नागोरी चहा म्हणजे काय? जाणून घ्या नागोरी चहाचा रंजक इतिहास!

मुंबईमध्ये प्रामुख्याने चहाची दोन भागात विभागणी व्हायची एक म्हणजे इराणी चहा आणि दुसरा म्हणजे नागोरी चहा.


कुठल्याही गावातून, शहरातून नाक्या-नाक्यावर चहाची टपरी पाहावयास मिळते. चहा पिणे इतके सहज रित्या होते की तो एक आपल्या जीवनातील किंवा दैनंदिन व्यवहारातील एक भाग असल्याचे वाटते. आपल्याला त्याची जाणीव होत नाही. चहा पिण्यासाठी कसलेही कारण लागत नाही किंवा कधी कधी कसलेही कारण चालते. मित्र भेटला म्हणून चहा पिणे, चहाची तल्लफ आली म्हणून चहा पिणे, किंवा नाश्ता, फराळ झाला की चहा पिणे हे अगदी सामान्यपणे होते. तर अश्या ह्या चहाच्या अनेक गोष्टी सुद्धा रंजक आहेत बरं का!

Source : foodviva.com

चहाची जाहिरात विविध तर्‍हेने होत असते. आजच्या जाहिरातीच्या युगात टीव्ही, रेडिओवर चहा बनवणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती लागतात. उकळत्या पाण्यात चहापावडर, थोडी साखर आणि दूध टाकले की चहा तयार होतो. असा तयार चहा विविध नावाने किंवा जाहिरातबाजीने विकला जातो. उदाहरणार्थ अमृततुल्य चहा, मसाला चहा, केटी, कडक चहा, काळा चहा म्हणजे डीकोशन.

काही अरब राष्ट्रात दालचिनी घातलेला काळा चहा आणि त्यात थोडीशी साखर घातलेली असा चहा पाहुण्यांना दिला जातो. चहा बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.

कुणाला स्ट्रॉंग आवडतो तर कुणाला लाईट चहा आवडतो तर कोणाला दुधाळ चहा आवडतो तर कुणाला बिन साखरेचा चहा आवडतो तर कोणाला मसाला चहा आवडतो तर काहीजण नुसता काळा चहा घेतात.

पूर्वी सर्वसामान्य लोकांसाठी इराण्याच्या हॉटेलात चहा मिळायचा. इराणी हॉटेलची खासियत अशी होती ती की तेथे बनमस्का, बनपाव मिळत असे. तसेच तेथे वापरले जाणारे फर्निचर, खुर्च्या आणि टेबले, तसेच भिंतीवर लावलेले आरसे हे अगदी टिपिकल असायचे. तेथे मिळणाऱ्या चहाची चव एक वेगळीच असायची.

बनमस्का किंवा बनपाव चहा बरोबर खाल्ला जायचा. आता इराणी रेस्टॉरंट हळूहळू नामशेष होत आहेत. काही मोजकीच इराणी रेस्टॉरंट नव्या स्वरूपात टिकून आहेत. इराणी रेस्टॉरंट मध्ये एकाच प्रकारचा चहा मिळत असे व त्याला एक विशिष्ट चव असते. चवीला थोडासा कडवट आणि भरपूर उकळलेला असा चहा.

चहाच्या टपर्‍या टाकणारे वेगवेगळ्या राज्यातील लोक आहेत. पण प्रामुख्याने दोन गटांची नावं पुढे येतात. मुंबईमध्ये प्रामुख्याने चहाची दोन भागात विभागणी व्हायची एक म्हणजे इराणी चहा आणि दुसरा म्हणजे नागोरी चहा.

इराणी लोक इराणमधून भारतात स्थायिक झालेले तर नागोरी मूळचे राजस्थानी मारवाडी. राजस्थानात हे संगमरवर म्हणजेच मार्बलचा व्यवसाय करत. त्यांच्या कित्येक पिढ्या मार्बलच्या व्यवसाय यात होत्या. काहींनी हा व्यवसाय चालू ठेवला तर काही मंडळी दुग्ध व्यवसायाकडे वळाली. ते गुजरातमार्गे मुंबईत आले व इथेच स्थायिक झाले.

नागोरींवर थोडाफार गुजरातींचा प्रभाव आहे. नागोरी दुग्धव्यवसायात असल्यामुळे दूध, दही विकत असत. कित्येक लोकं मलाई घातलेलं दूध पिण्यासाठी नागोरीच्या दुकानात जात. दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसाय बरोबर त्यांनी चहाचा व्यवसाय चालू केला. त्यांची खासियत अशी की ते गाईचं ताजं दूध चहा साठी वापरतात त्यामुळे यांचा चहा हा एकदम वेगळा आणि छान लागतो. चहा बनवण्याची त्यांची स्वतःची एक पद्धत आहे. साधारणतः दुधाळ चहा, गोडसर चव आणि कुठलेही मसाले विरहित. हे त्यांचे वेगळेपण चहा पिणाऱ्यांना त्यांच्याकडे आकर्षित करते. यांच्या दुकानात चहा मिळतो आणि गरम गरम दूध हवे असेल तर तेही मिळते.

यांच्या चहाची लज्जत एकदातरी अनुभवावी. चला तर छान अनुभव घेऊयात का? तसे असेल तर चला. अरे दोन कटिंग प्लीज.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *