राधा आणि कृष्णाची प्रेमकथा आपल्या सर्वांसाठीच एक आदर्श आहे. पण नेहमी राधा कृष्णाच्या गोष्टी ऐकल्यावर आपल्या मनात विचार येतो की राधा आणि कृष्णाचे एवढे एकमेकांवर नितांत प्रेम असूनसुद्धा त्यांचे एकमेकांशी लग्न का झाले नाही? याचं प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या काही दंतकथा प्रचलित आहेत ज्या फार कमी लोकांना ठावूक आहेत त्याच आपण आज जाणून घेऊयात!
आपण सगळे राधा आणि कृष्णाच्या प्रेमाच्या कथा ऐकत मोठे झालो आहोत. त्यांची मैत्री, प्रेम आणि एकजुट पाहून आपल्याला आपल्या आयुष्यात असे कोणीतरी असावे असे नेहमीच वाटत असते. या कथा आपण आपले आजी-आजोबा, पालक, शिक्षक किंवा दूरदर्शनवरील कार्यक्रम यांतून ऐकल्या आहेत. या कथांमधून सांगितलेल्या राधे कृष्णाच्या प्रेमाच्या वर्णनाने आपला प्रेमावर विश्वास जास्त दृढ झाला आहे. त्यांचे नाव आपल्यासाठी प्रेमाचे प्रतीक बनले आहे.
परंतु, एवढे पवित्र प्रेम असूनही राधा कृष्णाने लग्न का केले नाही असा प्रश्न आपल्या सर्वांनाच नेहमी सतावत असतो. एकमेकांसाठी एवढे परफेक्ट असताना देखील त्यांनी लग्न का केले नाही? ते एकमेकांशिवाय कसे जगू शकले? हे कोणते प्रेम आहे ज्यात नंतर कधीच आनंदाने एकमेकांसोबत राहता आले नाही? हे आणि असे अनेक प्रश्न राधाकृष्णाच्या कथा ऐकून आपल्या डोक्यात सुरू होतात.
त्यांनी लग्न का केले नाही याबद्दल अनेक कथा आपण आत्तापर्यंत ऐकत आलो आहोत. त्यातील काही कथा आपण वाचूयात. या कथा वाचुन आपल्याला आपल्या काही प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील.
श्रीदामाचा शाप
श्रीदामाने राधा आणि कृष्णाच्या दैवी प्रेमाला शाप का दिला त्यामागे अनेक कथा आहेत. त्यातील एक कथा अशी की, श्रीदामा हे भगवान कृष्णाचे निस्सीम भक्त होते. श्रीकृष्णाचे भक्त असूनही कृष्णाची प्रार्थना करण्यासाठी प्रथम राधाचे नाव घ्यावे लागते हे सत्य पचायला त्यांना अवघड जात होते. ‘राधे-कृष्ण’ हा शब्द उच्चारणेच त्यांना मान्य नव्हते. भक्ती ही प्रेमाच्या पलीकडे आहे आणि प्रेम हा एक विनोद आहे, असे त्यांचे मत होते. शिवाय, ते श्रीकृष्णाला जे काही अर्पण करत असत ते कृष्ण प्रथम राधा राणीला देत होता. यामुळे श्रीदामाला आणखी राग आला आणि त्याने राधाराणीला कृष्णाशिवाय १०० वर्षे राहण्याचा शाप दिला.
याबाबद्दलची दुसरी कथा असे सांगते की, एके दिवशी फक्त राधा राणीला चिडवण्यासाठी कृष्ण तिच्या इतर मैत्रिणींशी खेळकरपणाने बोलत होता. यामुळे राधाला नेहमीपेक्षा जास्त राग आला आणि तिने आपला राग कृष्णावर काढायला सुरुवात केली. हे सर्व श्रीदामाने पाहिले त्यांना राधा राणीचे वागणे योग्य वाटत नव्हते. त्यांनी तिला आणखी शाप दिला आणि म्हणूनच ती श्रीकृष्णापासून विभक्त झाली.
राधा आणि कृष्ण एकच आहेत.
अनेक कथा आपल्याला सांगतात की राधा आणि कृष्ण ह्या दोघांचे वेगवेगळे अस्तित्व नाही. राधा ही भगवान कृष्णाची ऊर्जा आहे जी त्याला प्रसन्न करते आणि कोणीही स्वतःच्या उर्जेशी लग्न कसे करणार? लग्न करण्यासाठी तुम्हाला दोन लोकांची गरज आहे, परंतु राधा आणि कृष्ण एक आत्मा होते, ते एकमेकांपासून वेगळे नव्हते, ते एकमेकांमध्ये राहतात आणि हे सिद्ध करण्यासाठी लग्नाची गरज नाही असे त्या काळी म्हटले जायचे.
रुक्मिणी ही लक्ष्मीचा अवतार होती.
भगवान कृष्ण हा भगवान विष्णूचा अवतार होता ज्याने कंसाचा अंत करण्यासाठी जन्म घेतला होता. रुक्मिणी देखील भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मीचा अवतार होती. रुक्मिणी आणि कृष्ण हे विष्णू आणि लक्ष्मी असल्यामुळे त्यांचे एकत्र येणे (लग्न करणे) हे नियतीनेच ठरवलेले होते. जरी कृष्ण राधाबरोबर खेळत मोठा झाला आणि तिच्या जवळ राहिला, तरीही रुक्मिणी ती होती जिच्यासोबत कृष्ण खऱ्या अर्थाने होता.
राधाचे प्रेम कधीच शारीरिक व शारीरिक अकर्षणाबद्दल नव्हते.
आजपर्यंत ऐकलेल्या अनेक कथा आपल्याला सांगतात की, राधा आणि कृष्णाने एकमेकांवर जीवापाड प्रेम केले. हे खरे आहे कारण हे सामान्य रोमँटिक प्रेम नव्हते. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते पण कोणत्याही शारीरिक अर्थाने नव्हते. ते फक्त आणि फक्त नितांत आणि शुद्ध प्रेम होते. कृष्ण सामान्य माणूस नाही हे राधा राणीला आधीच कळले होते. तो दैवी होता. भक्त जसे देवावर प्रेम करतो तसे तिने त्याच्यावर प्रेम केले होते. तिने त्याच्यावर वासनेने नव्हे तर भक्तीने प्रेम केले. तिचे कृष्णावरील प्रेम भौतिकतेच्या पलीकडे होते, कृष्णावरील तिचे प्रेम दैवी होते.
राधा आणि कृष्णाचे लग्न का झाले नाही यामागील ह्या काही कथा आहेत. या कथा वाचून आपल्याला राधाकृष्णाच्या प्रेमाला एवढा मान का आहे याचा अंदाज आलाच असेल.
0 Comments