भारतीय राजकारणाला दलित समजातील नेत्यांची मोठी समृद्ध परंपरा आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातून एवढी मोठी यादी निघेल की जी कधी संपणारच नाही. हे सर्व नेते तळागाळातून संघर्ष करून आणि खास करून स्टुडंट युनियनच्या राजकारणातून आलेले असतात. त्यांनी स्वत:चे अस्तित्व स्वत: निर्माण केलेले असते. लोकांशी असलेला त्याचा संपर्क हा अस्सल असतो आणि म्हणूनच त्यांना मिळणारा पाठींबा सुद्धा महाप्रचंड असतो. अशा नेत्यांमागे कोणी गॉडफादर नसतो. ते स्वत:च स्वत:चे गॉडफादर असतात. गेल्या काही वर्षांत भारतीय राजकारणात दलित समजातून अजून एक नेता राष्ट्रीय पातळीवर आकार घेत आहे तो नेता म्हणजे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद रावण!
अगदी काही वर्षांपूर्वी कोणती ही भीम आर्मी? कुठून आली? हे काही करू शकत नाही, असे म्हणणाऱ्यांच्या तोंडात मारण्याचे काम भीम आर्मीने आणि त्यांच्या या नेत्याने केले आहे. कधी काळी १००-२०० लोकांना जमवून आपली विचारधारा समजावून सांगणाऱ्या चंद्रशेखर आझाद रावण यांच्या सभेला आज हजारोंचा जनसमुदाय उसळतो.
अल्पावधीत मिळालेली ही प्रसिद्धी पाहता हा नेता दलित राजकारणचा चेहरा बदलणार हे भाकीत अनेक राजकीय विश्लेषकांनी आधीच केले आहे. पण याची सुरुवात नेमकी झाली कुठून?
३ डिसेंबर १९८६ रोजी उत्तर प्रदेशच्या सहारणपूर मधील घडखौली या छोट्याश्या गावात चंद्रशेखरचा जन्म झाला. वडील शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे घरात एक सुसंस्कृत वातावरण होते. पण उत्तर प्रदेशात जाती व्यवस्था किती खोलवर रुजलेली आहे हे तुम्हालाही वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आपण एका दलित कुटुंबात जन्माला आलो आहोत आणि आपल्याला व आपल्या बांधवांना मिळणारी वागणूक काहीशी वेगळी आहे हे वयात येताच चंद्रशेखरच्या लक्षात आले. इथूनच कुठेतरी त्याच्यामध्ये एक नेतृत्व उदयास येऊ लागले. त्याच्या वडिलांची सुद्धा त्याला सोबत मिळाली आणि त्या गावात चंद्रशेखर नावाचा तरुण नेता निर्माण झाला.
तुमच्या मनात सुद्धा एक प्रश्न असेलच ना की चंद्रशेखर यांचे आडनाव रावण आहे का? तर नाही मंडळी रावण हे नाव त्यांनी स्वत:ला लावून घेतले. पुस्तके हातात पडतच कधीतरी चंद्रशेखर यांची रावणाशी ओळख झाली आणि आजवर रावणाची रंगवली गेलेली दुष्ट प्रतिमा त्यांच्या मनातून निघून गेली.
त्यांच्या मते रावण श्रेष्ठ होता. तो कसाही असला तरी स्वत:ची नैतिकता सोडणारा नव्हता. त्याने सीता मातेला हात सुद्धा लावला नाही, आपल्या प्रेजाला कधी त्रास दिला नाही. नेहमी जे चुकीचे आहे त्याचा विरोध करत राहिला. तो अत्यंत बुद्धिमान होता. या सर्व गोष्टी चंद्रशेखर यांच्या मनात खोलवर घट्ट रुजल्या आणि त्यांनी सुद्धा रावणाचा आदर्श घेऊन आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा आणि प्रसंगी गरज पडली तर रावणासारखा लढा द्यायचा असे ठरवले. बस्स तेव्हापासून चंद्रशेखर आझाद हा चंद्रशेखर आझाद रावण झाला.
