इंग्रज-शीखांचे पहिले युध्द संपून तीन वर्ष उलटली होती. शिखांचेच दोन कॅप्टन इंग्रजांना जाऊन मिळाले होते आणि त्यांना या युध्दात हार पत्करावी लागली, त्यामुळे शिखांच्या मनात ब्रिटिशांबद्दल विद्रोहाची आग खदखदत होती. महाराजा रणजीत सिंहांच्या कारकिर्दीत मुल्तान शिख साम्राज्याचा हिस्सा होता. मात्र युध्दानंतर इंग्रज धार्जिन मुल्तानचे गव्हर्नर मुलराज चोपडांनी स्वतंत्र सत्ता स्थापन केली होती. या युध्दात त्यांनी जम्मू-काश्मिरही गमवले होते.
१८८६ च्या तहाप्रमाणे ब्रिटिश रेसिडेंटचे वर्चस्व शिख दरबारावर कायम झाले आणि ब्रिटीश कंपनीने फ्रेडरिक क्यूरीला पंजाबचा गव्हर्नर बनवून शिखांच्या जखमांवर मीठ चोळलं. त्यातच मुलतानचा शिख अधिकारी मुलराजकडे लाहोर सरकारने हिशेब मागितले. पूर्वी ज्याप्रमाणे पंजाब कर भरायचा त्याप्रमाणेच त्यांनी ब्रिटिशांनाही कर द्यावा अशी मागणी क्युरीने केली. मुलराजने दीवानी पदाचा राजीनामा दिला, तो इंग्रज सरकारने लागलीच स्वीकारला. त्यानंतर नवीन शिख प्रशासक नेमण्यासाठी डलहौसीने दोन इंग्रज अधिकारी मुलतानला पाठवले. लोकांच्या मनात असंतोष धुमसत होता. त्यांनी या दोन अधिकाऱ्यांची हत्या केली.
मुलराजने इंग्रज सरकार विरुध्द बंड पुकारले. त्याचवेळी राणी जिंदनने पंजाब प्रांत स्वतंत्र करण्यासाठी हालचाल सुरु केली. परिणामी इंग्रजांनी राणीलाच हद्दपार केले. आणि बंडाची आग सर्वत्र पेटली.
१८४९ साली शिखांनी इंग्रजांविरुध्द प्रचंड उठाव केला. त्यामुळे डलहौसीने शिखांविरुध्द पुन्हा एकदा युध्द पुकारले. या युध्दात पेशावर परत मिळविण्यासाठी अफगाणांनी शिखांशी हात मिळवणी केली. क्युरीने खैबर पख्तूनख्वाच्या उत्तर-पूर्व भागातून हजारोंची सेना मुलतानकडे रवाना केली. हजाराचे गव्हर्नर छत्तर सिंह अटारीवाला यांचा मुलगा राजा शेर सिंह अटारीवाला या सेनेचे नेतृत्त्व करत होता. इथे शेर सिंह इंग्रजांच्या बाजूने लढत होता तर दुसरीकडे इंग्रज सरकारतर्फे काही अधिकारी छत्तर सिंहचा काटा काढण्याचा प्रयत्नात होते. अर्थातच हे जेव्हा शेर सिंहला कळाले तेव्हा त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढण्यास सुरुवात केली.
१८४९ मध्ये चिलिआनवाला येथे शिख विरुध्द ब्रिटीश अशी लढाई सुरू झाली. चिलिआनवाला म्हणजे आताच्या पाकिस्तान येथील पंजाब मधील मंडी बहुउद्दिन जिल्हा. १३ जानेवारीच्या सकाळी इंग्रज अधिकारी गॉफने सैन्यासह झेलमच्या दिशेने कूच केले आणि दुपारपर्यंत तो चिलियांवाला पर्यंत पोहचला. झेलमच्या किनारपट्टीवर ६ मैलांपर्यंत शिखांचे सैन्य पसरलेलं होतं. गॉफच्या अंदाजानुसार किनारपट्टीच्या मागच्या भागातल्या मधल्या काही जागा रिकाम्या होत्या. त्याला जागांना लक्ष्य करुन युध्द जिंकायचे होते.
