आज इथे आहे केवळ आणि केवळ त्याचा अत्यंत जिगरी दोस्त अल्बर्ट मुळे!
दोघे तेव्हा एका क्लब कडून खेळायचे आणि एके दिवशी स्पोर्टिंग लिस्बनचे अधिकारी खेळाडूंची निवड करण्यासाठी आले. त्यांनी सांगितले ज्याच्या नावावर सर्वाधिक गोल्स त्याला आम्ही निवडणार. रोनाल्डोची टीम तो सामना ३-० ने जिंकली. ज्यापैकी एक गोल रोनाल्डोने केला होता आणि एक गोल अल्बर्टने केला होता. तिसरा गोल सुद्धा अल्बर्टच्या नावावर होणार होता पण त्याने ऐन वेळेला बॉल रोनाल्डो कडे पास केला आणि तो गोल रोनाल्डोच्या नावावर जमा झाला. अल्बर्टच्या मते रोनाल्डो मध्ये खूप पोटेन्शीयल होते आणि त्याला ही संधी मिळायलाच हवी होती आणि आज आपण पाहू शकतो की रोनाल्डोने त्या मित्राने दिलेल्या एका संधीचे किती सोने केले आहे. पुढे वयाच्या १२ व्या वर्षी आपल्या कुटुंबाला सोडून रोनाल्डोला पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे जावे लागले. हा काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता कारण जवळची एकही व्यक्ती तिथे त्याच्या सोबत नव्हती. तरी त्याने मेहनत करणे सोडले नाही. पण ३ वर्षांनी अजून एक संकट उभे ठाकले ते म्हणजे हृदय विकाराच्या रुपात!
रोनाल्डोला कित्येक महिने छातीमध्ये त्रास जाणवत होता. उपचारावेळी डॉक्टरांनी रोनाल्डोला यापुढे फुटबॉल न खेळण्याचा सल्ला दिला. रोनाल्डोला अर्थातच हा सल्ला मान्य नव्हता आणि त्याने जीवघेणी हार्ट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. या सर्जरी वेळी जर काहीही उलट सुलट झाले असते तर आज रोनाल्डो नामक व्यक्तीच नसता हे सत्य आहे.
पण नियतीने आधीच त्याचे भविष्य लिहून ठेवले होते. या संकटामधून सुद्धा तो सावरला, पुन्हा उभा राहिला. मात्र एक संकट संपते न संपते तोच दुसरा आघात त्याला झेलावा लागला वडिलांच्या मृत्युच्या रुपामध्ये! दारूचा ओव्हरडोस झाल्याने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. आपले वडील कसेही असले तरी त्यांचा आपल्यावर जीव होता ही गोष्ट रोनाल्डोला माहित होती. तो पुरता कोसळला. वडिलांच्या जाण्याचा आघात त्याच्या मनावर एवढा झाला की फुटबॉल वरून त्याचे लक्ष उडाले. मात्र जवळच्या अन्य व्यक्तींनी त्याला सावरले. रोनाल्डो आज एवढा श्रीमंत आहे पण तो दारूला अजिबात शिवत सुद्धा नाही याचे कारण म्हणजे आपल्या वडिलांची परिस्थिती त्याने पाहिली होती आणि म्हणून आयुष्यात कधीच दारू पिणार नाही अशी जणू शपथ त्याने घेतली होती.
रोनाल्डो एक उत्तम फुटबॉलर म्हणून घडत होता तरी त्याला म्हणावी तशी प्रसिद्धी आणि पैसा मिळत नव्हता. ही उणीव सुद्धा भरून निघाली, जेव्हा केवळ वयाच्या १८ व्या वर्षी त्याला इग्लंडचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडने २००३ साली १७ मिलियन डॉलर मोजून विकत घेतले. इथून सुरु झाला रोनाल्डोचा दैवत होण्याचा प्रवास!
त्याच्या कारकिर्दीत मँचेस्टर युनायटेडने सलग ३ प्रीमियर लीग टायटल्स आणि एक चॅम्पियनशीप टायटल जिंकून कमाल केली. ख्रिस्तियानो रोनाल्डो या नावाला फुटबॉल जगत अक्षरश: पुजू लागले. रोनाल्डो आपल्या क्लब मध्ये यावा म्हणून प्रत्येक क्लब प्रयत्न करू लागला. हवी ती किंमत द्यायला तयार झाला. २००९ साली रियल माद्रिद क्लबला यात यश आले आणि तेव्हा १३२ मिलियन डॉलर मोजून त्यांनी रोनाल्डोला आपल्या क्लब मध्ये घेतले. आजवर कोणत्याच फुटबॉलरला एवढा पैसा मिळाला नव्हता. रोनाल्डो जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलर झाला आणि अजूनही आहे.
रोनाल्डोने रियल माद्रिदला तब्बल १५ ट्रॉफीज जिंकून दिल्या. २०१८ साली रियल माद्रीद सोबतचा करार संपल्यावर १०० मिलियन पौंड मोजून त्याला इटलीचा क्लब ज्यूव्हेंटसने विकत घेतले. वयाची ३० वर्षे ओलांडूनही एवढी किंमत मिळवणारा रोनाल्डो एकमेव फुटबॉलपटू आहे हे विशेष! पण ज्यूव्हेंटससाठी रोनाल्डो तितका लकी ठरला नाही आणि अवघ्या २ वर्षात त्याने घरवापसी केली. २७ ऑगस्ट २०२१ मध्ये त्याचा पहिला वहिला क्लब मँचेस्टर युनायटेडने त्याला पुन्हा विकत घेतले.
रोनाल्डोचा प्रवास हा कधी चढ तर कधी उताराचा होता, पण त्याच्या नशिबात पैसा खूप होता आणि रोनाल्डोचे विशेष कौतुक करावेस वाटते की त्याने कधीच या पैश्याची डोक्यात हवा जाऊ दिली नाही. तो ऐशोआरामात आयुष्य जगला आणि जगतो आहे पण ज्या खेळाने त्याला हे सगळं मिळवून दिलं, तो खेळ रोनाल्डो कधीच विसरला नाही. हीच त्याची ताकद आहे.
0 Comments