भारतातील चार धामांपैकी एक असलेले ओडीसा, पुरी येथील जगन्नाथ मंदिराची महती वेगळी काय वर्णावी! भारतातील सर्वात गजबजाट असलेल्या मंदिरांपैकी एक असलेले पुरीचे हे मंदिर प्रत्येक भाविकाने आयुष्यात एकदा तरी पहावे असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेले हे मंदिर आपल्या विविध वैशिष्ट्यांमुळे आणि विशेषत: रहस्यांमुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. आज आपण हीच रहस्ये जाणून घेणार आहोत. पण त्या आधी मंदिरा बद्दल काही खास माहिती जाणून घेऊ.
हे मंदिर भगवान श्रीकृष्णाचे रूप असलेल्या भगवान जगन्नाथांना समर्पित आहे. पण त्यांच्यासह श्रीबलभद्र आणि देवी सुभद्रा तसेच श्री सुदर्शन यांना देखील पूजले जाते. या मंदिराची स्थापना राजा अनंगभीमदेव यांनी केली होती. जगन्नाथ मंदिराचे सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे इथे दरवर्षी पार पडणारी रथयात्रा होय. ज्यासाठी जगभरातून भाविक पुरी मध्ये जमा होतात. जणू श्रीकृष्ण भक्तांचा येथे मेळाच भरतो. प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यातील शुल्क पक्ष द्वितीयेपासून रथयात्रेचा सोहळा सुरु होतो. जगन्नाथ मंदिरामधून गुंदेचा मंदिर येथे आपल्या मावशीच्या घरी ह्या तिन्ही देवता जातात अशी आख्यायिका या रथयात्रेमागे सांगितली जाते.
ह्या आख्यायिकेप्रमाणेच अनेक रहस्यमयी गोष्टी सुद्धा या मंदिराशी जोडलेल्या आहेत.
- जगन्नाथ मंदिराच्या वर एक ध्वज नेहमी फडकत असतो. मग आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा ध्वज नेहमी हवा ज्या दिशेने वाहते आहे त्याच्या उलट दिशेमध्येच फडकत असतो. आता असे का? याचे ठोस उत्तर आजही कोणाला देता आलेले नाही. या ध्वजाशी निगडीत अजून एक गोष्ट म्हणजे हा ध्वज दरोरोज बदलणे आवश्यक आहे. जर कधी चुकून हा ध्वज बदलला गेला नाही तर मंदिर १८ वर्षांसाठी बंद होईल.
- हा ध्वज बदलण्याचा सोहळा सुद्धा पाहण्यासारखा असतो. पण या सोहळ्यात एक गोष्ट अद्भुत आहे ती म्हणजे ध्वज बदलणारा व्यक्ती मंदिरावर चढताना मंदिराकडे पाठ करून चढतो. या मंदिरावर सरळ तोंड करून चढत नाहीत. मुख्य गोष्ट एक की अशा धोकादायक पद्धतीने चढावे लागत असून सुद्धा आजवर एकही दुर्घटना झालेली नाही.
- जगन्नाथ मंदिर हे अत्यंत मोठया क्षेत्रफळावर पसरले आहे आणि मंदिराची उंची तब्बल २१४ फुट आहे. तुम्ही मंदिराच्या खाली उभे राहून मंदिराचा कळस पाहू शकतच नाही. पण यापेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराची एवढी उंची असूनही कधीच मंदिराची सावली खाली पडत नाही. ही सावली नेहमी अदृश्य असते.
- मंदिराच्या कळसावर एक सुदर्शन चक्र आढळते. हे चक्र आकाराने खूप मोठे आहे. तुम्ही पुरी शहरात कुठेही उभे राहून हे चक्र पाहू शकता. पण अचंबित करणारी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठूनही हे चक्र पाहिले तरी ते तुम्ही समोरूनच पाहत आहात असे वाटते.
- आपण सुद्धा विज्ञानाच्या वर्गात शिकलो आहोत की सामान्यत: हवा ही समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वाहते आणि तुम्हाला सगळीकडेच ही गोष्ट दिसून येईल. पण पुरी शहरात याच्या उलट चित्र दिसून येते. इथे हवा जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहते. जे आजही न उलगडलेलं कोड बनून राहिलं आहे.
- तुम्ही कोणत्याही मंदिरावर पहा तुम्हाला पक्षी बसलेले दिसतील किंवा घिरट्या घालताना तरी दिसतील. पण जगन्नाथ मंदिर असे एकमेव असावे ज्यावर एकही पक्षी कधीच बसलेला आढळत नाही. याच कारणामुळे येथील प्रशासनाने मंदिरावरून विमान वा हेलिकॉप्टर जाण्यास देखील मनाई केली आहे.
- जगन्नाथ मंदिराचे स्वयंपाकघर जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर म्हणून ओळखले जाते. इथे ५०० आचारी आणि ३०० कर्मचारी काम करतात. या जागेची एक अद्भुत गोष्ट म्हणजे कितीही भक्तगण जरी मंदिरात आले, म्हणजे हजारो लाखो तरी कधीच भगवान जगन्नाथाचा प्रसाद कमी पडत नाही. पण जेव्हा मंदिर बंद होण्याची वेळ येते तेव्हा सगळा प्रसाद संपतो. हा प्रसाद सात भांड्यांमध्ये बनवला जातो. चुलीवर एकावेळी सात भांडी ठेवली जातात. पण थक्क करणारी गोष्ट म्हणजे सर्वात आधी पहिल्या भांड्यातील प्रसाद शिजतो आणि सर्वात शेवटी शेवटच्या भांड्यातील प्रसाद शिजतो.
- तुम्ही जेव्हा कधी जगन्नाथ मंदिराला भेट द्याल तेव्हा तुम्हाला अजून एक आश्चर्यकारक गोष्ट अनुभवायला मिळेल. या मंदिराला एक सिंह द्वार आहे. या द्वाराच्या बाहेर असताना तुम्हाला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. पण जेव्हा तुम्ही द्वारातून आत प्रवेश करता तेव्हा तुम्हाला समुद्राच्या लाटांचा काहीच आवाज ऐकून येत नाही.
- जगन्नाथ मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील मूर्ती दर १२ वर्षांनी बदलल्या जातात. त्यांच्या काही नवीन मुर्त्या स्थापन केल्या जातात. मूर्ती बदलण्याची प्रक्रिया सुद्धा रहस्यमयी आहे. मुर्त्या बदलताना पूर्ण शहरची लाईट घालवली जाते. मंदिरात कोणालाच येण्यासाठी प्रवेश नसतो. केवळ मूर्ती बदलणारे मुख्य पुजारीच यावेळी मंदिरात असतात.
- तुम्हाला जर भगवान श्रीकृष्णाचे देहावसान माहित असेल तर त्यांनी आपल्या शरीरातील हृदयाचा भाग इथेच सोडला होता आणि संपूर्ण शरीर पंचतत्वामध्ये विलीन झाले होते. असे म्हणतात कि तेच जिवंत हृदय आज जगन्नाथ मंदिरातील भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये आहे. जेव्हा मूर्ती बदलली जाते तेव्हा हे हृदय काढून नव्या मूर्तीत वसवले जाते. म्हणूनच संपूर्ण शहराची वीज घालवली जाते. जेणेकरून हे हृदय कोणाच्या नजरेस पडू नये कारण त्याची शक्ती डोळ्यांना सहन करण्यापलीकडली आहे व त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. मंदिरातील पुजारी हृदय बदलण्याच्या वेळेस म्हणूनच कोणाला आत येऊ देत नाहीत व स्वत: सुद्धा खूप खबरदारी घेतात.
तर मंडळी असे आहे हे अद्भुत मंदिर आणि आयुष्यात एकदा तरी या मंदिराचे दर्शन घ्याच!
0 Comments