शिखांची युध्दाची व्हूव रचना जबरदस्त होती. त्यामुळे गॉफने बांधलेला अंदाज चुकला. तो जिथे त्याची छावणी टाकणार होता त्याच्या नजदिकच शिखांची छावणी होती. त्यामुळे रात्रीतही त्याच्या छावणीवर हल्ला होण्याची भीती होती त्यामुळे गॉफने उसंत न घेता त्याच दिवशी युध्दाला सुरुवात केली.
इंग्रजसेना विरुध्द शिख असे घमासान युध्द झाले. कधी शिख तर कधी इंग्रज या युध्दात बाजी मारत होते. मात्र मागे कुणीच हटत नव्हते. या युध्दात शिखांचे ४००० सैन्य कामी आले. गॉफचे ७५७ शिपाई मारले गेले, १६५१ जखमी आणि १०४ गायब झाले होते.
या युध्दात नेमकं कोण जिंकलं हे सांगणं जरा कठीणच आहे. शिख सैन्याने गॉफची पुढची वाट अडून ठेवली होती. त्यामुळे शिखांनी स्वतःला विजयी घोषित केले. त्यानंतर शेर सिंह उत्तरे कडे निघून गेले. ब्रिटिश सेनेने तीन दिवसांनंतर त्या जागेवरुन तळ उठवला. त्यामुळे इंग्रजांचे म्हणणे पडले की शेर सिंहने आधी माघार पत्करली त्यामुळे त्यांचाच विजय झाला. खरंतर शेर सिंह यांनी अजून एक रात्र युध्द सुरू ठेवलं असतं तर शिखांचाच विजय होणे निश्चित होते. मात्र युध्दादरम्यान शिखांनी इंग्रजांचा झेंडा त्यांच्यासमोरच उद्ध्वस्त केल्यामुळे ब्रिटिश सेनेचे मनोबल खचले होते.
या लढाईची चर्चा थेट लंडनपर्यंत पोहचली होती. त्यामुळे झालेल्या नाचक्कीचे खापर गॉफवर फोडून त्याला सस्पेंड केलं गेलंआणि चार्ल्स नेपियरला कमांडर बनवले. मात्र चार्ल्स भारतात पोहचण्याआधीच २१ फेब्रुवारीला गुजरातमध्ये शिख- इंग्रजांची शेवटची लढाई झाली. ज्यामध्ये इंग्रजांनी बाजी मारली.
दोन्ही बाजूच्या सैन्याजवळ युध्द कैदी होते. हळू हळू त्यांची सूटका करण्यास सुरुवात झाली होती. पहिल्यांदा ब्रिटिशांच्या सैन्य तुकडीची शिखांनी सुटका केली. मात्र या सैनिकांच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंदाचा लवलेशही दिसत नव्हता. उलट शिखांपासून दूर जावं लागण्याचे दुःख चेहऱ्यावर झळकत होतं.
कारण शिखांच्या छावणीत दमून भागून आलेल्या ब्रिटिश सैनिकांचा चांगलाच पाहूणचार होत होता. जेव्हा पाहिजे तेव्हा खायला मिळायचे, इतकेच नाही तर मागितली तर ब्रॅंडीही मिळायची. शिखांचा उदारपणा इथेच थांबला नाही तर जेव्हा युध्द कैद्यांना त्यांनी परत ब्रिटिशांकडे पाठवलं ते रिकाम्या हाताने नाही तर चक्क प्रत्येकी १० रुपये आणि ब्रॅंडीच्या दोन बाटल्या दिल्या.
आहे की नाही शिखांचा स्वभाव दिलदार? ते भले युध्द हरले मात्र शत्रुंच्या सैन्याचं मन त्यांनी जिंकलं…!
0 Comments