नुकतीच उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक २०२२ अंतर्गत समाजवादी पक्षनेते अखिलेश यादव आणि भारतीय जनता पक्षनेते योगी आदित्यनाथ यांमध्ये कमालीची स्पर्धा रंगली. ही निवडणूक खूपच इंटरेस्टिंग ठरली.
अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील २०वे मुख्यमंत्री होते. त्यांनी उत्तर प्रदेशात २०१२ ते २०१७ मध्ये वयाच्या ३८व्या वर्षी सत्ता चालवली. मुख्यमंत्री पद मिळवणारे ते सगळ्यात तरुण व्यक्ती आहेत. वडील मुलायमसिंग यादव यांची समाजवादी पार्टी अखिलेश सध्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत.
पण यंदाच्या निवडणुकीत त्यांचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा निवडून यायचे स्वप्न स्वप्नच राहून गेले. समाजवादी पक्षाची मते वाढली खरी परंतु भाजपाच्या मतांनी अखिलेश यादव यांचे सर्व प्रयत्न मोडीस काढले.
तुम्हाला देखील ही गोष्ट माहित असेलच की सगळे विरोधक अखिलेश यादव यांना ‘तोटीचोर’ म्हणून हिणवतात! अखिलेश यादव यांना २०१८ मध्ये ‘तोटीचोर’ या नावाने खूपच चिडवले गेले होते. त्यावरून सोशल मीडियावर देखीम अनेक जोक्स, विडिओ, मिम्स शेर केले गेले. पण याला कारण काय? आज आपण जाणून घेऊया की त्यांना हे नाव कसे पडले तरी कसे?
अखिलेश यादव यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत एकदा नळ (तोटी) चोरले होते असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. मे २०१८ मध्ये राज्य सरकारने दिलेल्या घरावरून खूप मोठा वाद झाल्यानंतर यादव यांना ते घर खाली करून जाण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. पुढील महिन्यात माजी मुख्यमंत्री यादव यांनी ते घर खाली केले. रिकामी झालेले घराची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना घरातील दृश्य पाहून अगदी शॉकच बसला.
जेव्हा अधिकारी घरात पोहोचले तेव्हा त्यांना सर्व घरात तोडफोड झालेली दिसली. महागड्या टाईल्स, एसी, इलेक्ट्रिक बोर्डस आणि इतरही अनेक वस्तू घरातून गायब झाल्या होत्या. घराबाहेरील खराब झालेल्या लॉनने या नुकसानीत अजूनच भर घातली. या सर्वात जास्त शॉकिंग गोष्ट म्हणजे बाथरूममधील नळ आणि तोट्या ही गायब झाल्या होत्या.
या प्रकारानंतर काही दिवसांतच माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीच ही तोडफोड केल्याची बातमी सगळीकडे पसरली. या सर्व बातम्यांमध्ये ‘नळ चोरीची’ बातमी यादव यांच्या नावासोबत कायम जोडली गेली. या प्रकारानंतरच यादव यांना ‘तोटीचोर’ हे नाव पडले.
अखिलेश यादव जेव्हापण ट्विटरवर कोणतेही ट्विट करतात तेव्हा बरेचसे लोक त्यांना ‘तोटीचोर’ या नावानेच संबोधतात. यादव यांनी त्यांच्यावर झालेल्या सर्व आरोपांना फेटाळून लावले. त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवरच उलटे आरोप केले की, सरकारी घरातील सर्व महागड्या वस्तू आणि झालेली तोडफोड ही त्या सरकारी अधिकाऱ्यांनीच केली आहे.
हे आरोप खोटे ठरवण्यासाठी यादव यांनी अजून एक युक्ती लढवली. अखिलेश यादव यांनी १३ जून २०१८ मध्ये पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी नळ आपल्या दोन्ही हातात धरले होते आणि त्यावर त्यांचे असे म्हणणे होते की, “मी त्या घरात माझ्या मनासारखे बदल केले होते आणि ते सर्व मी माझ्या स्वतःच्या पैश्यांनी केले होते त्यात एकही रुपया जनतेचा वापरला नव्हता. त्यामुळे सरकारने मला सांगावे मी किती नळ चोरले आहेत; मी सर्वच्या सर्व नळ सरकारला परत करण्यास तयार आहे.” यादव यांनी आयएएस अधिकारी आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांवर घराची तोडफोड केल्याचे आरोप केले आहेत.
२०१९ च्या निवडणूक रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील यादव यांना ‘तोटीचोर’ या नावाने संबोधले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी देखील यादव यांच्यावर असा आरोप लावला की, गरीब जनतेसाठी घरे बांधण्याव्यतिरिक्त सरकारी निवासस्थानी महागड्या वस्तू विकत घेतल्या.
तर असे हे काहीसे अपमानजनक नाव अखिलेश यादवांसोबत जोडले गेले ते कायमचेचे!
0 Comments