प्लेगमध्ये झाला मुलाचा मृत्यू आणि त्यातूनच झाली दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना!

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. बुधवार पेठेत असणाऱ्या दत्त मंदिरात त्यांचे घर होते.


पुण्यातील मानांच्या गणपतींमध्ये महत्वाचे स्थान असणाऱ्या, नवसाला पावणाऱ्या तसेच संपूर्ण जगभर ख्याती पसरली आहे अश्या बुधवार पेठेच्या मध्यभागी असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना कशी झाली व कोणी केली आणि त्यामागील नेमका उद्देश काय होता? हे सगळंच जाणून घेणे अतिशय गमतीशीर आहे. श्रीमंत असला तरीही तेवढाच दानशूर आणि सर्वांच्या ईच्छा व मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ओळख आहे. अनेक गरजू लोकांच्या मदतीसाठी आणि सामाजिक संस्थाना पाठिंबा देण्यासाठी ‘दगडूशेठ हलवाई गणेश ट्रस्ट’ हे नेहमीच तत्पर कार्यरत असते.

पुणे शहराच्या अतिशय वर्दळीच्या भागात एका हलवायाने कसे या बाप्पाला स्थापन केले आणि कसे त्याला महत्व प्राप्त होत गेले आणि कसे त्याचे रूप पालटत गेले हे जाणून घेऊया.

काही वर्षांपूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. बुधवार पेठेत असणाऱ्या दत्त मंदिरात त्यांचे घर होते. त्याकाळी पुण्यात प्लेगची साथ आली होती. याच प्लेगच्या साथीमध्ये हलवाईंचा मुलगा मृत्यू पावला.

या घटनेमुळे दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई अतिशय कोलमडून गेले. दगडूशेठ यांच्या दुःखात पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना आधार देण्यासाठी त्यांचे गुरू माधवनाथ महाराज यांनी त्यांना दत्त महाराज आणि गणपती बाप्पा यांची मूर्ती तयार करून त्यांची पूजा करावयास सांगितली. तसेच, ही दोन दैवते तुमचे नाव तुमच्या मुलांप्रमाणेच भविष्यात उज्वल करतील अशी भविष्यवाणी देखील केली.

आपल्या गुरूंच्या सांगण्यावरून दगडूशेठ यांनी एक दत्त महाराजांची संगमरवरी मूर्ती आणि गणपती बाप्पाची मातीची मूर्ती बनवून घेतली. सगळ्यात विशेष आणि महत्वाची बाब म्हणजे या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा साक्षात लोकमान्य टिळक यांच्या हस्ते करण्यात आली होती. मूर्ती स्थापनेच्या वेळी पुण्यातील बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. काका हलवाई, नारायणराव बाजेवाले, नारायणराव भुजबळ, सरदार परांजपे यांसारखे अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात दगडूशेठ हलवाई गणपतीची ही सर्वात पहिली मूर्ती अजूनही आपल्याला पाहायला मिळते.

लोकमान्य टिळकांनी सर्व मराठी जनतेला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १८९४ साली केली. त्यानंतर दोन वर्षांनी १८९६ साली दगडूशेठ हलवाई बाप्पाची दुसरी मूर्ती तयार करून तिचा उत्सव होऊ लागला.

त्याकाळी लोकमान्य टिळकांच्या सोबतीने दगडूशेठ हलवाई यांनी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा तेथील नागरिकांनी पुढे कायम सुरू ठेवली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची पुढील जबाबदारी सुवर्णयुग तरुण मंडळाने घेतली. आधी बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाल्यामुळे १९६७ मध्ये अमृत महोत्सवानिमित्त गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला.

त्यानंतर सुवर्णयुग मंडळातील कार्यकर्त्यांनी १९६८ साली कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार शिल्पी यांच्याकडून आधीच्या मूर्तीसारखीच हुबेहूब नवीन मातीची मूर्ती बनवून घेतली. मूर्ती पूर्ण झाल्यानंतर शिल्पी यांनी ग्रहण संपेपर्यंत बाप्पाची आराधना करून, गणेश यंत्राची पूजा करून त्यांनतर मातीची मूर्ती बनविलेल्या ठिकाणी जाऊन विधिवत धार्मिक पूजा करून मूर्तीची स्थापना केली. नंतर ते पुजलेले गणेशयंत्र गणपती बाप्पाच्या पोटात ठेवले गेले.

Source: zeezest.com

आजही पुण्यात गेलेला माणूस दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट दिल्याशिवाय परत येत नाही. आजही ती मूर्ती तेवढीच सुबक किंबहुना त्याहूनही तेजस्वी आहे. मूर्तीची सुबकता पाहून कोणाचेही मन भाळले नाही तर नवलच! चला तर मग तुम्ही कधी मंदिराला भेट देत आहात?


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gayatri Gurav