आज रेल्वेच्या सेकंड क्लास मध्ये सुद्धा गादीच्या सीट आहेत ‘ह्या’ मराठी नेत्यामुळे!

तुरुंगात जनसंघाच्या अनेक नेत्यांसोबत त्यांची चर्चा झाली. या नेत्यांमध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा सुद्धा समावेश होता.


टायटल वाचून तुमच्या मनात विचार आला असेल ना की, “किती फालतू आहे आपल्याकडचं राजकीय क्षेत्र, कोणताच ताळमेळ नाही, इथे कोणीही उठसुठ नेता बनू शकतो, मंत्री बनू शकतो.” पण थांबा असा विचार करू नका. ज्या व्यक्तीची ही कहाणी आहे तो व्यक्ती कोणीही रस्त्यावर पडलेला साधा मनुष्य नव्हता. हा व्यक्ती फिजिक्स मध्ये मास्टर ही पदवी मिळवलेला अत्यंत हुशार व्यक्ती होता. त्या व्यक्तीचे नाव मधु दंडवते होय. विश्वास बसत नाहीये ना की मधु दंडवते यांच्यासारखा माणूस कपडे का धूत होता? आणि एवढी काय घाई होती की त्यांना मंत्रिपद देण्याची? चला तर जाणून घेऊ.

Source : patrika.com

मधु दंडवते यांना विज्ञान विषयाची खूपच आवड, शिवाय घरात वडील सुद्धा इंजिनियर त्यामुळे बाळकडू तेथून सुद्धा नक्कीच मिळाले असणार. घरची परिस्थिती शिक्षणपूरक असल्याने मधु दंडवते यांना उत्तम शिक्षण मिळाले आणि त्याच जोरावर त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील बॉम्बे मधील रॉयल इन्स्टीट्युट मधून फिजिक्स विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली. पुढे त्यांनी आताच्या फोर्ट मधील सिद्धार्थ कॉलेजच्या फिजिक्स विभगाचे प्रमुख पद सुद्धा भूषवले.

तर असा हा अभ्यासप्रिय आणि सुसंस्कृत व्यक्ती राजकारणाकडे कसा वळला? तर त्याची सुरुवात झाली १९४२ च्या भारत छोडो आंदोलनापासून, तेव्हाच्या प्रत्येक तरूणाप्रमाणे मधु दंडवते सुद्धा अतिशय त्वेषाने आंदोलनात सामील झाले. तेथूनच त्याने चळवळीतला धडाडीचा कार्यकर्ता म्हणून नाव झाले होते. १९४८ साली त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या प्रजा सोशालिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचे काम पाहून त्यांना महाराष्ट्र प्रमुख केले गेले. पुढे त्यांनी १९५५ साली गोव्यातून पोर्तुगीजांना हुसकावून लावण्याच्या सत्याग्रह चळवळीचेही नेतृत्व केले.

हळूहळू महाराष्ट्राच्या नव्याकोऱ्या राजकीय क्षेत्रात मधु दंडवते हे नाव हळूहळू आकार घेऊ लागले. १९७० साली ते आमदार म्हणून विधानसभेत गेले. वर्षभरात त्यांना खासदारकी लढवण्याची संधी मिळाली. कोकणच्या राजापूर मतदार संघातील तत्कालीन खासदार नाथ पै यांचे निधन झाले. पोटनिवडणुकीसाठी मधु दंडवते यांचे नाव पुढे आले आणि कमाल बघा  १९७१ ते १९९० असे तब्बल ५ वेळा ते तेथून खासदार म्हणून निवडून आले. मधु दंडवते समाजवादी विचारधारेचे होते, पण तरी कॉंग्रेस व अन्य पक्षांना त्यांची प्रसिद्धी कमी करता आली नाही.

१९७५ साली इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. ज्या अनेक नेत्यांना अटक झाली त्यात मधु दंडवते सुद्धा होते. याच काळात तुरुंगात जनसंघाच्या अनेक नेत्यांसोबत त्यांची चर्चा झाली. या नेत्यांमध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा सुद्धा समावेश होता. आणीबाणीचा असा फटका कॉंग्रेसला बसला की पुढील निवडणुकीत पहिल्यांदाच देशात कॉंग्रेस व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचे सरकार स्थापन झाले. हे सरकार होते जनता पार्टीचे!

सगळे नेते मंत्रिपदासाठी उत्सुक होते. देशभर मोठी चर्चा होती. याच वेळी मधु दंडवते यांच्या घरी अचानक काही अधिकारी आले. मधु दंडवते जरी खासदार असले तरी अत्यंत नम्र आणि स्वावलंबी होते. स्वत:चे कपडे ते स्वत:च धुवायचे. तर जेव्हा हे अधिकारी आले तेव्हा मधु दंडवते कपडे धूत होते. आपल्या घरात अचानक एवढी लोकं का आली ते त्यांना कळेना, इतक्यात त्यापैकी एक जण म्हणाला, “साहेब हे कपडे धुण्याचं काम बाजूला ठेवा, आपल्याला लगेच निघायचं आहे. थोड्याच वेळात शपथग्रहण सोहळा आहे आणि तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे.”

तेव्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले होते मोरारजी देसाई आणि त्यांनी मधु दंडवतेंकडे रेल्वेमंत्री पदाची धुरा दिली. आता कळला का तुम्हाला टायटलचा अर्थ!

असो, तर पुढे मधु दंडवतेंनी मंत्रिपद स्वीकारताच सुस्त पडलेल्या रेल्वे मंत्रालयाने जणू कात टाकली. विविध रखडलेले प्रकल्प सुरु झाले. मंत्री साहेब येणाऱ्या प्रत्येक विनंतीचा विचार करू लागले, विविध गोष्टी बदलल्या. भारतीय रेल्वे सुसाट धावू लागली. आज आपण जी कोकण रेल्वे पाहतोय त्याच्या श्रेयात मधु दंडवते यांचा सुद्धा वाटा आहे.

कोकण सारख्या ठिकाणी डोंगर फोडून रेल्वे लाईन टाकणे शक्य नाही असे म्हणणाऱ्या प्रत्येकाला हा प्रकल्प पूर्ण करून दाखवणाऱ्या व्यक्तींमध्ये मधु दंडवते सुद्धा प्रमुख होते हे विशेष! आजही एक अद्भुत रेल्वे निर्माण प्रकल्प म्हणून जगभरात कोकण रेल्वेकडे पाहिले जाते. या शिवाय त्यांनी सर्वात मोठी गोष्ट बदलली ती म्हणजे सेकंड क्लास डब्ब्यांमध्ये गादीच्या सीट्स वापरण्यास सांगितल्या. यामुळे सामन्यांचा प्रवास सुद्धा सुखकर झाला. पुढे व्ही.पी. सिंग यांच्या सरकारमध्ये मधु दंडवतेंना अर्थ मंत्री पद सांभाळण्यास मिळाले आणि त्या मंत्रालयात सुद्धा अभूतपूर्व सुधारणा त्यांनी करून दाखवली.

तर असा हा सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असणारा सच्चा राजकारणी कॅन्सरचे निमित्त होऊन १२ नोव्हेंबर २००५ साली कायमचा निघून गेला. मृत्यूनंतरही आपले पूर्ण शरीर दान करणाऱ्या ह्या एकमेवाद्वितीय राजकारण्याला मानाचा ‘दंडवत’!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal