लहानपणापासून आपण शिकत आलोय की वर्षातले महिने १२, मग ते वर्ष इंग्रजी असो की मराठी दोन्हीकडे बाराच महिने आहेत. शिवाय संपूर्ण जग सुद्धा याच १२ महिन्यांवर चालतं आहे. मग हा असा कोणता देश आहे जिथे १३ महिन्यांचे चक्र पाळले जाते? आणि हा देश जगात जे साल सुरु आहे त्याच्या कित्येक साल मागे कसा काय? काय आहे ही डोकं चक्रावणारी गोष्ट?
या देशाचे नाव म्हणजे फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथियोपिया होय. हा तो देश आहे जो जगातील सर्वात प्राचीन देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आफ्रिका खंडामध्ये जेवढी वारसास्थळे आहेत त्यापैकी सर्वाधिक वारसास्थळे ही इथियोपिया या देशातच आहेत. इतिहासामधील नोंदीनुसार या देशाची स्थापना इसवी सन पूर्ण ९८० मध्ये केली गेली होती. तेव्हा हा देश एबीसिनीया ह्या नावाने ओळखला जायचा.
अत्यंत प्राचीन देश असल्यानेच आजही या देशातील लोक आपल्या पुर्वजांच्या कित्येक रूढी, परंपरा अत्यंत अभिमानाने पाळतात. यापैकीच एक प्रथा आहे कॅलेंडरची! तुम्हाला सुद्धा कल्पना असेल की पूर्वी जग हे ज्युलियन कॅलेंडरवर चालायचे. हे कॅलेंडर म्हणजे प्राचीन काळातील रोमन सौर कॅलेंडर आहे. रोमन सम्राट ज्युलियस सीझरने या कॅलेंडरची सुरुवात केली होती.
तब्बल १६०० वर्षे पाश्चिमात्य जग वा ज्या देशांत ख्रिस्ती धर्म प्रमुख होता त्या देशांत ज्युलियन कॅलेंडर वापरले गेले. मात्र हळूहळू या कॅलेंडर मधील अनेक त्रुटी कित्येक विद्वानांनी जगापुढे आणल्या आणि १५८२ साली ज्युलियन कॅलेंडर अधिकृतरीत्या संपुष्टात येऊन त्या जागी ग्रेगोरीयन कॅलेंडर वापरण्यास सुरुवात झाली. हेच कॅलेंडर आपण आजही वापरतो आहोत.
पण काही देश असे होते ज्यांनी ना कधी ज्युलियन कॅलेंडर वापरले आणि न कधी ग्रेगोरीयन कॅलेंडर वापरले. त्यांचे स्वत:चे कॅलेंडर होते. १५८२ साली जागतिक पातळीवर ग्रेगोरीयन कॅलेंडर वापरले जावे अशी भूमिका बहुतांश देशांनी घेतली. पण इथियोपिया मात्र आपल्या इथियोपियन कॅलेंडर वर ठाम राहिला आणि आजही हा देश आपल्या पुर्वजांनी दिलेले इथियोपियन कॅलेंडरच वापरतो.
इथियोपियन कॅलेंडर मध्ये एकूण १३ महिने असतात. यापैकी १२ महिन्यांमध्ये ३० दिवस असतात. शेवटच्या महिन्यात मात्र फक्त ५ किंवा ६ दिवसच असतात. या महिन्याला पाग्यूमे असे म्हटले जाते. इथियोपियन कॅलेंडर मध्ये या शेवटच्या महिन्याचे महत्त्व हे की जे दिवस १२ महिन्यांमध्ये कोणत्याही कारणाशिवाय पकडले गेले नाहीत ते काही मोजके दिवस या महिन्यात पाळायचे. इथियोपियन कॅलेंडर नुसार त्यांचे नवीन वर्षे १० किंवा ११ सप्टेंबरला सुरु होते.
तर याच काही अधिकच्या दिवसांमुळे झाले काय की जगात जे ग्रेगोरीयन कॅलेंडर सुरु होते त्यांच्या तुलनेत इथियोपियाचे कॅलेंडर मागे पडत गेले आणि आता हा फरक पावणे आठ वर्षे इतका झाला आहे. म्हणजेच जगापेक्षा इथियोपिया हा देश पावणे आठ वर्षे मागे आहे.
आज आपण २०२१ या वर्षात जगत आहोत, तर तिकडे इथियोपिया मध्ये मात्र अजून २०१४ सालच सुरु आहे. यामुळे इथियोपिया देशाला काही समस्या भोगाव्या लागतात का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. कारण तिथे फक्त अधिकृत आणि सरकारी कामकाजात इथियोपियन कॅलेंडर वापरले जाते. पण जेव्हा त्यांचे नागरिक वा हा संपूर्ण देश जागतिक पातळीवर येतो तेव्हा मात्र त्यांना ग्रेगोरीयन कॅलेंडरनुसारच चालावे लागते. तिथे इथियोपिया मध्ये नागरिक आपल्या इथियोपियन कॅलेंडरचा आग्रह धरू शकत नाही.
अशी आहे ही या आगळ्या वेगळ्या देशाच्या आगळ्या वेगळ्या कॅलेंडरची गोष्ट!
0 Comments