तो काळ ट्रांझिस्टरचा होता. माझी दिवाळी अन् मे महिन्याची उन्हाळी सुट्टी या आजोळी कल्याणला ठरलेल्या. स्वयंपाकघरातल्या एका भिंतीच्या खुंटीला ट्रांझिस्टर टांगलेला असायचा, रोज सकाळी त्यावर गाणी वाजायची. मला थोडं कळायला लागल्यावर ट्रांझिस्टरवर वाजणाऱ्या काही गाण्यांपैकी एक गाणं मला आवडू लागलं आणि ते गाणं होतं १९८५ साली प्रदर्शित झालेल्या राज कपूर दिग्दर्शित राम तेरी गंगा मैली चित्रपटातलं मंदाकिनीवर चित्रित झालेलं सून साहेबा सून हे. त्यानंतर मग रोज सकाळी मी या गाण्याची अक्षरशः वाट पहायला लागलो. ती माझी लतादीदींशी ट्रांझिस्टरच्या जमान्यात झालेली पहिली ओळख.
त्यावेळी श्रीमंत समजल्या जाणाऱ्या वर्गाकडे व्हिसीआर असायचा आणि त्यातल्या एका खाच्यात कॕसैट ढकलली कि चित्रपट सुरु व्हायचा. काही विशेष प्रंसगी त्यावेळी व्हिसीआरवर सार्वजनिकरित्या चित्रपट लावले जायचे. चाळीतली सारी अबालवृद्ध मंडळी दाटीवाटी करुन बसायची चित्रपट पहायला. याच व्हिसीआरवर पहिला चित्रपट पाहिला तो यश चोप्रा दिग्दर्शित १९९१ साली आलेला ऋषी कपूर आणि श्रीदेवीचा चांदनी. व्हिसीआरच्या माध्यमातून लतादीदी पुन्हा भेटल्या.
लतादीदींचा पुरता फॕन झालो तो १९९४ साली प्रदर्शित झालेला अन् मी पहिल्यांदा चित्रपटगृहात जाऊन पाहिलेला हम आपके है कौन या चित्रपट पाहिल्यानंतर. त्यानंतर तर कैकदा या चित्रपटाची पारायणं झाली जी अगदी आजतागायत सुरु आहेत. लतादीदींनी गाणी गावीत तर ती केवळ एस. पी. बालसुब्रमण्यम यांंच्यासोबतच असं त्यावेळी वाटायचं.
त्यानंतर लतादीदी वरचेवर भेटत राहिल्या त्या यश चोप्रांच्या रोमेंटींक चित्रपटांतील सुमधूर गाण्यांतून. लम्हे, डर, दिल तो पागल है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, महोब्बते ते अगदी फना आणि रबने बना दी जोडीपर्यंत. गाण्यांची हिच आवड जोपासण्यासाठी मी आईजवळ हट्ट धरुन नॕशनल कंपनीचा कॕसेट प्लेअर कम रेडीओ घेतला. आता कॕसेट प्लेअर आला म्हटल्यावर कॕसेट्स हव्यातच. कॕसेट्स विकत आणून त्यातली गाणी रात्रंदिवस ऐकण्याचा एक नवा छंद त्यावेळी जडलेला. कॕसेट प्लेअरसोबत अजून एक छानसं उपकरण त्यावेळी खूप जास्त फेमस झालं होतं ते म्हणजे वाॕकमेन. कानात इअरफोन घालून खिशात वाॕकमेन घालायचा आणि चालता फिरता त्यावर गाणी ऐकण्याची मजाच काही और होती.
तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसा कॕसेट प्लेअरचा जमाना जाऊन व्हीसीडी, डीव्हीडीचा काळ आला. मग कॕसेट्सप्रमाणेच सीडीज जमवायला सुरुवात झाली अन् त्यातून गाणी ऐकण्याचा छंद जोपासतत राहिलो. आजही जुनी आठवण म्हणून तो कॕसेट प्लेअर , वाॕकमेन, डिव्हीडी अन् बाॕक्सभर कॕसेट्स तशाच्या तशाच माळ्यावर जपून ठेवल्यात. आता तर कानात हेडफोन घालून युट्युबवर आपल्याला हव्या असलेल्या गाण्याचे बोल टाईप करायचे अन् ते प्ले करुन संगीताची मेजवानी हवे तेव्हा हवे तिथे लुटत रहायची एवढं तंत्रज्ञान पुढारलय.
आ. बाबासाहेब पुरंदरेंचं निवेदन आणि त्यातील ऐतिहासिक प्रंसंगांना अनुसरून असलेलं गीतरुपी शिवचरित्र म्हणजेच शिवकल्याण राजा. हे शिवकल्याण राजा ज्याने याची देही याची डोळा पाहिलं, कानांनी ऐकलं तो खरा भाग्यवान.
शिवकल्याण राजाच्या माध्यमातून बाबासाहेब आणि लतादीदींनी अक्षरशः शिवकाळ उभा केला प्रेक्षकांसमोर. लतादीदींनी गायलेलं हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे स्फुर्तिदायक गीत तर कधीही विसरता न येण्याजोगं.
ट्रांझिस्टर ते युट्यूब या विविध माध्यमांद्वारे नव्वदीच्या काळापासून आजवर लतादीदी भेटत राहिल्या , कानांना तृप्त करत राहिल्या अन् यापुढेही रहातील. काल पेडर रोड येथील निवासस्थान प्रभुकूंजमधून दादर येथील शिवतीर्थाच्या दिशेने अखेरचा हा तुला दंडवत म्हणत इहलोकिचा प्रवास संपवून स्वर्गलोकाकडे निघालेली अखेरची यात्रा , रस्तोरस्ती दुतर्फा झालेली गर्दी, शिवतीर्थाभोवती लांबच लांब रांगा लावून लतादीदींचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी लोटलेला जनसमुदाय पाहिला, चंदनाच्या चितेवर निपचित पहुडलेला देहही पाहिला आणि एका युगाचा अंत झाल्याची जाणीव झाली.
विविध सन्मानांनी गौरवल्या गेलेल्या भारतरत्न, गानकोकिळा लतादीदी आज पहाटेसच स्वर्गलोकीच्या दरबारात हाती वीणा घेऊन बसल्या असतील देवीदेवतांच्या, पुण्यात्मांच्या कानांना तृप्त करण्यासाठी!
लतादीदी तुम्हाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार नाही कारण पु.ल. देशपांडे म्हणाले होते त्याप्रमाणे आकाशात जोवर चंद्र , सूर्य असतील तोवर इथल्या मनामनात, कानाकानात तुमही स्वररुपात जिवंत रहालच यात तीळमात्रही संशय नाही.
0 Comments