तुम्हाला टायटल वाचून थोडा धक्काच बसला असेल ना? पण हे खरंय महाराष्ट्राच्या नकाशावर एक गाव असंही आहे जिथे स्थानिकांनी आपलं बस्तान गुहेमध्ये मांडलंय. या एका वाक्यावरून तुम्ही असा अंदाज बांधत असाल की हे एखादं उजाड गाव आहे, तर थांबा तुमचा अंदाज चुकतोय. हे गाव इतकं सुंदर आहे की पाहताक्षणी कोणालाही प्रेमात पाडेल. म्हणूनच की काय इथे येणाऱ्या पर्यटकांनी या गावाला महाराष्ट्राचे मॉरीशस असे बिरूद लावायला सुरुवात केली आहे.
चहूबाजूंनी छाया धरून असलेला सह्याद्री, भन्नाट वारा, सगळीकडे गर्द वनराई असं निसर्गाचं सर्वगुणसंपन्न वरदान या गावाला लाभलं असलं तरी दुर्दैव एकच की स्वातंत्र्याच्या ७० पेक्षा अधिक वर्षांनंतरही हे गाव महाराष्ट्रातील अतिदुर्गम गाव म्हणून ओळखलं जातं. या गावाचं नाव फोफसंडी होय.
अहमदनगर जिल्ह्याच्या टोकाला अकोले तालुक्यात वसलेलं हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळात पोप नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या सुट्टीचं ठिकाण होतं. तो इंग्रज अधिकारी एकदा इथे आला आणि कायमचं भान हरपून बसला. मग जेव्हा कधी रविवारी वेळ मिळे तेव्हा त्या अधिकाऱ्याची स्वारी याच फोफसंडी गावाच्या दिशने निघायची. असे सुद्धा म्हणतात की पोप हा संडेला या गावात यायचा म्हणून त्यावरूनच पुढे अपभ्रंश होऊन या गावाचे नाव फोफसंडी पडले.
या गावावर निसर्गाची इतकी छाया आहे की इथे सूर्योदय सुद्धा एक ते दोन तास उशिरा होतो. म्हणजे नगर जिल्ह्यातील एखाद्या गावात सूर्योदय ६ वाजता होत असेल तर फोफसंडी मध्ये सूर्यदेवाचे दर्शन सकाळी ७ वाजल्यानंतरच होते. पावसाळा सुरु झाला की इथल्या स्थानिकांची खरी धावपळ होते. पावसाळ्यात एकही दिवस असा जात नाही जेव्हा इथे पाउस होत नाही. कधी कधी तर आठवडा आठवडा भर पाउस घरातून बाहेर पडू देत नाही.
गावाची लोकसंख्या अंदाजे १२०० ते १४०० असून १२ वाड्या आणि १२ आडनावाचे लोक इथे राहतात हे या गावाचे अजून एक वैशिष्ट्य होय. गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या गावाच्या चहूबाजूंना असलेल्या डोंगराच्या पोटात अनेक निसर्गनिर्मित गुहा आहेत आणि त्या गुहांमध्ये गावातील काही कुटुंब आजही राहतात.
फार पूर्वी पासून हेच त्यांचं घर! निसर्गाने रेडीमेड दिलेलं छप्पर वाया न घालवता त्यांनी यातच आपला संसार थाटला. यामुळे पावसापासून आणि प्राण्यांपासून संरक्षण सुद्धा मिळू लागले. हळूहळू भल्या मोठ्या गुहेचे भाग करून त्यात स्वयंपाक घर, झोपण्याची जागा अशी तयार केली गेली. एवढचं काय तर गुहेतील या सर्व घरांत आत एक गोठा सुद्धा आहे. केंद्र सरकारकडून पक्कं घर बांधून मिळालं तर ठीक नाहीतर इथेच आयुष्य काढायचं अशी खंत येथील स्थानिकांच्या बोलण्यात प्रकर्षाने जाणवते.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या गावात वीज सुद्धा आताशी आलीये म्हणजे जास्तीत जास्त 15-20 वर्षांपूर्वी, पण ती सुद्धा पाहुण्यासारखी जात येत असते. जवळपास बाजाराचं ठिकाण नाही, ना कोणतं सार्वजनिक वाहतुकीच साधन! पाउस खूप लागतो पण सगळं पाणी वाहून जातं. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण म्हणजे सह्याद्रीतील गावांच्या पाचवीलाच पुजलेली!
तर एकंदर ही गावची स्थिती, आता कुठे हळूहळू गाव सुधारतंय! तरुण नोकरीसाठी शहरात जातायत, त्यामुळे घरात पैसा येतोय. गावातले काही सुशिक्षित आपल्या हक्कांसाठी आवाज उठवतायत. त्यामुळे सरकारचं लक्ष सुद्धा या गावाकडे आहेच. हळूहळू दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढत असल्याने बेरोजगारीचा प्रश्न सुटेल अशी गावकऱ्यांना आशा आहे.
अवघा महाराष्ट्र आधुनिकीकरणाच्या गप्पा मारतोय, पण फोफसंडी सारखी गावं मात्र कासवाच्या वेगाने बदलतायत हीच मेख आहे.
0 Comments