दोन देशाच्या सीमा म्हटलं की त्या किती सुरक्षित असतात हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. आपल्या भारत आणि पाकिस्तान मधल्या सगळ्या सीमा घ्या ना! अगदी कडक सुरक्षा व्यवस्था, सगळीकडे चेकपोस्ट, एक अट्टारी बॉर्डर सोडली तर अन्य बॉर्डर जवळ जाण्याची परवानगी दोन्ही देशांच्या नागरिकांना नाही. पण बॉर्डर वरची सुरक्षा किती कडक आहे हे त्या त्या देशांच्या संबंधांवरून सुद्धा ठरतं. शिवाय ती सीमा वा तो प्रदेश देशाच्या सुरक्षेसाठी कितपत महत्त्वाचा आहे हा घटक सुद्धा विचारात घेतला जातो.
यामुळेच या जगात दोन देशांत जेवढ्या कडक बॉर्डर्स आहेत तेवढ्याच काही बॉर्डर्स अशा आहेत जिथे नावाला सैन्य सुद्धा नसते. हो खरंच, कित्येक देशांच्या बॉर्डर्स अशा एकमेकांना लागून आहेत की तुम्ही एक ढेंग टाकली तरी दुसऱ्या देशात जाऊ शकता. अशा बॉर्डर्सना ओपन बॉर्डर असेही म्हणतात. इथे तुम्हाला दुसऱ्या देशात जाताना कोणता चेकपोस्ट लागणार नाही, कोणती कागदपत्रे दाखवावी लागत नाहीत.
पण थांबा, याचा अर्थ असा नाही की तुम्ही कागदपत्राशिवाय त्या दुसऱ्या देशात जाऊन राहू शकता. पुढे कुठेही तुम्हाला कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडून कागदपत्राची विचारणा केली जाऊ शकते. या ओपन बॉर्डर्सचा फायदा हाच की दोन्ही देशांना एकमेकांकडून काहीच धोका नसतो आणि त्यामुळे इथे सुरक्षा नसते वा कोणत्या तारा लावलेल्या नसतात. यामुळे नागरिकांचा बॉर्डर्स क्रॉस करण्याचा वेळ वाचतो.
पाकिस्तान वगळता अन्य शेजाऱ्यांशी आपले संबंध चांगले असले तरी भारत हा आपल्या देशाच्या बाबतीत नेहमीच संरक्षित भूमिका घेऊन असतो. त्यामुळे या देशांसोबत असलेल्या आपल्या बहुतांश बॉर्डर्स देखील संरक्षित आहेत. म्यानमार हा असाच आपला शेजारी देश! पूर्वी भारताचाच भाग म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश ब्रम्हदेश वा बर्मा म्हणून प्रसिद्ध होता. १९३७ साली ब्रिटीशांनी भारतापासून हा प्रदेश स्वतंत्र केला आणि पुढे त्याचाच म्यानमार तयार झाला.
म्यानमार आणि भारताची सीमा ही १६४३ किलोमीटरची आहे. दोन्ही देशांत संबंध चांगले असल्याने बॉर्डर्स बाबतीत कडक नियम दिसून येत नाही. तर या भल्या मोठ्या पसरलेल्या बॉर्डर्सची एक रेष अशी आहे जी चक्क एका घरातून जाते. भारताच्या नागालँड मध्ये हे घर असून जेव्हा ही गोष्ट समोर आली तेव्हापासून सगळ्यांसाठीच कुतुहुलाचा विषय बनली आहे.
हे घरच नाही तर हे घर ज्या गावात आहे ते गाव सुद्धा दोन देशांत विभागलेले आहे. गावाच्या मधोमध भारत आणि म्यानमारची ही बॉर्डर जाते आणि दोन्ही गावातील लोक दिवसातून हजारवेळा कोणत्याही त्रासाविना एका देशातून दुसऱ्या देशात जात येत असतात.
नागालँडची राजधानी कोहिमा पासून भारताच्या ३६० किमी दूर अगदी ईशान्य टोकाला हे ‘लुन्ग्वा’ नावाचे हे शेवटचे गाव वसलेले आहे. सर्वात भारी गोष्ट म्हणजे या अद्भुत बॉर्डर मुळे येथे राहणाऱ्या नागरिकांचा फायदा झाला आहे. कारण कोणतीही समस्या होऊ नये म्हणून या गावातील लोकांना दोन्ही देशाचे नागरिकत्व देण्यात आले आहे. म्हणजे इथे राहणारे लोक भारताचे नागरिक आहेत आणि म्यानमारचे सुद्धा नागरिक आहेत.
१९७१ साली या गावातून बॉर्डर जाणार असे जाहीर झाले आणि येथील गावकऱ्यांचे धाबे दणाणले. पण स्थानिक प्रशासनाने अत्यंत सामंजस्याची भूमिका घेत गावाचे तुकडे न करता गाव होते तसे एकजूटच ठेवले. हे गाव तर प्रसिद्ध आहेच, पण इथे येणारे पर्यटक ते घर पाहायला येतात ज्यामधून दोन देशांची बॉर्डर जाते.
गावातील लोक नागालँड मधील सर्वात मोठ्या ‘कोन्याक नागा’ जमातीशी संबंधित आहेत. तर या जमातीचा जो प्रमुख आहे ‘अंघ’ ज्याला राजा देखील मानले जाते. तो सुद्धा या गावात राहतो आणि त्याच्याच घरामधून ही दोन देशांची बॉर्डर जाते. म्हणजे हा राजा आणि त्याचे कुटुंब जेवतात म्यानमार मध्ये आणि झोपतात भारतात असा हा प्रकार!
तर मंडळी असे हे अद्भुत घर आणि अद्भुत गाव पाहायला तुम्ही सुद्धा नक्की जा!
आम्ही कशाला निंदायला जाऊ तिकडे