आजकाल इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर व्हायरल होण्याकरता लोकं किती आटापीटा करतात हे तुम्हाला माहीत आहेच. एका रात्रीत फेमस होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच व्हायरल होणे. हे समीकरणच झालं आहे. आता ही प्रसिध्दी तात्पुरत्या काळाकरिताच मर्यादित राहते हे मात्र लोकं साफ विसरतात बरं. बऱ्याचदा प्रयत्न करुनही प्रत्येकाला व्हायरल होणं तितकंस जमत नाही बुवा. पण तुम्हाला माहीत आहे बंगालचा एक शेंगदाणेवाला मात्र रातोरात व्हायरल झाला.
तुम्ही इंस्टाग्रामवर गेला आणि ‘काचा बादाम’ या गाण्यावर तुम्हाला रिल दिसलं नाही असं होणारच नाही. सध्या इंस्टाग्रामवर काचा बादाम या गाण्यावरचे रिल्स ट्रेंडिंगमध्ये आहेत. काचा बादाम म्हणजे नेमकं काय? हे कोणतं गाणं आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. काळजी करू नका तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आम्ही नेहमीच सज्ज असतो.
एक साधारणसा शेंगदाणे वाला जो जागो जोगी आरोळ्या देत शेंगदाणे विकतो. तो रातोरात स्टार होऊ शकतो. पण हे खरंच घडलं आहे पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील लक्ष्मीनारायणपूर पंचायतीतल्या कुरलजुरी गावात राहणाऱ्या भुबन बद्याकर सोबत…!
हा आपल्या अनोख्या अंदाजाने शेंगदाणे विकत होता. शेंगदाण्याला तो काचा बदाम म्हणतो, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सरळ धोपट मार्गाने तो आरोळ्या ठोकत नाही तर चक्क त्याने एक गाणं रचलं आणि आपल्या खास शैलीत गाणं गात तो शेंगदाणे विकत होता. एका नेटकऱ्याने भुबनचा व्हिडीओ इंस्टावर वायरल केला आणि रातोरात भुबन स्टारच झाला की हो…
हायो तूडा हाकर बाला ठाय कर जो तेरी सीटी बोले चल, तीये जा बिन सत सोमन सोमन तोमरा बदाम पवन…बादाम बादाम दादा काचा बादाम बादाम बादाम दादा काचा बादाम अमार काचा नाइको बुबु भाजा बादाम अमार काचा पाबे सुबु काचा बादाम ………हे या गाण्याचे बोल आहेत.
आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की या गाण्याचा नेमका अर्थ काय? चला तर मराठीत या गाण्याचा अर्थ जाणून घेऊया. तर हा शेंगदाणा विकणारा भूबन म्हणतो की तुमच्याकडे बांगड्या, नकली साखळ्या, मोबाईल जे काही असेल तर ते तुम्ही मला देऊ शकता आणि त्याच्या वजनाएवढे मी तुम्हाला हे कच्चे बदाम म्हणजेच शेंगदाणे देईल. पण माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे नाही तर माझ्याकडे कच्चे शेंगदाणे आहेत.
तर मंडळी काचा बदाम म्हटल्यावर आपण सर्वांनीच हा कच्चे बदाम विकतोय असं गृहीत धरलेलं, पण ते बदाम नसून शेंगदाणे आहेत बरं, घ्या आता कपाळावर हात मारून! असो, पण त्याला दाद सुद्धा द्यायला हवी. भूबन हा शिकलेला नाही पण घरोघरी जाऊन आपण जेव्हा काही विकतो तेव्हा लोकांना गोळा करण्यासाठी काहीतरी युनिक पद्धतीने त्यांना साद घातली पाहिजे ही गोष्ट त्याने हेरली आहे आणि म्हणून भुबनची ही एक प्रकारे मार्केटींग स्ट्रॅटेजीच म्हणावी लागेल आणि लोकं गोळा झाली तो खरंच लोकांकडून सामान घेऊन त्याबदल्यात त्यांना शेंगदाणे देतो.
नेटकऱ्यांनी या गाण्याचे रिमिक्स बनवलं आणि त्यावर डान्स रील्स बनवायला सुरुवात केली. त्यामुळे कच्चा बादाम गाण्याला भारतातल्याच नाही तर जगभरातल्या लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. भारतातल्या लोकांनी या गाण्यावर ठेका धरत डान्स रिल्स बनवलेच. त्याच बरोबर साऊथ अफ्रिका, टांझानिया सह अनेक देशातल्या नेटकऱ्यांनाही या गाण्यावर नाच केला आहे.
तर सांगायचं तात्पर्य हे की या सोशल मिडीयाच्या जमान्यात लोकं कधीही कोणालाही डोक्यावर घेऊ शकतात, पण ही प्रसिद्धी काही दिवसांचीच असते हे सत्य नाकारता येत नाही.
0 Comments