किल्ला म्हणजे कोणत्याही राजाच्या आणि राज्याच्या अस्तित्वाचे संरक्षण करणारी वास्तू, त्यामुळे हा किल्ला जास्तीत जास्त भक्कम आणि अतिसंरक्षित असेल याची काळजी घेतली जायची. मात्र तरीही शत्रू जर चतुर असेल तर काही ना काही प्रयत्न करून तो किल्ला हाती घ्यायचाच. पण तुम्हाला माहित आहे का भारतात एक असा किल्ला आहे ज्याने त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक शत्रूला रडवले. नाही, हा किल्ला महाराष्ट्रात नाही, तर हा किल्ला आहे अलिशान राजवाड्यांची आणि किल्ल्यांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थान मध्ये!
रणथंबोर ह्या किल्ल्याचं नाव! सवाई माधोपुर शहरापासून जवळच वसलेला हा किल्ला इतिहासातील अजेय किल्ला म्हणून ओळखला जातो कारण आजवर कोणीही परकीय शत्रू लढाईत विजय मिळवून हा किल्ला काबीज करू शकला नाही. पण असे का? काय खास आहे या किल्ल्यामध्ये चला जाणून घेऊया.
रणथंबोर किल्ल्याचे निर्माण हे पाचव्या शतकात झाल्याचे सांगितले जाते. ह्या किल्ल्याचा खरा निर्माता कोण व कोणत्या राजाच्या काळात रणथंबोर किल्ला उभारला गेला ह्यावर मात्र अनेक जणांचे दुमत आहे. रणथंबोर किल्ला हा चारी बाजूनी उंच डोंगर व पर्वतांनी घेरलेला आहे, त्यामुळे या किल्यावर हल्ला अवघड होते. जरी कोणी शत्रू हल्ला करण्यास यशस्वी झाला तरी त्याला किल्ल्यात प्रवेश करणेही सोप्पे नव्हते, अशी या किल्ल्याची रचना आहे.
या किल्ल्याला परकिय आक्रमणांचा मोठा इतिहास आहे बरं का, म्हणजे पार कुतुबुद्दीन ऐबक पासून ते अकबरा पर्यंत कित्येक बादशहांनी रणथंबोर जिंकण्यासाठी अगदी लाख प्रयत्न केले, पण कोणालाच त्यात यश आले नाही. मात्र या सर्व परकीय सुलतानांमध्ये अल्लाउद्दिन खिलजीच्या आक्रमणाची आणि राजा हमीर देव यांच्या शौर्याची कथा इतिहासात अमर झाली.
त्याचं झालं असं की जेव्हा राजा हमीर देव चौहान यांच्या अधिपत्याखाली रणथंबोर किल्ला होता, तेव्हा सुलतान जलालुद्दीन खिलजी याने रणथंबोर किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अपयश आले. काही काळाने त्याचा पुतण्या अल्लाउद्दिन खिलजी याने आपला हाच काका जलालुद्दीन खिलजी याची हत्या केली आणि संपूर्ण भारताचा तो सुलतान झाला. अल्लाउद्दिन खिलजी हा अत्यंत हुशार मनुष्य, रणथंबोर आपल्याला जिंकता येणार नाही हे त्याला माहित होतं आणि त्याने सुद्धा कधी या किल्ल्याकडे पाहिलं नाही. पण नशिबाने वेगळाच खेळ लिहून ठेवला होता.
