नवी मुंबई मध्ये विमानतळ होणार या घोषणेपासुनच हा संपूर्ण विकास प्रकल्प वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात आहे. कधी जमिनींचे हस्तांतरण प्रकरण, कधी लोकांच्या स्थलांतरणाचा विषय तर कधी पर्यावरणीय समस्या यांमुळे हा प्रकल्प आजही रखडलेला दिसून येतो. पण शेवटी म्हणतात ना ज्या प्रकल्पातून राजकारण्यांना फायदा असतो तो असा ना तसा होतोच आणि नवी मुंबई विमानतळाबाबत सुद्धा तेच दिसून आले व अखेर सर्व प्रकारची मंजुरी प्रकल्पांना मिळाली. विरोध करणाऱ्यांचा विरोध सुद्धा कुठेतरी मावळून गेला. पण अचानक नवी मुंबई विमानतळाला शिवसेना संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आणि संपूर्ण आगरी समाजाने रौद्ररूप धारण केले. प्रकल्पात काहीच बाधा नाही असे दिसत असताना नामांतरणाचा प्रश्न चिघळला आणि पूर्ण आगरी समाज रस्त्यावर उतरला.

नवी मुंबई विमानतळाला आगरी समाजाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील साहेब यांचे नाव द्यावे ही स्थानिक भूमिपुत्रांची आणि पूर्ण आगरी समाजाची मागणी होती.
ज्या जमिनींवर आज प्रकल्प उभारला जात आहे त्या जमिनी दि. बा. पाटील यांच्यामुळेच शाबूत आहेत त्यामुळे त्यांचेच नाव विमानतळाला मिळाले पाहिजे हा इशारा पूर्ण आगरी समाजाने दिला व एका क्षणात दि. बा. पाटील पर्व पुन्हा एकदा जागृत झाले. कोण होते दि. बा पाटील साहेब? आगरी समाज का त्यांना लोकनेते व दैवत मानतं? त्याचाच मागोवा म्हणजे हा लेख होय.
दि. बा. पाटील यांचे पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील होय. १३ जानेवारी १९२६ साली रायगड जिल्ह्यातील जासई गावी त्यांचा जन्म झाला. ते स्वत: शेतकरी कुटुंबातून पुढे आले. त्यांचे वडील हे शिक्षक होते. त्यामुळेच समाज सुधारणेचा वसा त्यांना आपल्या वडिलांकडूनच मिळत गेला. त्यांच्या वडिलांनी देखील जासई गावाच्या सुधारणेसाठी आणि शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. दि. बा. पाटील यांनी सुद्धा वडिलांच्या पाऊलावर पाउल ठेवत समाजकार्याला प्राधान्य दिले आणि राजकीय जीवनाकडे वाटचाल सुरु केली.

दि. बा. पाटील हे नाव प्रकर्षाने पुढे आले १९७० च्या दशकांत जेव्हा मुंबईवर वाढत जाणारा लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने नवी मुंबई नामक अजून एक उपनगर वसवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी सिडकोची स्थापना केली. यासाठी पनवेल, उरण आणि बेलापूर मधील अंदाजे ५० हजार एकर जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतला गेला.
सिडकोने जमीन खरेदीचे मूल्य ठरवले प्रत्येक एकराला १५ हजार रुपये आणि इथेच तत्कालीन शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक आमदार दि. बा. पाटील यांनी प्रत्येक एकराला ४० हजार रुपये मिळालेच पाहिजेत अशी आग्रही मागणी केली.
ह्या नवी शहरामुळे विकास होणार असला तरी त्याची झळ भूमीपुत्र शेतकरी वर्गाला बसणार याची जाणीव दि. बा. पाटील यांना झाली होती. त्यामुळे त्यांचे विविध प्रश्न घेऊन त्यांनी आंदोलन सुरु केले. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दि. बा. पाटील यांच्या मागणीचा विचार करून प्रत्येक एकराला २१ हजार रुपये देऊ असे सांगितले. पण स्थानिक शेतकरी वर्गाने याला विरोध केला आणि तब्बल ५० हजार शेतकऱ्यांनी सरकार विरोधात मोर्चा काढला. दुर्दैवाने ह्या मोर्चाला हिसंक वळण मिळाले आणि काही शेतकऱ्यांचा यात मृत्यू झाला.
यानंतर सरकारने नरमाईने घेतले आणी तेव्हा दि. बा. पाटील यांनी साडेबारा टक्क्यांच्या विकसित भूखंडाचा मोबदला ही योजना मांडली. या योजेननुसार ज्या शेतकऱ्याची जमीन सिडको घेत आहे त्याला प्रत्येक एकराला चांगला भाव व सोबत साडेबारा टक्के विकसित भूखंड त्याच भागात देणे बंधनकारक झाले.
दि. बा. पाटील यांच्या याच संकल्पनेमुळे उरण, पनवेल, रायगड येथील आगरी समाज आपल्याच जागेत राहिला. तो बाहेर फेकला गेला नाही. म्हणूनच येथील आगरी समाज दि. बा. पाटील यांना आपले लोकनेते मानतो. कारण त्यांच्या पुढाकाराने आगरी समाजाचे भविष्य सुरक्षित झाले.

दि. बा. पाटील यांची कारकीर्द एवढीच नाही. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात देखील सहभाग घेतला होता. तसेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून ते स्वत: अग्रक्रमाने पुढे होते. त्यांनी केवळ आगरी समाजासाठीच काम केलं नाही तर ओबीसींचे प्रश्न सुद्धा मांडले. मंडल आयोगासाठी त्यांनी तेव्हाच्या सरकारला धारेवरही धरलं होतं.
पाचवेळा आमदार आणि दोन वेळा खासदार झालेले दि. बा. पाटील शिवसेनेचे ही नेते होते हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. पण त्यांनी आपल्या शेवटच्या निवडणुकीवेळी शिवसेनेत प्रवेश केला. ही गोष्ट तेव्हा अनेकांना पटली नाही व अपेक्षेप्रमाणे दि. बा. पाटील यांचा पराभव झाला. ह्या पराभवानंतर त्यांनी राजकारण कायमचे सोडले व २४ जून २०१३ मध्ये दि. बा. पाटील हे व्यक्तिमत्त्व अनंतात विलीन झाले.
त्यांनी नवी मुंबई पट्ट्यासाठी केलेले कार्य खरेच दुर्लक्षित करण्यासारखे नाही. त्यामुळे त्यांच्या या भूमीवर उभ्या राहणाऱ्या विमानतळाला त्यांचे नाव द्यावे ही मागणी रास्त आहे.
0 Comments