हिंदू धर्मात गणेश हेच आद्य दैवत आहे. बाप्पाची विविध रुप आपल्याला मोहून टाकतात. बालगणेश, मोरावर बसलेला मयुरेश्वर असो की मुषकावर रुढ झालेला आपला लाडका बाप्पा. हल्लीतर आपल्याला लंबोदर स्वरुप गणेशापासून ते अगदी सीक्स पॅक असलेला बाप्पाही पाहायला मिळतो. महाराष्ट्राचं तर आराध्य दैवत आहे. पण तुम्हाला माहितच असेल इंडोनेशियासह अनेक आशियाई देशात बाप्पाच्या मुर्ती सापडल्या आहेत. या मुर्तींमध्येही बप्पाची वेगवेगळी रुपं पाहायला मिळतात.
आज आपण जपानी बाप्पाबद्दल माहिती घेऊया. तुम्हाला ठाऊक आहे का जपानमध्ये सुध्दा आपल्या गणपती सारखा दिसणारा बाप्पा आहे. आणि त्यालाही मोदकांसारखाच नैवेद्य दाखवला जातो.
जपानमधल्या बाप्पाला गणपती म्हणून संबोधत नाही. तर कांगितेन, शोतेन, बिनायकतेन किंवा गनाबा या नावांनी त्याला ओळखतात.
त्याचेही मस्तक हत्तीचे आणि बाकीचं शरीर मानवाचं आहे. आपल्या बाप्पाचे मिळते जुळते स्वरुप असलेल्या या देवतेची पूजा जपानी लोक अनेक शतकांपासून करत आली आहे. भारतातला बौध्द धर्म चीनमार्गे जपान पर्यंत पोहचला. तेव्हा भारतातील विचारधारा, प्रथांसह अनेक प्रतीकं, चिन्हंही या देशांमध्ये पोहचली. गणपती देवता ही त्यातलीच एक.
जपानी लोक बुध्दिस्ट दैवत म्हणून गणेशाची पूजा करतात. साधारणतः ८ व्या शतकात बौध्द भिक्खू कोबो दाईशी यांच्यामुळे जपानमध्ये गणेश पूजनाची प्रथा रुजू झाली. त्यातूनच गणाबाची आणि बिनायका-तेन असं बाप्पाचं नामकरण झालं असावं. पण कांगितेन किंवा शोतेन स्वरुपातला बाप्पा इथल्या लोकांना अधिक जवळचा वाटतो.
बाप्पाचे कांगितेन किंवा शोतेन स्वरुप मात्र वेगळं आहे बरं. कारण स्त्री आणि पुरुष दोन रुपातील गणेश एकमेकांना अलिंगन देतानाची मुर्ती म्हणजे कांगितेन वा शोतेन रुप. हे रुप सहजासहजी कुठेही पाहायला मिळत नाही. एखाद्या गूढ किंवा तांत्रिक देवाची मुर्ती कशी सहज दर्शनी पडत नाही तसंच कांहितेन स्वरुपातली मुर्तीच दर्शन भक्तांना होणं दुर्मिळचं.
आता तुम्हाला ही मुर्ती पाहण्याचा मोह झाला असेल ना? ब्रिटीश म्युझियममध्ये एक कांगितेनची मूर्ती संग्रही ठेवली आहे. बाकी एरवी तुम्ही जपानला जरी गेलात तरी तुम्हाला ही मूर्ती किंवा त्याचे फोटो मिळणार नाहीत.
आपल्याकडे जसे सत् युग किंवा अत्ताचे कलयुग वगैरे काळाचे खंड आहेत तसंच जपानी लोकांच्या नारा युगापासून या देवतेची उपासना केली जाते. जपानींसाठीही तो विघ्नहर्ताच आहे. तसचं ही देवता त्यांच्यासाठी संपत्ती आणि प्रजोत्पादनाचं प्रतीकही आहे. त्याकाळी कांगितेनची हजारो मंदिरं होती असं म्हटलं जातं. मात्र कालांतराने ही गुप्त देवता झाली. आताही टोकियोमध्ये कांगितेनचं मंदिर आहे आणि इथली लोकं त्याची मनोभावे पूजा करतात.
व्यापारी लोक भरभराट व्हावी म्हणून छोटे बटवे कांगितेनला वाहतात. तर तरुण तरुणी लग्नाची मनोकामना करत कांगितेनाची पूजा करतात. त्यावेळी त्याला दाईकोनाचा म्हणजेच एक प्रकारचा जपानी मुळा आहे तो प्रसाद म्हणून चढवला जातो. आपल्या महाराष्ट्रात तर बाप्पा म्हटलं की मोदकांचा प्रसाद हे प्रत्येकाच्या मनी ठसलं आहे.
महाराष्ट्रातल्या मोदकाप्रमाणेच जपानी भक्त कांगितेनला कांगिदान अर्पण करतात. आपण मोदक करताना, पारीत सारण भरुन त्याला कळ्या पाडून सगळ्या एकत्र जोडतो. तर कांगिदानाची पोटली बांधली जाते. आपल्याकडे सारणात गुळ खोबरं असंत तर जपानमध्ये रेड बिन्सची गोडट पेस्ट वापली जाते. आपण तळणीचे आणि उकडीचे दोन पध्दतीत मोदक करतो तिथे कांगिदान तळले जातात.
कसंल भारी आहे ना? आपला बाप्पा तिथे पोहचला. जपानी लोकांनीही त्याच भक्तीभावाने त्याची पुजा केली. दोन संस्कृतींच झालेलं मीलन हे मनाला सुखद धक्का देणारं आहे.
0 Comments