राज ठाकरे यांच बालपण हे दादर मधलं पण जेव्हा कॉलेज निवडायची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या काकांचा आदर्श घेऊन कला शाखा अर्थात आर्ट्सची निवड केली. बाळासाहबांचा अत्यंत जास्त प्रभाव राज यांच्यावर होता. त्यांच्यासारखी बोलण्याची लकब, राहणीमान, करारी आवाज हे सगळं राज ठाकरेंनी लहानपणापासूनच बाळासाहेबांकडून आत्मसात करून घेतलं. एवढचं काय तर व्यंगचित्रामध्ये आपले काका मास्टर आहेत आणि आपणही तसंच व्हाव म्हणून राज यांनी आपल्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सची निवड केली.

जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या जवळचाच मुंबईतील सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध परिसर म्हणजे गिरगाव होय आणि राज ठाकरे यांनी स्वत: कबूल केले आहे की, त्यांना आनंद वाटतो की त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सची शिक्षणासाठी निवड केली आणि त्या निमित्ताने का होईना त्यांना गिरगाव जगता आलं.
या गिरगाव मध्ये आपल्या अनेक आठवणी दडल्याचे त्यांनी दक्षिण मुंबईतील अनेक भाषणांमध्ये, संभाषणांमध्ये बोलून दाखवले आहे. जरी ते मुळचे गिरगावकर नसले तरी गिरगावशी जोडलेली नाळ मात्र कधी तुटणार नाही असे भावनाविवश होऊन ते सांगतात.
कॉलेजच्या निमित्ताने गिरगाव मधील अनेक मित्र त्यांच्याशी जोडले गेले. मग त्या मित्रांच्या घरी येणे जाणे सुरु झाले. भटकणे सुरु झाले. या निमित्ताने अख्खे गिरगाव राज ठाकरेंनी तरुणपणात पालथे घातले. शिवाय गिरगाव हे ऐतिहासिक इमारतींनी समृद्ध असल्याने त्या इमारतींचे पेटिंग काढण्यासाठी आपल्या मित्रांसमवेत ते अनेकदा गिरगावात यायचे.
गिरगाव मधील एका भाषणात राज ठाकरेंनी एक किस्सा सांगितला होता. तो किस्सा ऐकताच जमलेल्या प्रेक्षकांना सुद्धा हसू अनावर झाले नाही. जे जे मुंबईकर आहेत त्यांना सुद्धा माहित असेल की गिरगाव मध्ये जरी सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या तरी एक अशी गोष्ट आहे जी कुठेतरी गिरगावचे नाव कुप्रसिद्ध करते. गिरगाव मध्ये रेड लाईट एरिया आहेत अर्थात वेश्याव्यवसायाची केंद्रे!

फार वर्षांपासून ठिकठिकाणी गिरगाव मध्ये अशा गल्ल्या आहेत जेथे सभ्य माणूस दिवसाही जायला बिचकतो. कामाठीपुरा हे तर गिरगाव आणि आसपासच्या परीसरामधील वेश्या व्यवसायाचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. या शिवाय सुद्धा अनेक गल्ल्यांमध्ये असे व्यवसाय केले जातात.
तर राज ठाकरे जेव्हा कॉलेजमधून कधी कधी मित्रांकडे जायचे तर कधी कधी एखाद्या चांगल्या इमारतीला भेट देण्यासाठी भटकायचे तेव्हा अनेकदा त्यांना सुद्धा अशा गल्ल्यांमधून जावे लागयचे आणि तेव्हा राज ठाकरे आता आहेत तेवढे प्रसिद्ध नव्हते. बाळासाहेबांचा पुतण्या एवढीच त्यांची थोडीशी ओळख होती. बाकी ते एका सामान्य तरूणा प्रमाणेच राहायचे.
तर अशा गल्ल्यांमधून पहिल्यांदा जेव्हा राज ठाकरे गेले तेव्हा त्यांना घराबाहेर उभ्या असलेल्या स्त्रीयांवरून आपण कुठून जात आहोत याचा अंदाज आला. एका चांगल्या घरातील तरूणाप्रमाणे राज ठाकरे सुद्धा मान खाली घालून भराभर पाउले उचलीत जाऊ लागले पण इतक्यात त्यांच्या कानी आवाज आला, ‘ए चिकण्या…इकडे ये ना.” ती हाक ऐकताच क्षणभर राज ठाकरे थबकले आणि त्यांनी मागे वळून पाहिले तर एक वेश्या हाक मारत होती.

पण झाले असे की तिथे ते एकटे नव्हते अजून दोन तीन पुरुष त्यांच्या पुढे मागे होते. त्यामुळे नक्की हाक कोणाला मारली हे काही कळले नाही. पण राज ठाकरें समवेत इतर पुरुषांनी सुद्धा मागे वळून पाहिले.
तो प्रसंग आजही आठवला की राज ठाकरेंना हसू अनावर होत नाही. त्या वेश्येने हाक मारली म्हणून नाही तर चिकण्या म्हणताच सर्वच पुरुषांनी मागे वळून पाहिले म्हणून, कारण त्या प्रसंगातून सिद्ध झाले की पुरुष कोणीही असो वा कसाही असो तो स्वत:ला सुंदर आणि चिकण्याच समजतो!
0 Comments