अगदी ट्रेलर पासूनच उत्सुकता वाढवणाऱ्या आणि रिलीज नंतर अपेक्षे प्रमाणे रसिक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या ‘जय भीम’ चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. तुम्ही सुद्धा हा चित्रपट पाहिला नसेल तर आवर्जून पहा. अगदी सुरुवातीच्या पहिल्या मिनिटापासून ते चित्रपट संपण्याच्या शेवटच्या मिनिटा पर्यंत हा चित्रपट तुम्हाला जागेवरून हलू सुद्धा देणार नाही.
भारतात जाती व्यवस्था किती खोलवर रुजली आहे आणि त्याचा प्रभाव एखाद्याच्या आयुष्यावर, त्याच्या कुटुंबावर किती खोलवर होऊ शकतो याचे वास्तववादी चित्रण ‘जय भीम’ मधून घडते. एक आदिवासी जमातीमधील स्त्री आपला पती पोलीस कस्टडी मधून गायब झाला म्हणून त्याला शोधून काढण्यासाठी ‘चंद्रु’ नावाच्या वकिलाकडे मदत मागण्यासाठी येते. पण ही केस दिसते तितकी साधी नाही हे तो वकील ओळखतो आणि जंग जंग पछाडत कायद्याच्या चौकटीत राहूनच त्या स्त्रीला कसा न्याय मिळवून देतो ही या चित्रपटाची कहाणी!

पण तुम्हाला माहित आहे का चित्रपटात घडलेली घटना ही प्रत्यक्षात घडली होती आणि पिडीत कुटुंबाला न्याय हा ज्या वकिलानेच मिळवून दिला होता. त्यांचे सुद्धा नाव होते ‘चंद्रु’..!
त्याच घटनेवरून प्रेरणा घेऊन आणि ज्या वकिलाने ही केस जिंकून इतिहास घडवला होता त्यांना मानवंदना देण्यासाठी सुपरस्टार सूर्याने ‘जय भीम’ चित्रपट बनवला आहे. आज आपण पडद्यामागील त्या खऱ्याखुऱ्या चंद्रु वकिलांची कहाणी जाणून घेऊया.
चंद्रु यांना के. चंद्रु म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म तामिळनाडूच्या श्रीरंगमचा, डाव्या विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव असल्याने साहजिकच सामाजिक कार्यात ते ओढले गेले. जाती व्यवस्था किती घाणीने बरबटलेली आहे हे त्यांनी अगदी जवळून पाहिले आणि तेव्हाच त्यांनी वकिलाचा कोट अंगावर चढवून पिडीतांना व गरिबांना न्याय मिळवून देण्याचे व्रत हाती घेतले. विशेष गोष्ट म्हणजे पैश्यांसाठी ते कधीच लढले नाहीत. कित्येक केसेस ते फुकटात लढले. त्यांना फक्त एकाच गोष्टीशी देणेघेणे असायचे, ती गोष्ट म्हणजे सत्य!
समोरचा पिडीत खरंच संकटात आहे आणि तो आपल्याशी सत्य बोलतो आहे याची खात्री पटल्यावरच ते केस घ्यायचे आणि त्या पीडिताला न्याय मिळवून द्यायचे. ज्यांना कायद्याचा आधार नाही, त्यांचा कायदा म्हणजे के. चंद्रु अशी तेव्हा जणू त्यांची ओळखच बनली होती. पण १९९५ साली एक आगळीवेगळी केस त्यांच्याकडे आली आणि भारतीय न्यायालयीन इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले.

तामिळनाडू मधील ‘इरुलार’ या आदिवासी जमातीमधील एक स्त्री चंद्रु यांच्याकडे आली आणि तिने सांगितले की, एका चोरीच्या प्रकरणात तिच्या नवऱ्याला आणि अजून २ जणांना पोलिसांनी खोटे आरोप करून पकडून ठेवले होते आणि अचानक पोलीस म्हणत आहेत की ते तिघे जण पोलीस कोठडीमधून फरार झाले. मात्र तिला खात्री होती की हे शक्य नाही कारण पोलिसांनी त्या तिघांना इतके बेदम मारले होते की त्यांच्यात त्राणच नव्हते. चंद्रु यांना त्या स्त्रीवर लगेच विश्वास बसला. कारण तेव्हा तामिळनाडू मध्ये ज्या केसेस पेंडिंग असत त्या पूर्ण झाल्या हे दाखवण्यासाठी पोलीस अशा गरीब निष्पाप आदिवासी लोकांना पकडून त्यांच्या नावावर केसेस चढवायचे. अशा आधी सुद्धा काही केसेस के. चंद्रु यांनी लढवल्या होत्या. ही केस सुद्धा याच प्रकारातली आहे आणि पोलिसांनीच त्या तिघांना लपवून ठेवले आहे असा संशय त्यांच्या मनात दाटला.
आपले कायदेशीर ज्ञान आणि सगळी शक्ती पणाला लावून या रहस्यमय केसची एक एक गाठ उलगडत त्यांनी ही केस सोडवून दाखवली आणि आरोपींना गजाआड सुद्धा केले. आता ही केस त्यांनी कशी सोडवली हे इथेच सांगून तुमचा भ्रमनिरास आम्हाला सुद्धा करायचा नाही. त्यामुळे तुम्ही पुढची कहाणी ‘जय भीम’ चित्रपटातच पहा.

१९९५ साली या केसने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते आणि जेव्हा के. चंद्रु ही केस जिंकले तेव्हा पोलीस प्रशासनाचे वाभाडे निघाले, पण सामान्य माणसाचा न्यायव्यवस्था आणि कायद्यावरील विश्वास मात्र दृढ झाला. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांनी तब्बल ९६००० खटल्यांमध्ये योगदान दिले आहे आणि यापैकी सर्वाधिक केसेस गोर गरीब आणि खालच्या जातीमधील मानल्या जाणाऱ्या सामान्य जनतेच्या होत्या.कायद्याप्रती त्यांचे हेच समर्पण पाहून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलम यांनी मद्रास हाय कोर्टचे न्यायाधीच म्हणून त्यांची विशेष नेमणूक केली होती.
सध्या के. चंद्रु निवृत्त असून चेन्नई मध्ये आपले आयुष्य व्यतीत करत आहेत. पण आजही कोणत्याही पीडितासाठी त्यांच्या घरचे दरवाजे सदैव खुले असतात. त्यांच्या आयुष्याचे हे ध्येयच आहे की ‘अखेरच्या श्वासापर्यंत कायद्याच्या माध्यमातून केवळ आणि केवळ समाजसेवा’!
Jaybhim 🙏