सचिन तेंडूलकर म्हणजे क्रिकेटचा देव म्हणून उपाधी मिळवलेला आजवरचा सर्वात महान क्रिकेटपटू! एक भारतीय म्हणून आपल्याला त्याबद्दल अभिमान आहेच आणि या गोष्टीचाही गर्व आहे की अतिशय सामान्य कुटुंबातून येऊन त्याने जागतिक पातळीवर भारताचे नाव उंच केले. आजही जगात इंडिया हे नाव कानी पडलं की लोकांच्या डोळ्यासमोर जे येतं त्यात सचिन तेंडूलकर हा चेहरा आवर्जून असतोच. कित्येक क्रिकेट प्रेमी देशांत भारत म्हणजे सचिनचा देश या अर्थाने सुद्धा भारताची ओळख आहे. खरंच या माणसाने जे नाव कमावलं आहे ते अत्यंत कमाल आहे.
तसं तर सचिन बद्दल आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहेत. पण आज आम्ही जी गोष्ट सांगणार आहोत ती फार कमी लोकांना माहित आहे आणि ती गोष्ट आहे सचिनला श्रीमंतीचा मार्ग दाखवणाऱ्या एका अवलियाची. तो अवलिया म्हणजे मार्क मास्करेन्हास होय.
कोण होता हा मार्क मास्करेन्हास? त्याने अशी काय जादूची कांडी फिरवली की सचिनला त्याच्या आजवरच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळू लागला आणि सचिन तेंडुलकर गर्भश्रीमंत झाला? एका शब्दात ओळख करून द्यायची झाली तर मार्क मास्करेहान्स म्हणजे सचिनचा पहिला एजंट होय. मार्कने भारतीय क्रिकेट विश्वात सचिनच्या माध्यमातून पाऊल ठेवले आणि केवळ भारतीय क्रिकेट क्षेत्रच नाही तर पूर्ण क्रिकेटचे नशीब पालटले. क्रिकेट मध्ये आजवर नसलेला पैसा अचानक खोऱ्याने ओढला जाऊ लागला. क्रिकेट या खेळात पूर्वी पैसा होता, पण इतर प्रसिद्ध खेळांच्या मानाने कमीच होता.
जगमोहन दालविया यांना ही स्थिती बदलायची होती. क्रिकेट सामन्यांचे राईट्स केवळ दूरदर्शनला देण्याऐवजी खाजगी वाहिन्यांनाही देता यावेत म्हणून त्यांनी न्यायालयात याचिका केली आणि न्यायालयाने सुद्धा त्यांच्या पक्षात निर्णय दिला. ही क्रिकेट हा श्रीमंत खेळ म्हणून नावारूपाला येण्याची सुरुवात होती.
१९९३ च्या क्रिकेट वर्ल्ड कप राईट्सच्या बोली वेळी पहिल्यांदा मार्कची क्रिकेट क्षेत्रात एन्ट्री झाली. भारतात बंगलोर मध्ये जन्मलेल्या या मुलाने आपल्या हुशारीने अमेरिकेत खूप पैसा कमावून स्वत:ची ‘वर्ल्डटेल’ नावाची ब्रॉडकास्टिंग कंपनी सुरु केली होती. याच कंपनीच्या माध्यमातून त्याने तब्बल १ लाख कोटी डॉलर्स मोजून १९९३ च्या क्रिकेट वर्ल्ड कपचे राईट्स मिळवले होते. त्याला यातून खूप फायदा होणार हे माहित होतंच, पण एवढ्यात स्वस्थ बसेल तो मार्क्स कसला? त्याला क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य आणि स्वत:ची प्रगती सुद्धा दिसू लागली होती.
याच वेळी त्याच्या नजरेत आला उदयोन्मुख खेळाडू सचिन रमेश तेंडूलकर! एका सामान्य घरातून आलेला मुलगा जगभरातील मैदाने गाजवतोय यासारखी प्रेरणादायी स्टोरी त्याला दुसऱ्या कोणत्याच खेळाडूत दिसत नव्हती.
त्याने सचिनचे ब्रँडिंग करण्याचे ठरवले आणि त्याने दिला भारताला स्वत:चा क्रिकेट आयकॉन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर! वर्ल्ड कप सुरु होण्याआधीच त्याने सचिनला वर्ल्डटेल सोबत साईन केलं. तेव्हा सचिन वर्षाला ५-६ जाहिराती करून अंदाजे १५ लाख रुपये कमवायचा. मात्र मार्कने सचिनला अशी ऑफर दिली जी सचिन नाकारूच शकत नव्हता. त्याने सचिनला ५ वर्षांसाठी साईन केले तब्बल २७ कोटी रुपयांना आणि एका क्षणात सचिन तेंडूलकर करोडपती झाला.
हा पैसा एवढा होता की टीम मधील सर्व क्रिकेटपटूंची आजवरची कमाई एकत्र केली तरी कमी पडली असती. मार्कने सचिन वर एवढा पैसा खर्च केला आणि आता त्याला तो पुन्हा मिळवायचा सुद्धा होता. त्याने सचिनसाठी जाहिरातींचा नुसता सपाटा लावला. एकामागोमाग एक जाहिराती सचिन करत होता आणि मार्कला त्याची गुंतवणूक परत मिळत होती. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व घडामोडीत एक छुपा चेहरा होता तो म्हणजे रवी शास्त्री!
हो मंडळी रवी शास्त्री यांनीच मार्क आणि सचिन यांची भेट घडवून आणली होती. यात रवी शास्त्रींचा सुद्धा फायदा होताच कारण ते स्वत: मार्कच्या कंपनीमध्ये पार्टनर होते. एकंदर हा सगळा पैश्याचा खेळ होता आणि या सर्व खेळात मार्क, रवी शास्त्री , सचिन तर श्रीमंत झालेच, पण भारतीय क्रिकेट देखील श्रीमंत झाले.
मार्कने केवळ सचिनलाच प्रोफेशनली मॅनेज केले असे नाही, त्याने सौरव गांगुली, अजित आगरकर, शेन वॉर्न, शोएब अख्तर यांसारख्या दिग्गजांना सुद्धा मॅनेज केले होते. मार्कची पुढची कारकीर्द अफाट पैश्यांच्या व्यवहारामुळे वादग्रस्त ठरली. सरकारने सुद्धा त्यांची चौकशी केली.
२७ जून २००२ रोजी एका रस्ते अपघातात मार्कचा मृत्यू झाला आणि हात लावेल त्याचे सोने करेल अशी ख्याती असणारा हा अवलिया आयुष्याच्या डील मध्ये हरला.
0 Comments