भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात वाढवण्याचे काम ज्या नेत्यांनी केले त्यामध्ये प्रमोद महाजनांचे नाव आघाडीवर घेतले जाते. असे म्हणतात की हा एकमेव असा नेता होता ज्यामध्ये भारताचा पंतप्रधान होण्याची ताकद होती. आज जर प्रमोद महाजन हयात असते तर नक्कीच पंतप्रधानपदी पहिल्यांदा मराठी माणूस बसला असता अशी शक्यता सुद्धा त्यांना जवळून पाहिलेले कित्येक राजकीय विश्लेषक करतात. पण काय खासियत होती या माणसाची? कसा सुरु झाला त्यांचा राजकीय प्रवास ?
प्रमोद महाजन हे जरी महाराष्ट्रीयन वाटत असले तरी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांचा जन्म हा तेलंगणा मधील आहे. ३० ऑक्टोबर १९४९ साली प्रमोद महाजन यांचा जन्म तेलंगणाच्या महबूबनगर मध्ये झाला. पण जन्मानंतर त्याचे बालपण आणि संपूर्ण शिक्षण हे बीडच्या अंबाजोगाई येथे झाले आणि त्यांची महाराष्ट्राच्या मातीशी नाळ कायमची जोडली गेली. पुढे याच मातीत त्यांना अत्यंत जीवलग मित्र अर्थात लोकनेते गोपीनाथराव मुंडे भेटले. पुढे दोघांचा राजकीय प्रवास सुद्धा एकाच रेषेत सुरु झाला.
पण प्रमोद महाजन यांनी थेट राजकारणात प्रवेश केला नाही. प्रथम त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्रमोद महाजन त्या काळातील उच्चशिक्षित नेत्यांपैकी एक होते. त्यांनी फिजिक्स आणि जर्नलीझममध्ये पदवी संपादन केली होती. त्यानंतर पॉलीटिकल सायन्स या आवडत्या विषयात पोस्ट ग्रॅज्यूएशन देखील केले. शिक्षण झाल्यावर एक सामान्य तरूणाप्रमाणे त्यांनी नोकरीचा शोध सुरु केला. १९७१ ते १९७४ या काळात इंग्रजी शिक्षक म्हणून ते कार्यरत होते. याच काळात ते तरुण भारत या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तमानपात्रासाठी सह-संपादक म्हणून सुद्धा ते काम पाहत होते. लहानपणापासूनच संघ शाखेत जात असल्याने राष्ट्रवादी विचारांचा त्यांच्यावर पगडा होता आणि तेच विचार त्यांनी या कामातून जोपासले.
संघाशी जोडलेले असतानाही प्रमोद महाजन यांनी कधीच फुल टाईम राजकारणाचा विचार केला नाही. १९७४ ते १९७५ हा काळ इंदिरा गांधीच्या आणीबाणीचा होता. याच काळात सघ विचारांचे स्फुरण त्यांच्यावर चढले आणि आपली शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी पूर्ण वेळ संघाचा स्वयंसेवक होण्याचे ठरवले. हीच होती भारतीय राजकारणातील उगवता सूर्य अर्थात प्रमोद महाजन नामक पर्वाची सुरुवात!
आणीबाणीच्या विरोधात भाजपने उभारलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनामध्ये प्रमोद महाजन हे नाव खूप चर्चिले गेले. तेथून त्यांची नेमणूक भाजपचे जनरल सेक्रेटरी म्हणून केली गेली. १९८५ पर्यंत त्यांनी हे पद सांभाळले. याच काळात गोपीनाथ मुंडे नावाचे अजून एक पर्व महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येत होते. दोघांची मैत्री देखील अत्यंत घट्ट होती आणि त्याच जोरावर १९९५ साली भाजप-शिवसेना हे युतीचे सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा सत्तेत आले. या काळात त्यांना राज्यसभेचे खासदार म्हणून सुद्धा पाठवण्यात आले.
१९९८ साली वाजपेयींचे सरकार आले तेव्हा संरक्षण मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली, पण दुर्दैवाने हे सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर भाजपच्या सत्ता काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री, दूरसंचार मंत्री ही मंत्रिपदे सुद्धा भूषवली. महाराष्ट्रात त्यांना स्वत:चे नाव मोठे करण्याची खूप संधी होती. महाराष्ट्राची जनता सुद्धा त्यांना मानायची. पण त्यांचे मन नेहमीच केंद्रात रमले. दिल्लीतील वजनदार मराठी नेता म्हणून त्यांची तेव्हा ख्याती होती. राजकीय आयुष्यात अनेक बदल पाहत मोठा होत असलेल्या या माणसाच्या आयुष्यात २२ एप्रिल २००६ चा तो काळा दिवस आला ज्या दिवशी त्यांच्या स्वत:च्याच लहान भावाने, प्रवीणने त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. १३ दिवस मृत्यूशी झुंज देत मी अजून लढतोय असे सांगणाऱ्या प्रमोद महाजनांची प्राणज्योत ३ मे २००६ साली मालवली.
प्रवीण महाजन यांनी भावाच्या हत्येचे कारण देताना सांगितले की, “त्यांचे आम्हा सगळ्या भावंडांवर खूप प्रेम होते. पण जस जसे ते राजकारणात मोठे होऊ लागले तस तसे ते बदलू लागले. त्यांना राग खूप यायचा, हे फार कमी लोकांना ठावूक होते. आम्ही त्यांच्या रागाला अनेकदा बळी पडलो. ते माझा खूप अपमान करायचे. असेच एकदा एका गोष्टीवरून फोन वरून भांडणे झाली आणि माझाही राग विकोपाला गेला आणि त्या रागातच मी गोळ्या झाडल्या.”
तर अशी ही प्रमोद महाजन यांची जीवनकहाणी, ज्याचा अंत मात्र अत्यंत दुर्दैवी ठरला नाहीतर हा व्यक्ती खरंच पहिला मराठी पंतप्रधान होऊ शकला असता!
0 Comments