मुंबईतील सगळ्यात भयानक जागा कोणत्या याची जर यादी काढली तर त्यात मुकेश मिल्सचे नाव सर्वात वर असेल यात शंकाच नाही. ही अशी एकमेव जागा आहे जिथे एक दोन नाही तर कित्येक वेळा लोकांना चित्र विचित्र अनुभव आलेले आहेत. मुंबईच्या अत्यंत पॉश अशा कुलाबा भागात अशी कोणती जागा आहे असे सांगितल्यावर लोकांना सहसा विश्वास बसत नाही, कारण हा संपूर्ण भाग गजबजलेला आहे. पण जेव्हा मुकेश मिल्सच्या कहाण्या कानावर पडतात तेव्हा काही वेळासाठी का होईना पण मुकेश मिल्स हे नाव मनात कुतूहल आणि भय दोन्ही उत्पन्न करते.

मुलीजभाई माधवानी नामक व्यापाऱ्याने १८७० साली मुकेश मिल्स बांधली. इस्टर्न आफ्रिकन हार्डवेअर नावाची एक कंपनी त्यांच्या मालकीची होती. कापड उद्योगाचे वाढते वर्चस्व पाहून त्यांनी व्यापाऱ्याच्या दृष्टीने पोषक अशा जागी मुकेश मिल्स उभारली. दक्षिण मुंबईत कुलाबा बंदराजवळ असणाऱ्या या मिल्स मुळे माधवानी यांना खूप नफा देखील झाला. त्यांचा व्यापार वाढू लागला. तेव्हाच्या दक्षिण मुंबईत ही एकमेव मिल होती. अनेक जण असे सुद्धा म्हणतात की इस्ट इंडिया कंपनीचा सुद्धा मुकेश मिल्सच्या उभारणी मध्ये मोटा वाटा होता.
१९८२ सालापर्यंत मुकेश मिल्स मध्ये सगळं काही सुरळीत सुरु होतं. पण एके दिवशी मोठी आग मुकेश मिल्स मध्ये लागली आणि मुकेश मिल्स कायमची बंद झाली. आजही ती आग का लागली, कोणी लावली या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. या आगीने अनेक रहस्यमयी प्रश्नांना तर जन्म घातलाच, पण सोबत अनेक चित्र विचित्र घटनांची मालिका सुद्धा या आगीपासूनच सुरु झाली.
अशा अडगळीत पडलेल्या आणि बंद झालेल्या जागांचे चित्रपट निर्मात्यांना फार वेड, त्यामुळे बॉलीवूडचे मुकेश मिल्सकडे लक्ष गेले नसते तरच नवल! एक डायरेक्टर आपल्या हॉरर फिल्मच्या शूट साठी एका भयाण लोकेशनच्या शोधात होता आणि त्याला मुकेश मिल्सची जागा त्यासाठी परफेक्ट वाटली. पण जशी शुटींग सुरु झाली तसे त्यांना अनेक चित्र विचित्र अनुभव येऊ लागले आणि एकाच दिवसात त्यांना गाशा गुंडाळायला लागला. ही सार्वजनिक झालेली पहिली घटना होय. इथून मुकेश मिल्स ‘भुतिया जागांमध्ये’ समाविष्ट झाली ती कायमसाठीच!

अजून एक कथा मुकेश मिल्स बद्दल सांगण्यात येते की शुटींग करताना लीड अभिनेत्रीचा अचानक आवाज बदलला आणि त्या आवाजात ती म्हणाली, “सब यहाँ से चले जाओ.” पूर्ण टीमला खात्री पटली की इथे काहीतरी भुताटकी नक्कीच आहे आणि त्यांनी सुद्धा तिथून धूम ठोकली.
लागोपाठ अशा घटना घडत असल्याने बॉलीवूडने मुकेश मिल्सला ब्लॅकलिस्टच केले होते. तेथे असणाऱ्या एका जुन्या वॉचमनला देखील अचानक मिल्सच्या आतून म्युजिक ऐकून येऊ लागले. त्या दिवशी तर कोणते शुटींग सुद्धा नव्हते. त्याने लांबून कोणाला तरी स्मोकिंग करताना सुद्धा पाहिले. पण त्याच्या शिवाय तिथे कोणीच नसल्याने तो इतका घाबरला की आत जाऊन नक्की काय सुरु आहे हे पाहण्याची त्याची हिंमतच झाली नाही.
अजून एक भयानक स्टोरी मुकेश मिल्स बद्दल सांगितली जाते की शुटींगच्या वेळीच अचानक एक १० वर्षांची मुलगी जमिनीवर लोळू लागली. तिचे हावभाव अत्यंत भयानक होते. पाहताक्षणी तिला कोणीतरी झपाटले असल्याचेच सर्वांना वाटले. पण जसे त्या मुलीला मिल्सच्या बाहेर नेण्यात आले तशी ती अगदी नॉर्मल झाली.
या सर्व घटनांवेळी उपस्थित असणारे साक्षीदार असंख्य असून आजही बॉलीवूड मध्ये चवीने अगदी रंगवून या घटना सांगितल्या जातात. एकाने एकाला सांगितली, मग दुसऱ्याने अजून एकाला असे करून या घटना सगळीकडे पसरल्या आणि मुकेश मिल्सबाबतचे भय वाढत गेले. आजही तेथे राहणारे लोक रात्रीच्या वेळीस या मिल्सच्या आसपास भटकत नाहीत. आसपास राहणारे सुद्धा विशिष्ट दिवशी मिल्सच्या आतून विचित्र आवाज येत असल्याचे अनुभव सांगतात.
आपण म्हणतो की वाईट शक्तीचा प्रभाव हा रात्रीचा असतो, तसे हे सगळे अनुभव रात्रीच्या वेळेसच आले आहेत. त्यामुळे आजही असे अनेक डायरेक्टर आहेत जे सकाळच्या वेळेस इथे शूट करतात आणि संध्याकाळ होण्याआधी पॅकअप करतात.

गेल्या काही वर्षांतील हम, हिरोपंती, बदलापूर, ओके जानु, यांसारख्या चित्रपटांतील काही सिन्सची शुटींग याच मुकेश मिल्स मध्ये झाली आहे. तब्बल १५० वर्षांपेक्षा जुना इतिहास असलेली मुकेश मिल्स सध्या स्वत:च मृत्युपंथाला लागली आहे. या पूर्ण मिल्सचे बांधकाम हे जीर्ण झाले असून कधीही कोसळण्याची शक्यता आहे. म्हणूनच सध्या या भागात शुटींगला बंदी घालण्यात आली आहे.
आता कधी तरी कोणतरी इथे एखादा प्रोजेक्ट घेऊन येईल आणि मुकेश मिल्स कायमसाठी जमीनदोस्त होईल पण तिच्या कहाण्या मात्र अजरामर राहतील!
0 Comments