भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांची स्वतःची काही न काही वैशिष्ट्य आहेत. शंकर भगवानांचे हिंदू धर्मात खूप मोठे स्थान आहे. शंकराला देवांचे देव महादेव असेही संबोधले जाते. जगभरात अनेक प्रचलित शिवमंदिरे आहेत आणि त्यांच्यामागे अनेक रहस्यमय कथा आहेत. परंतु, सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी सगळ्यात कमालीची गोष्ट राजस्थानमधील एका शिवमंदिरात दिसून येते.
राजस्थानमधील धौलपूर येथे अचलेश्वर महादेव शिवमंदिर आहे. या शिवमंदिरातील शंकराची पिंड दिवसातून चक्क तीन वेळा रंग बदलते. बसला ना हे ऐकून धक्का? आम्हालाही हे ऐकून असाच धक्का बसला होता. या अद्भुत चमत्कारासोबतच लोकांच्या इच्छा आणि मनोकामना देखील या मंदिरात पूर्ण होतात. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराचे रहस्य.
अचलेश्वर शिवमंदिर राजस्थानमधील धौलपूरच्या जंगलात स्थित आहे त्यामुळे इथे लोकांची वर्दळ कमी असते. पण श्रावण महिन्यात येथे खूप गर्दी पाहायला मिळते. काही लोकांचे असेही म्हणणे आहे की हे मंदिर हजारो वर्षे जुने आहे.
धौलपूरपासून ५ किलोमीटर अंतरावर चंबल नदीच्या किनाऱ्यावर अचलेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिर जवळजवळ १००० वर्षे जुने आहे. धौलपूर येथे राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार अचलेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग दिवसभरात तीन वेळा रंग बदलते. सकाळी याचा रंग लाल असतो, दुपारी याचा रंग केशरी होतो तर रात्री याचा रंग काळपट होतो. सगळ्यात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे, कोणतेही शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक देखील शिवलिंगाच्या या रंग बदलण्यामागचे खरे कारण समजू शकले नाहीत.
या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना कधी झाली याबद्दल कोणालाच काही महिती नाही. या मंदिराचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य हे आहे की या शिवलिंगाच्या खोलीचा अंदाज आजपर्यंत आलेला नाही. शिवलिंग जमिनीत किती खोल आहे हे जाणून घेण्यासाठी एकदा उत्खनन करण्यात आले. अनेक दिवस खोदकाम करूनही लोकांना त्याचा शेवट सापडलाच नाही आणि त्यानंतर खोदकाम बंद करण्यात आले.
या गूढ शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. जीवनातील कोणतीही समस्या या मंदिरात गेल्यावर दूर होते असाही त्यांचा समज आहे. इतकेच नाही तर शिवलिंगाच्या दर्शनाने वयात आलेल्या मुला-मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळतो असाही लोकांचा विश्वास आहे.
याच कारणामुळे अविवाहित मुलं आणि मुली येथे येऊन १६ सोमवार जल अर्पण करतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या आवडीचा जीवनसाथी मिळेल. या शिवमंदिरातील शिवाच्या कृपेने विवाहातील अडथळे देखील दूर होतात असेही लोकांचे म्हणणे आहे.
आहे की नाही खूपच आश्चर्यकारक ही शिवलिंगाची गोष्ट? काय मग तुमच्या आता पुढच्या ट्रिपसाठी हीच जागा ठरवा आणि तुम्हीपण अनुभवा ह्या मंदिराचा चमत्कार.
0 Comments