अल्लाउद्दिनचा खास मंत्री मोहम्मद शहा याचे अल्लाउद्दिनच्याच बेगमशी असलेले अनैतिक संबंध एकदा बाहेर आले आणि अल्लाउद्दिनने मोहम्मद शहाला पिटाळून लावले. पण त्याने सर्व राज्यांना ताकीद दिली की, “जो कोणी या गद्दाराला आश्रय देईल त्या राज्याला नष्ट केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.” तर हा मोहम्मद शहा फिरता फिरता आला रणथंबोर जवळ आणि राजा हमीर देवांनी त्याला आश्रय दिला. ही गोष्ट अल्लाउद्दिनला कळताच त्याने रणथंबोर उध्वस्त करण्याचा घाट घातला. पण रणथंबोर काही त्याला जिंकता येईना. कंटाळून त्याने रणथंबोर किल्ल्याचा नादच सोडून दिला. हा किल्ला हल्ला करून नाही तर कपट करून जिंकता येईल याची कल्पना त्याला आली.
त्याने राजा हमीर देव चौहानला संधीसाठी बोलावणे धाडले. यात काही काळेबेरे असल्याची शंका राजा हमीर यांना तेव्हाच आली. म्हणून त्यांनी आपले तीन खास सरदार अल्लाउद्दिनशी चर्चा करण्यासाठी पाठवले. अल्लाउद्दिनने या तीन सरदारांना सत्तेची लालच दिली आणि त्यांना आपल्या बाजूने वळवून घेतले. या सरदारांनी अनेक गुपिते फोडली आणि किल्ला ताब्यात कसा घ्यायचा ते अल्लाउद्दिनला सांगितले. ही गोष्ट कळताच राजा हमीर देव चौहान यांनी आता अल्लाउद्दिनला थेट किल्ल्याच्या लांब युद्धभूमीतच गाठण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या सर्व राण्यांना सांगितले होते की जर लढाईत काळा झेंडा वर फडकताना दिसला तर समजून जा आम्ही पराभूत झालो आहोत आणि तुम्ही सर्वांनी जौहर करा. लढाई झाली आणि राजा हमीर आणि त्यांच्या सैन्याने आश्चर्यकारक विजय मिळवला. पण इथे जे तीन सरदार होते त्यांनी एक शक्कल लढवली आणि राजा हमीर हरले आहेत हे भासवण्यासाठी काळा झेंडा फडकवला. तो झेंडा पाहून किल्ल्यातील राण्यांनी मोठा शोक करत जौहर केला. ही फसवणूक लक्षात येताच राजा हमीर इतके संतप्त झाले की त्या तीन सरदारांना स्वत:च्या हाताने कंठस्नान त्यांनी घातले. मात्र आपण जिंकूनही हरलो आहोत आणि आपल्या निष्काळजीपणामुळे आपले सर्व कुटुंब उध्वस्त झाले ही भावना त्यांन सलत होती आणि पश्चात्तापाच्या भावनेतून त्यांनी किल्ल्यावरील शिवमंदिरात जात स्वत:चे शीर कापुन भगवान शंकरांना अर्पण केले असे सांगितले जाते. यावरून दिसून येते की राजा हमीर देव चौहान किती स्वाभिमानी राजा होते आणि त्यांचा हाच गुण पुढे महाराणा प्रताप यांनी घेतला व कोणत्याच परकीय बादशहापुढे गुडघे टेकले नाहीत.
राजा हमीर देव अल्लाउद्दिन विरुद्धची लढाई जिंकले होते, पण त्यांनी स्वत:चे बलिदान दिले आणि अल्लाउद्दिनला ही गोष्ट कळताच त्याने लागलीच किल्ला ताब्यात घेतला. अल्लाउद्दिनला सुद्धा माहित होते की हा किल्ला त्याला शौर्याने जिंकता आलेला नाही. त्यामुळेच हा किल्ला जिंकल्याचा आनंद त्यानेही साजरा न केल्याचे सांगितले जाते.
म्हणजेच किल्ला ताब्यात येऊनही अल्लाउद्दिन हरला होता आणि रणथंबोर किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला.
पुढे सुद्धा आक्रमणांची मालिका सुरूच राहिली, पण कोणालाही विजय प्राप्त करून हा किल्ला ताब्यात घेता आला नाही. अशी आहे या अजेय किल्ल्याची महती!
0 Comments