प्रसिद्ध उद्योगपती माननीय श्री. रतन टाटा यांना ओळखत नाही असा माणूस सापडणे कठीण, ते नेहमी चर्चेत असतात, पण त्यांच्याबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते नेहमी चांगल्या गोष्टीसाठीच चर्चेत असतात. हेच कारण आहे की रतन टाटांना केवळ भारतातच नाही तर जगभरात आदराचे स्थान आहे.
२८ डिसेंबर हा रतन टाटांचा जन्मदिवस आणि २८ डिसेंबर २०२१ रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यात एक मुलगा रतन टाटांना केक भरवताना आढळला. आपला हा ८४ वा वाढदिवस त्यांनी अत्यंत साधेपणाने साजरा केला म्हणून सगळ्यांनीच त्यांची प्रशंसा केली. पण त्या व्यतिरिक्त जो मुलगा त्यांच्या सोबत होता त्याच्या बाबतीत अनेकांना कुतुहूल निर्माण झाले.
मंडळी हा मुलगा म्हणजे शंतनू नायडू होय. शंतनूने आपली कंपनी MotoPaws च्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांकरता एक मानेचा पट्टा तयार केला ज्यात त्याने परावर्तक म्हणजेच रिफ्लेक्टर्स बसवले. ह्यामुळे रात्रीच्या अंधारात सुद्धा समोरून येणाऱ्या वाहनचालकांना हे भटके कुत्रे सहज दिसायला लागले व कुत्र्यांचे अपघात कमी झाले.
शंतनूची ही कामगिरी टाटा न्यूज लेटर मध्ये प्रदर्शित झाली आणि रतन टाटांनी स्वत:हून त्याला भेटायला बोलावले. अशी झाली ह्या मिलेनियलची आपल्या मोठ्या मित्राशी अतूट दोस्ती. आता तुम्ही म्हणाल हे मिलेनियल म्हणजे नक्की कोण? तर जी मुलं १९८० ते १९९५ या सालात जन्माला आलेली आहेत त्यांना मिलेनियल्स असे संबोधले जाते. शंतनूचे काम टाटांना एवढे आवडले कि त्यांनी लागेल ती आर्थिक मदत त्याच्या कंपनीला देऊ केली. पण शंतनूने ही मदत नाकारून त्यांना कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. रतन टाटांनी देखील हसत हसत ते मान्य केले.
शंतनु आता अवघा २८ वर्षांचा असून तो मूळचा आहे पुण्याचा. त्याने कॉर्नेल युनिव्हर्सिटी मधून एमबीए म्हणजेच मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण शंतूनच्या कुटुंबातील पाच पिढ्यांनी टाटा सन्स मध्ये काम केले आहे आणि शंतनू पाचव्या पिढीचे नेतृत्व करत आहे.
शंतनूच्या LinkedIn प्रोफाइल नुसार तो टाटा ट्रस्ट सोबत २०१७ ह्या वर्षीपासून कार्यरत आहे. याव्यतिरिक्त शंतनुने टाटा एल इझी सोबत डिझाईन इंजिनियर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. २०१६ साली शंतनु अमेरिकेला कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये पुढचा अभ्यास करायला गेला. आज शंतनू नायडू टाटा ट्रस्ट सोबत डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. टाटा ट्रस्ट ही संस्था लोकसेवा आणि समाजसेवा करण्यात अग्रेसर असून त्या अनुषंगाने निरनिराळे प्रकल्प राबविण्यात शंतनू मोलाची भूमिका बजावतो.
आपल्या भारतात डेप्युटी जनरल मॅनेजर अर्थात DGM चा पगार हा वार्षिक २७ लाखांमध्ये दिला जातो. टाटा सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये अनुभवाच्या निकषावरच व्यक्तीची नेमणूक केली जाते. शंतनू भाग्यवान म्हणावा लागेल की त्याला जास्त अनुभव नसला तरी टॅलेंटच्या जोरावर त्याने कमी वयातच इतकी मोठी मजल मारली आहे.
शंतनूची कंपनी MotoPaws एक स्टार्टअप आहे आणि रतन टाटांना ह्या देशाचे उज्ज्वल भविष्य start-ups मध्ये दिसून आलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचा अशा start-ups ना पाठिंबा आहे. Suitcase Full Of Sparks हे शंतनू नायडू च इंस्टाग्राम हँडल आहे. ह्यावरून तो आजच्या तरुणांना उद्योजक कसे यावे याबद्दल धडे देतो. तो अवघी ५०० रुपये फी आकारून सेमिनार घेत नवउद्योजकांना मार्गदर्शन करतो.
यातून त्याला मिळत असलेले सगळे पैसे त्यांची कंपनी व NGO Motopaw ला जातात. त्याची ही स्वयंसेवी संस्था आज २० पेक्षा जास्त शहरात पोहोचलेली आहे. या शिवाय शंतनू एक लेखक म्हणून सुद्धा नावारूपाला येतो आहे. त्याने I Came Upon a Lighthouse हे पुस्तक रतन टाटा यांच्यावर प्रेरित होऊन लिहिलं असून ते एक बेस्टसेलिंग बुक ठरलं.
रतन टाटांचा हा मिलेनियल मित्र आजच्या तरुणांसाठी एक आदर्श आहे. एवढ्या कमी वयात त्याने घेतलेली ही भरारी आणि एक इंजिनियर, एक सहाय्यक, एक डीजीएम, एक सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर व एक लेखक म्हणून होत असलेली त्याची प्रसिद्धी नक्कीच प्रेरणादायी आहे.
0 Comments