२०१४ साली चंद्रशेखर यांनी भीम आर्मी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेच्या तत्वावर तयार झालेल्या या गटाचे उद्दिष्ट होते जे आजही अधिकारांपासून वंचित आहेत त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देणे. चंद्रशेखर आझाद यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या हातात नेहमी एक संविधानाची कॉपी असते. यातून त्यांना नेहमी दाखवून द्यायचे असते की हा देश संविधानावर चालतो आणि त्याचे पालन सगळ्यांनी केले पाहिजे.
चंद्रशेखर यांच्या मते दलित हा शब्द केवळ एका जाती व समुदायासाठी नसून त्या प्रत्येकासाठी आहे जो कोणत्याही जाती धर्माचा आहे पण आपल्या अधिकारांपासून वंचित आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या ‘भारत एकता मिशन’ अंतर्गत केवळ आपल्या समाजासाठीच काम सुरु केले नाही तर ज्याला कोणाला मदत हवी असेल त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. हेच कारण आहे की हळूहळू चंद्रशेखर आझाद रावण हे नाव प्रसिद्धीस पावू लागले.
२०१७ मध्ये मात्र एक गोष्ट चंद्रशेखर यांच्याकडून घडली. त्यांनी आपल्या गावाच्या बाहेर ‘द ग्रेट चमार’ डॉ. भीमराव आंबेडकर ग्राम’ या नावाचा बोर्ड लावला. त्यांची ही कृती गावातील उच्च वर्णीय ठाकुरांना आवडली नाही आणि गावात संघर्ष सुरु झाला. अगदी राष्ट्रीय स्तरावर ही बातमी पोहोचली. चंद्रशेखर यांना अटक सुद्धा झाली. या बातमीच्या आधारे का होईना पण चंद्रशेखर हे नाव देशभारत पोहोचले आणि दोन गट तयार झाले एक त्यांच्या विरोधातला आणि एक समर्थनातला!
पुढे भीम आर्मीच्या माध्यमातून विविध विषय घेऊन राष्ट्रीय स्तरावर आंदोलने छेडण्यात आली. २०१९ मध्ये चंद्रशेखर यांनी आता राजकारणात उतरण्याची वेळ आली असल्याचे जाहीर केले. २०२० मध्ये CAA विरोधातील आंदोलनात भीम आर्मी त्वेषाने उतरली. या सगळ्याचे नॅशनल लेव्हल फुटेज चंद्रशेखर आणि त्यांच्या भीम आर्मीला मिळत गेले आणि चंद्रशेखर यांची प्रसिद्धी वाढत गेली.
१५ मार्च २०२० रोजी त्यांनी आझाद समाज पार्टी या पक्षाची स्थापना केली आणि आता हा पक्ष येणारी प्रत्येक निवडणूक लढवेल अशी घोषणा केली. तेव्हापासून चंद्रशेखर आझाद यांनी लोकसंपर्क वाढवण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्यात त्यांना लोकांचा खूप प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. केवळ उत्तर प्रदेशच नाही तर देशाच्या अन्य राज्यांतील विविध दलित गट सुद्धा त्यांना पाठींबा देत आहेत.
केंद्रातील भाजप सरकारला चंद्रशेखर वेळोवेळी विरोध करत आले आहेत. त्यामुळे त्यांचा फायदा उचलण्याचा प्रयत्न अन्य भाजप विरोधी पक्ष करत आहेत. त्यात कॉंग्रेस आघाडीवर आहे. येणाऱ्या काळात चंद्रशेखर राष्ट्रीय राजकारणात कितपत मजल मारतात हे कळेल. पण सध्या लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेला हा नेता ते प्रश्न विसरून जाऊ नये हीच अपेक्षा!
0 Comments