आजही दुचाकी वाहनं म्हटली की आपल्यासमोर पटकन बुलेट येते. रॉयल एनफिल्डची ही गाडी म्हणजे तरुणाईला आणि तरुण होऊन म्हातारवयाला लागणाऱ्यांना सुद्धा शान वाटते. पण मंडळी तुम्हाला या रॉयल एनफिल्डचा इतिहास माहित आहे का? शिवाय तुम्हाला हे सुद्धा माहित आहे का की रॉयल एनफिल्ड ही कंपनी १९९४ साली डबघाईला आली होती, पण आज तीच कंपनी मोटार सायकलींच्या विश्वात आपले पाय घट्ट रोवून बसली आहे, शिवाय अवघ्या २६ वर्षांच्या मुलाने रॉयल एनफिल्डला बुडण्यापासून वाचवलं होतं? तर रॉयल एनफिल्डचा असाच माहित नसलेला भूतकाळ आज आपण जाणून घेऊया.
रॉयल एनफिल्ड बाबत एक आश्चर्याची बाब म्हणजे रॉयल एनफिल्डने टीव्ही वर कधीच जाहिरात केली नाही. तरीसुद्धा आपल्या सगळ्यांनाच रॉयल एनफिल्डच्या गाडी बद्दल माहित आहे. रॉयल एनफिल्डची पॅरेण्ट कंपनी आयशर मोटर्स ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना दरवर्षी ४०% प्रॉफिट देते. हे असं गेले पाच वर्ष चालू आहे.
ही किमया घडवून आणली एका २६ वर्षांच्या तरूणाने, अर्थात तेव्हा त्याचे वय २६ वर्षे होते. हा तरुण म्हणजे रॉयल एनफिल्डचा सीईओ सिद्धार्थ लाल होय. जेव्हा सिद्धार्थ लालने रॉयल इन्फिल्ड कंपनी त्याच्या २६ व्या वर्षी चालवायला घेतली तेव्हा कंपनी डबघाईला आली होती. अवघ्या सहा महिन्यातच ती पूर्णपणे बंद झाली असती. मग सिद्धार्थ लालने अशी काय जादू केली कि रॉयल एनफिल्ड बायकर्स मध्ये आणि अख्ख्या जगात प्रसिद्ध झाली.? बरं नुसतीच जगप्रसिद्ध झाली नाही तर बाईक्सच्या दुनियेत रॉयल एनफिल्डने आपले असे काही नाव निर्माण केले की वर्षानुवर्षे ते पुसले जाणार नाही.
बहुतेकांना रॉयल एनफिल्ड ही भारतीय बाईक वाटते, पण तसं नाहीये. रॉयल एनफिल्ड ही एक ब्रिटिश कंपनी आहे. ही गोष्ट सुरू होते १८९१ सालापासून. रॉयल एनफिल्डने पहिली मोटार बाईक १९०१ साली बनवली. ही बाईक इतकी तगडी होती की दुसऱ्या महायुद्धात तिचा वापर झाला. महायुद्ध संपल्यावर ह्या बाईकची गरज संपली. शेवटी १९३२ साली रॉयल एनफिल्ड बुलेट नामक बाईक बाजारात आणली. नंतर रॉयल एनफिल्ड कडे दुसरा कुठलाच पर्याय उरला नाही. १९४९ साली मद्रास मोटर्स या कंपनीने रॉयल एनफिल्ड कंपनी विकत घ्यायची ठरवली.
मद्रास मोटरचे तेव्हाचे मालक होते के.आर. सुंदरम! रॉयल एनफिल्ड कंपनी ही बरेच वर्ष मद्रास मोटर्स कंपनीकडे होती. खूप वर्ष गेल्यानंतर आयशर मोटर्स चे मालक विक्रम लाल यांनी रॉयल इन्फिल्ड कंपनी विकत घेतली. पण त्यांचा हा निर्णय सगळ्यात धोकादायक ठरला. रॉयल एनफिल्ड कंपनी अतिशय डबघाईला आली होती.
सहा वर्षानंतर आयशर मोटर्स या कंपनीने असा निर्णय घेतला की रॉयल एनफिल्ड कंपनी विकून टाकायची. अशा परिस्थितीत विक्रम लाल यांचे सुपुत्र सिद्धार्थ लालने रॉयल एनफिल्ड कंपनी वाचण्याकरता एक शेवटची संधी मागितली. जी कंपनी तेव्हा डबघाईला जाणार होती आज तीच कंपनी सगळ्यात जास्ती मोटर बाईक विकते. सिद्धार्थ लालने असं नक्की काय केलं की ज्यामुळे कंपनी परत नावारूपाला आली आणि स्टॉक मार्केटमध्ये एकच कल्लोळ माजला?
तर सिद्धार्थ लाल ने फक्त तीन धोरणं राबवली. पहिलं धोरण – सिद्धार्थने खरेदीदारांच्या दृष्टिकोनातून रॉयल एनफिल्डकडे बघायला सुरुवात केली. सिद्धार्थने स्वत: रॉयल एनफिल्ड बाईक्स सह रोड ट्रिप्स करायला सुरुवात केली तेव्हा त्याला त्या बाईक मधील चुका आणि उणीवा जाणवू लागल्या. एक मालक म्हणून नाही तर एक ग्राहक म्हणून कंपनीच्या प्रोडक्टकडे पाहायला सुरुवात केल्यावर आपल्या बाईक मध्ये नेमक्या काय सुधारणा केल्या पाहिजेत हे सिद्धार्थने ओळखले.
उदाहरणार्थ रॉयल एनफिल्ड मध्ये उजव्या बाजूला गिअर शिफ्ट असल्यामुळे जे बायकर्स होते त्यांना खूप त्रास व्हायचा हे लक्षात आल्यावर त्यांनी हवी ती सुधारणा केली.
दुसरं म्हणजे रॉयल एनफिल्ड मध्ये किक स्टार्ट होतं. म्हणजेच रॉयल एनफिल्डची बाईक किकस्टार्ट ने सुरू व्हायची आणि ती किक इतक्या जोरात परत यायची की कधीकधी त्यामुळे बायकर्सच्या पायांना इजा व्हायची.
या व्यतिरिक्त लोकांना ही टुरिस्ट बाईक वाटायची. शिवाय बाईक खूप महाग सुद्धा वाटायची! फॉल्टी मॅन्युफॅक्चरिंगमुळे मेंटेनन्स कॉस्ट देखील जास्त होती. ह्या सगळ्या त्रुटी सिद्धार्थ लालने सुधारल्या आणि रॉयल एनफिल्ड नव्या ढंगात रस्त्यावर दिसायला लागली. ग्राहकांना बाईक मध्ये जो अनुभव हवा होता तो मिळायला लागला. हळूहळू पुन्हा रॉयल एनफिल्डचे मार्केट वाढू लागले आणि आता ते या लेव्हलला पोहोचले आहे की रॉयल एनफिल्ड हे नाव कधीच पुसले जाणार नाही.
तर अशी आहे ही रॉयल एनफिल्डची कहाणी, जी प्रत्येक उद्योजकासाठी प्रेरणादायी सुद्धा आहे!
0 Comments