सामान वाहून नेणारी कार्गो शिप जेव्हा इजिप्तच्या सुएझ कॅनलमध्ये (कालव्यामध्ये) अडकली तेव्हा संपूर्ण जगभरात त्याची चर्चा रंगली. प्रत्येकालाच सुएझ कालव्याबद्दल माहिती आहे, परंतु या भव्य बांधकामाला पूर्ण होण्यास १० वर्षे लागली आणि त्यामागे एक आकर्षक इतिहास आहे जो आपली उत्सुकता आणखी वाढवू शकतो. आम्ही सुएझबद्दलची अशीच कोणालाही माहीत नसलेली माहिती तुमच्यासाठी आणली आहे.
सुएझ कॅनल (कालवा) हा ईजिप्तमधील एक कृत्रिम कालवा आहे जो भूमध्य समुद्र व लाल समुद्राला जोडतो आणि आफ्रिका आणि आशियाचे विभाजन करतो. डिसेंबर १८६९ मध्ये याचे उदघाटन करण्यात आलेले आहे आणि याला जगातील सर्वात मोठी औद्योगिक कामगिरी म्हणूनही ओळखले जाते. हा कालवा युरोप आणि आशिया यांच्यातील व्यापाराचा महत्वाचा मार्ग मानला जातो. या कालव्यामुळे युरोप आणि आशियातील अंतर लक्षणीयरीत्या कमी झाले आहे आणि त्यामुळे जागतिक व्यापार आणि ट्रान्सलांटिक वाहतुकीस प्रोत्साहन मिळाले आहे.
इजिप्तच्या सुएझ कालव्यावरील संकट आणि त्यातील भारताचे योगदान याबद्दलची गमतीदार कहाणी:
जेव्हा भारताने डिसेंबर १९६१ मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोवा राज्याविरोधात युद्ध पुकारले तेव्हा अमेरीका आणि पोर्तुगाल या दोघांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) युद्धविरामाचा ठराव मांडला.
सोव्हिएत युनियनने या ठरावाच्या विरोधात व्हेटोची (VETO) शक्ती वापरली आणि इजिप्तने पोर्तुगीज नौदलाला सुएझ कालव्यावर रोखले. क्युबामध्ये झालेल्या ‘बे ऑफ पिग्स’ या घटनेवरून प्रेरणा घेऊन भारताने पोर्तुगाल सैन्याकडून गोवा राज्य परत घेण्याची योजना आखली.
पोर्तुगीज पंतप्रधान सालाझार या योजनेबद्दल ऐकून खूप संतापले आणि त्यांनी गोव्यातील पोर्तुगीज सैनिकांना तिकडील शेवटचा माणूस मरेपर्यंत लढण्याचे आदेश दिले. पोर्तुगीज सैनिकांनी गोव्यात आपले तळ ठोकायला सुरुवात केली. त्यानंतर सालाझारने पोर्तुगीज नौदल भारतात रवाना केले.
सालाझारने एक खूप दिमाखदार योजना केली होती. या योजनेप्रमाणे, पोर्तुगीज नौदलाने भारतात जाताना सुएझ कालवा ओलांडला आणि भारतीय नौदलाशी छोटीशी चकमक केली तर नाटो (NATO) सैन्याला मदतीसाठी बोलावले जाऊ शकते. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) ज्याला नॉर्थ अटलांटिक अलायन्सदेखील म्हणतात. ही ३० सदस्य राष्ट्रांमधील एक आंतरसरकारी लष्करी युती आहे आणि पोर्तुगाल नाटोचा संस्थापक सदस्य असल्यामुळे नाटो सैन्य पोर्तुगालच्या मदतीला येईल असा विश्वास सालाझार यांना होता.
इजिप्तचे पंतप्रधान गमाल अब्देल नासरच्या आदेशानुसार इजिप्तने पोर्तुगीज नौदलाला सुएझ कालव्यातच थांबवले आणि त्यामुळे सालाझारची योजना फसली. नासरच्या या अभूतपूर्व हालचालीने नाटो आणि यूएसला धक्का बसला.
१९५६ साली दोन माजी महासत्ता ब्रिटन आणि फ्रांस यांनी सुएझ कालवा मिळवून नासर राजवटीचा पाडाव करण्याचा प्रयत्न केला. या सुएझ संकटाच्या वेळी भारताने इजिप्तला पाठिंबा दिला होता. नासरने इंग्रजांच्या मालकीत असलेल्या सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे संकट त्यांच्यावर उद्भवले होते.
सालाझारला हे माहीत होते की सुएझ कालवा नियंत्रित करणे म्हणजे जागतिक व्यापारावर अंशतः नियंत्रण करणे. ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने इस्त्राईलसोबतच इजिप्तवरही आक्रमण केले. जेव्हा सोव्हिएतने इजिप्तच्या बाजूने लढण्याची धमकी दिली तेव्हा अमेरिकन अध्यक्षांनी ब्रिटन आणि फ्रान्सला माघार घेण्याचे आदेश दिले. या संकटाने नासरला अरब जगातील एक शक्तिशाली नायक बनवले. भारतीय सैन्याची एक तुकडी (शांतिरक्षणासाठी पाठवलेली भारताची पहिली तुकडी) १५ नोव्हेंबर १९५६ रोजी सुएझसाठी रवाना झाली आणि नंतर सिनाई द्वीपकल्पात ठेवण्यात आली.
सुएझ कालवा रोखून १८ डिसेंबर १९६१ मध्ये गोवा, दीव आणि दमण पोर्तुगीजमुक्त करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना इजिप्तने पाठिंबा दिला. या सर्व घडामोडींमुळे नाटो संतप्त झाले. यूएसए आणि नाटो यांनी १९६० आणि १९७० च्या दशकात इजिप्त आणि भारत दोघांनाही कमकुवत करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. १९५६ च्या या सुएझ संकटाची इतिहासात ब्रिटिश साम्राज्याच्या मृत्यूची घटना म्हणून नोंद झाली. त्यात भारताची खूप महत्त्वाची भूमिका होती.
जागतिक व्यापाराचे केंद्रस्थान असणाऱ्या सुएझ कालव्याबद्दलचे असे आहे हे एक सत्य जे फार कमी लोकांना ठावूक आहे आणि इतिहासाच्या पटलाखाली हरवत चालले आहे.
0 Comments