भारताची फाळणी ही आपल्या महान देशाच्या इतिहासामधील अत्यंत क्लेशदायक घटना होय. भले तेव्हा भारतावर इंग्रजांचे राज्य होते, पण तेव्हा सुद्धा कोणी विचार केला नव्हता की भारताचे दोन तुकडे होतील आणि आपल्याच बांधवांसोबत कायमची कटुता आणि वैर निर्माण होईल. धर्माच्या आधारावर ही फाळणी झाल्याने आजही ती कटुता ना संपली आहे न कधी संपेल, कारण राजकारण्यांसाठी धर्माच्या आधारावर झालेल्या फाळणीचा हा विषय खूपच फायद्याचा आहे.
असो, फाळणी का झाली, कशी झाली हे तर आपण जाणतोच आणि त्याला कारणीभूत कोणकोण व्यक्ती आहेत याची सुद्धा सत्यता वारंवार इतिहासातून आपल्यासमोर येत असते. तर त्यापैकी सर्वात महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे मोहम्मद अली जिना होय. मोहम्मद अली जिना यांना भारत देश हा आपल्या मुस्लीम बांधवांसाठी धोकादायक वाटला. नव्या भारतात त्यांना मुस्लिमांचे भविष्य अंधारात दिसले आणि म्हणून त्यांनी पाकिस्तानची मागणी केली.
पण तुम्हाला माहित आहे का? मोहम्मद अली जिना हे सुद्धा मुळचे हिंदूच होते! ही अशी गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहित आहे आणि या लेखातून आपण त्यांच्या कुटुंबाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मोहम्मद अली जिना यांच्या आजोबांचे नाव होते प्रेमजीभाई मेघजी ठक्कर, गुजरात मधील काठीयावाडचे हे कुटुंब! पनेली नावाच्या एका छोट्या गावात या ठक्कर कुटुंबियांना मोठा मान होता कारण गावातील सधन परिवारांपैकी एक ते होते. लोहाना-ठक्कर जातीमध्ये मोडणारे सर्वच ठक्कर हे स्वत:ला रघुवंशीय अर्थात रामाचे वंशज समजतात. प्रेमजीभाईंना देखील या गोष्टीचा सार्थ अभिमान होता.
प्रेमजीभाई हे अगदी कसलेले व्यापारी होते. त्यांच्या नजरेने वाढत चाललेला माश्यांचा व्यापार हेरला आणि प्रेमजीभाई यांनी पारंपारिक कापडाच्या व्यापारासोबत माश्यांचा व्यापार करण्याचे ठरवले. पण ते ज्या जातीतून आणि धर्मातून येत होते, त्यात मांसाहार हा प्रतिबंधित होता. माश्यांना हात लावलेला सुद्धा या लोहाना-ठक्कर जातीतील लोकांना चालत नसे.
मात्र प्रेमजीभाईंनी उघडपणे माश्यांचाच व्यवसाय करायला सुरुवात केली. त्यात त्यांना खूप फायदा सुद्धा होऊ लागला. आधीच जातीचे नाव खराब केले म्हणून काही लोकांचा त्यांच्यावर रोष होता, शिवाय ते आता त्यातून अधिक श्रीमंत होत असल्याचे पाहून त्याच्या तळपायाची आग अधिकच मस्तकात गेली. मग या जातीतील वरिष्ठांनी, “एकतर हा व्यापार करणे सोडा नाहीतर धर्म सोडा” अशी ताकीद प्रेमजीभाईंना दिली.
प्रेमजीभाई हे काहीसे घाबरले खरे, पण त्यांचा मुलगा पुंजालाल ठक्कर याला मात्र हा अपमान आवडला नाही. सततचे टोमणे आणि बहिष्कार याला कंटाळून पुंजालाल याने तेव्हा भारतात जोर धरत असलेला इस्लाम धर्म स्वीकारण्याचे ठरवले. आपली पत्नी आणि चार मुले यांच्या सोबत पुंजालाल ठक्कर यांनी इस्लाम धर्म स्वीकारला, ते कराचीला येऊन स्थायीक झाले आणि त्यांनी माश्यांचा व्यापार सुरु ठेवला आणि इथून खऱ्या अर्थाने जिना कुटुंबाची सुरुवात झाली.
प्रेमजीभाई आणि त्यांच्या इतर मुलांनी मात्र धर्म सोडला नाही. पुंजालाल ठक्कर याने आपले नाव बदलून जिनाभाई पुंजा असे केले आणि त्यांच्याच पोटी २५ डिसेंबर १८७६ रोजी मोहम्मद अली जिना यांचा जन्म झाला. वडिलांनी जन्मानंतर त्यांचे नाव मोहम्मद अली जिनाभाई असे ठेवले होते.
मोहम्मद अली जिना जस जसे मोठे होत गेले तस तसा त्यांना आपल्या कुटुंबाचा इतिहास कळला आणि इस्लामकडे ते अधिक आकर्षित होत गेले. ते इस्लाम प्रती इतके कट्टर होते की त्यांनी आपल्या नावातून भाई हा शब्द सुद्धा काढून टाकला. कारण भाई हा हिंदू शब्द होता आणि त्यांना हिंदू धर्माविषयीची कोणतीही ओळख स्वत:सोबत नको होती.
तर भारताच्या फाळणीसाठी ज्या मोहम्मद अली जिना यांना जबाबदार धरलं जात, त्यांच्या मनात लहानपणापासूनच कुठेतरी दोन धर्मातील द्वेषयुक्त दुफळीचे बीज पेरले गेले होते आणि पुढे त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या हट्टाने पाकिस्तानची निर्मिती झाली.
0 Comments