2 ऑक्टोबरला गांधी आठवतात, पण पाकिस्तानला धोबीपछाड देणाऱ्या शास्त्रींना आपण का विसरतो?

भले भारत छोडो आंदोलनाचा पाया गांधींनी घातला असेल तरी यशाची पताका फडकावली लाल बहादूर शास्त्री यांनी!


२ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर येथे जगाला अहिंसेचा मार्ग शिकवणारा एक महान व्यक्ती जन्माला आला तसाच २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशच्या मुघलसराय येथे भारताच्या इतिहासातील सर्वात प्रामाणिक पंतप्रधान जन्माला आला. महात्मा गांधींची तुलना जशी कोणाशीही होऊ शकत नाही, तशीच लाल बहादूर शास्त्री यांच्या व्यक्तित्वाची तुलनाही कोणाशी होऊ शकत नाही. पण २ ऑक्टोबर रोजी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांना मिळणारी वागणूक काहीशी दु:खदायक वाटते. जेवढा हा दिवस महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो, तेवढ्याच उत्साहाने हा दिवस लाल बहादूर शास्त्री जयंती म्हणून सुद्धा साजरा केला पाहिजे. पण हा फरक तेव्हाच दिसेल जेव्हा लाल बहादूर शास्त्री यांची जीवनगाथा सर्वांपर्यंत पोहोचेल. हाच उद्देश मनाशी बाळगून केलेला हा लेखप्रपंच!

लाल बहादूर शास्त्री यांची एका वाक्यात ओळख करून द्यायची झाली तर ‘भारताच्या इतिहासातील सर्वात प्रामाणिक पंतप्रधान’ म्हणून आजवर अनेक राजकीय विश्लेषकांनी त्यांना नावाजलेले आहे. जर देशाचा पंतप्रधान प्रामाणिक असेल तर खऱ्या अर्थाने लोकशाही नांदते हे पुस्तकी वाक्य लाल बहादुर शास्त्री यांनी त्यांच्या छोट्याश्या कार्यकाळात का होईना पण करून दाखवले.

लाल बहादूर शास्त्री भले शांत होते, पण जिथे गोष्ट देशहिताची आली तिथे तिथे त्यांनी आपले रौद्ररूप दाखवत योग्य निर्णय घेतेले. १९६५ चे पाकिस्तान विरुद्धचे युद्ध त्यांच्या पंतप्रधान काळातील महत्त्वाची घटना होती. तीन वर्षे आधी भारताला चीनी सैन्याकडून पराभव पत्करावा लागल्याने या युद्धात भारतीय सैन्य शत्रूला तोंड देऊ शकेल का अशी भीती अनेकांच्या मनात होती. पण लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास दाखवत आपल्यातले नेतृत्वगुण सिद्ध केले आणि पाकिस्तानला असा काही धोबीपछाड दिला की आजही ते युद्ध पाकिस्तानवर काळा कलंक ठरते.

लाल बहादुर शास्त्री यांचे गुरु सुद्धा कोण तर महात्मा गांधीच! त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव लाल बहादूर शास्त्रींवर होता. १९२१ चे असहकार आंदोलन असो, १९३० ची दांडी यात्रा असो की १९४२ चे भारत छोडो आंदोलन असो, प्रत्येक आंदोलनामध्ये लाल बहादूर शास्त्री हिरीरीने सहभागी झाले. १९४२ मधील लाल बहादूर शास्त्री यांच्या एका किस्स्याची आजही आठवण काढली जाते. झाले असे की भारत छोडो आंदोलनामध्ये ‘करो या मरो’ असो नारा गांधींनी दिला. गांधीना बंदिवासात ठेवल्यावर शास्त्रीजी अलाहाबाद येथे परतले आणि त्यांनी अतिशय शिताफीने ‘करो या मरो’ जागी ‘करो या मारो’ असा नारा असल्याचे पेरले. त्यामुळे थंड पडलेल्या आंदोलनाची धग वेगाने पसरली. त्यामुळे भले भारत छोडो आंदोलनाचा पाया गांधींनी घातला असेल तरी यशाची पताका फडकावली लाल बहादूर शास्त्री यांनी! असाच एक नारा ‘जय जवान जय किसान’ ही सुद्धा शास्त्रींचीच देण आहे.

Source : bbci.co.uk

१९६४ साली पंडित नेहरूंचा मृत्यू झाला. भारतासाठी हा काळ अत्यंत कठीण होता. कारण नेहरू नव्हते, देशाची स्थिती चांगली नव्हती, पाकिस्तान आपल्यावर टपून बसला होता. अशावेळी स्वत:हून पंतप्रधान बनण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या फार कमी होती. त्याच वेळी कॉंग्रेसने वेगळा डाव खेळत अत्यंत साफ प्रतिमा असलेल्या लाल बहादूर शास्त्रींना पंतप्रधान पद दिले.

अचानक १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. पण शास्त्रींचे निडर निर्णय आणि सैन्याचे शौर्य यामुळे भारताने थेट लाहोर पर्यंतची जमीन मिळवली हिती. युद्ध हे पाकिस्तानच्याच अंगलट आले होते. सर्व जगात भारताची असलेली सोशिक प्रतिमा क्षणात बदलली. अमेरिका आणि रशिया यांसारख्या महासत्तांना त्यांचे स्थान धोक्यात आल्यासारखे वाटले. हे युद्ध थांबवावे म्हणून अमेरिका आणि रशियाने पुढाकार घेत पाकिस्तान सोबत करार करावा म्हणून शास्त्रींच्या मनात नसताना सुद्धा ‘ताश्कंद’ येथे येण्यास भाग पाडले. इथेच झाला तो ‘ताश्कंदचा करार’ ज्यात अशी अट ठेवली गेली की भारताने जेवढी पाकिस्तानची जमीन मिळवली आहे तेवढी परत द्यावी.

शास्त्रींना हे अजिबात मान्य नव्हते. जिंकलेली जमीन ही आता भारताची आहे हे त्यांनी निक्षून सांगितले. पण त्यांच्यावर इतका दबाव टाकला गेला की त्यांना करारावर स्वाक्षरी करावी लागली. मात्र स्वाक्षरी करताना त्यांनी सांगितले की, “मी जरी स्वाक्षरी करत असलो, तरी जमीन मी देणार नाही. तुम्हाला ती दुसऱ्या पंतप्रधानांकडून घ्यावी लागेल.” याचा अर्थ असा की ते एवढे चिडले होते की त्यांनी थेट राजीनाम्याचीच अप्रत्यक्ष घोषणा केली होती.

Source : dnaindia.com

आणि त्याच दिवशी स्वाक्षरी झाल्यावर ११ जानेवारी १९६६ च्या रात्रीच झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांचा हा मृत्यू कसा झाला जे आजवर कळले नाही. शास्त्री परिवाराचे म्हणणे आहे की संपूर्ण ताश्कंद करार हाच त्यांना मारण्याचा प्लान होता आणि यात भारतातले लोक सुद्धा सामील होते.

शास्त्रीजी केवळ १८ महिने पंतप्रधानपदी राहिले, जर ते अधिक काळ पंतप्रधानपदी राहिले असते तर अनेकांची राजकीय महत्त्वकांक्षा धुळीला मिळाली असती आणि म्हणून त्यांना बाजूला करण्यात आले असे आजही सांगण्यात येते. हे जर खरे असेल तर अत्यंत खालच्या पातळीवरच्या राजकारणामुळे देशाचे भवितव्य बदलू शकेल असा पंतप्रधान आपण गमावला हेच आपले दुर्दैव!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Shraddha More