उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. दिवसेंदिवस गर्मी वाढतच चालली आहे. या गरमीच्या दिवसांत थंडावा मिळावा म्हणून आपण कोल्ड ड्रिंक्स, उसाचा रस, लिंबू सरबत, आईस्क्रीम खात असतो. आईस्क्रीम तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. या भर उन्हाळ्यात रोज आईस्क्रीम दिले तरी कोणी नाही म्हणणार नाही. उन्हाळ्यातच काय पावसाळ्यात आणि थंडीतसुद्धा आईस्क्रीम खाणारी लोक आहेत.
ही आईस्क्रीम्स खूप वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये, रंगांमध्ये, चवींमध्ये तसेच वेगळवेगळ्या ब्रॅंडचे येतात. आपल्याकडे अमूल, वाडीलाल, क्वालिटी वॉल्स, अरुण अशा निरनिराळ्या ब्रॅंडचे आईस्क्रीम मार्केटमध्ये आहेत. आपल्या प्रत्येकाचा कोणता ना कोणता आवडता आईस्क्रीम ब्रँड आहे. चला तर मग जाणून घेऊया आईस्क्रीमच्या एका खूप नामांकित ब्रँडबद्दल.
अनेक फेमस आईस्क्रीम ब्रँड्सपैकी वाडीलाल आईस्क्रीम सगळ्यांच्याच आवडीचा आईस्क्रीम ब्रँड आहे. वाडीलालचे आईस्क्रीम हे पूर्णपणे दुधापासून बनवलेले आणि १००% शाकाहारी असतात. अगदी दहा रुपयांपासून २००-३०० रुपयांपर्यंत याचे आईस्क्रीम मार्केटमध्ये आहेत.
व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, राजभोग, ओरिओ हे आणि असे अनेक विविध फ्लेवर्समध्ये वाडीलालचे आईस्क्रीम्स प्रसिद्ध आहेत. कॅण्डी, आईस्क्रीम कप, कसाटा, कोन, फॅमिली पॅक असे वेगवेगळे प्रकार यात आहेत. इतक्या चवदार आणि सर्वांना खूश करणाऱ्या या आईस्क्रीम ब्रॅंडबद्दल थोडं जाणून घेऊयात.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच म्हणजे १९०७ मध्ये गुजरातमध्ये वाडीलाल गांधी यांनी वाडीलाल आईस्क्रीमची सुरुवात केली होती. आज वाडीलाल देशभरात एक प्रसिद्ध ब्रँड झाला आहे. त्यांनी या ब्रँडची सुरुवात फाऊंटन सोडा विकण्यापासून केली. त्यानंतर हळूहळू त्यांनी आईस्क्रीम बनवायला सुरू केली. पारंपरिक कोठी पद्धतीचा वापर करून ज्यामध्ये दूध, बर्फ आणि मीठ एकत्र करण्यासाठी हाताने चालणाऱ्या मशीनचा वापर केला जातो, त्याने आईस्क्रीम बनवण्यास सुरुवात केली. याच छोट्या पण वेगाने वाढणाऱ्या व्यवसायाचा वारसा वाडीलाल गांधींचा मुलगा रणछोड लाल गांधी यांनी पुढे चालू ठेवला.
रणछोड लाल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच वाडीलाल यांनी आईस्क्रीमवर जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली. वाडीलालने १९२६ मध्ये आपले पाहिले आईस्क्रीम आउटलेट उघडले होते आणि त्याच वर्षी पहिल्यांदाच त्यांनी जर्मनी येथून आईस्क्रीम बनवण्याचे मशीन आयात केले होते.
भारत स्वतंत्र होईपर्यंत कंपनीने शहरभर चार आउटलेट्स सुरू केले होते. १९७० च्या दशकात सुरुवातीला रणछोड लाल गांधींचे पुत्र रामचंद्र आणि लक्ष्मण गांधी यांनीही या व्यवसायात प्रवेश केला. त्यानंतर वाडीलालने अहमदाबादमध्ये १० दुकाने सुरू केली होती.
आता त्यांची पाचवी पिढी भारत आणि इतर ४५ देशांमध्ये २०० हुन अधिक फ्लेवर्स घेऊन वाडीलाल कंपनीचा वारसा पुढे जपत आहे. वाडीलालचा एक महत्वाचा यूएसपी असा की त्यांचे सर्व आईस्क्रीम १००% शाकाहारी आहेत.
अगदी छोट्या प्रमाणावर सुरू झालेल्या या कंपनीची २०१९ – २० या आर्थिक वर्षातील कमाई तब्बल ६५० कोटी रुपयांएवढी आहे. ९०च्या दशकाच्या सुरुवातीला कंपनीने प्रोसेस्ड फूडच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि वाडीलाल क्विक ट्रीट सुरू केले. तसेच, १९९५ मध्ये अमेरिकेच्या बाजारात फ्रोझन भाज्या आणणारा वाडीलाल हा पहिला भारतीय ब्रँड बनला होता. कंपनीची गुजरातमधील पुंध्रा येथील संपूर्ण स्वयंचलित आईस्क्रीम तयार करण्याची फॅक्टरी देशातील सर्वात मोठी फॅक्टरी आहे.
काय मग आपल्या आवडत्या वाडीलाल आईस्क्रीमचा इतिहास जाणून घेऊन खूप भारी वाटलं ना? आपण खात असलेल्या चवदार आईस्क्रीमच्या ब्रँडमागे एवढी मोठी खूप प्रेरणादायी कहाणी आहे. आता पुन्हा कधी वाडीलाल आईस्क्रीमचा आस्वाद घ्याल तेव्हा आवर्जून ही स्टोरी आठवा!
0 Comments