रोज संध्याकाळी ७:३० वाजले रे वाजले की प्रत्येक घरातील टीव्ही मधून एकच सुर येऊ लागतो……”आई…कुठे काय करते?” मग ८ वाजेपर्यंत घरातील स्त्रिया काय टीव्ही पुढून हलत नाहीत. अर्थात ही जादू आहे सर्वाधिक टीआरपी असणाऱ्या मराठी मालिकेची!
आई कुठे काय करते या मालिकेने पहिल्या भागापासून प्रेक्षकांना आपलंस केलं. प्रत्येक घरातील स्त्री जी आजही आईच्या रुपात वावरते आहे किंवा कधीकाळी वावरली होती, तिला अरुंधती नावाचे हे पात्र अगदी जवळचे वाटू लागले. हळूहळू मालिकेने लोकप्रियतेचा कळस गाठला आणि आजही लोकांच्या मनात या मालिकेची जादू कायम आहे.
अर्थात या यशामागे सर्वात मोठा वाटा आहे अरुंधती देशमुख हे पात्र साकारणाऱ्या मधुराणी गोखले-प्रभुलकर या अभिनेत्रीचा! आपल्या कुटुंबाला बांधून ठेवणारी, प्रसंगी आपल्या स्वप्नांना मुरड घालणारी, कोणत्याही त्यागासाठी नेहमी तयार असणारी आई तिने इतक्या लीलया वठवली आहे की आजवरची सर्वात लाडकी आई म्हणून सध्या तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.
पण कोण आहे ही अभिनेत्री? आजवरची तिची कारकीर्द काय? अरुंधतीचा रियल लाईफ भूतकाळ काय? असे प्रश्न तुमच्याही मनात आले असतीलच ना? आज आपण त्याचाच मागोवा घेऊ.
मधुराणी यांचा जन्म भुसावळचा, आता हे ऐकून भुसावळकरांची छाती अभिमानाने फुलून आलीच असणार! पण थांबा तुम्हाला हा अभिमान पुणेकरांसोबत वाटून घ्यावा लागेल कारण मधुराणी यांचे पुढील महाविद्यालयीन शिक्षण हे पुणे येथे झाले. त्यांच्याकडे मास कम्युनिकेशनची पदवी असून त्या एक उत्तम गायिका आणि संगीतकार सुद्धा आहेत. त्यांनी सारेगमप शो मध्ये सहभाग घेतला होता. शिवाय सुंदर माझे घर ह्या चित्रपटाच्या गीतांना संगीत सुद्धा त्यांचेच लाभले आहे.
मधुराणी यांना इंद्रधनुष्य या मालिकेमधून पहिला ब्रेक मिळाला. अभिनयाच्या जोरावर मग त्यांनी सुंदर माझे घर, गोड गुपित, समांतर, मनी मंगळसूत्र यांसारखे तेव्हा गाजलेले सिनेमे सुद्धा केले.
त्यांच्या कारकिर्दी मधील सर्वात उल्लेखनीय चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर आजही अनेक घरात आवर्जून पाहिला जातो असा धम्माल विनोदी चित्रपट म्हणजे नवरा माझा नवसाचा!
हो मंडळी, मधुराणी यांनी ह्या चित्रपटामध्ये एका हौशी अँकरचे पात्र वठवले आहे. जे तेव्हा रसिकांना सुद्धा खूप आवडले होते. त्यांना जोडीदार सुद्धा याच क्षेत्रामधील मिळाला. प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली.
याशिवाय अनेक नाटके, मालिका आणि जाहिरातींमध्येही कधी सहाय्यक अभिनेत्री म्हणून तर कधी पाहुण्या अभिनेत्री म्हणून येऊन त्यांनी आपल्या अभिनयची चुणूक दाखवली आहे. मात्र म्हणावे तसे यश त्यांना मिळत नव्हते.
पण म्हणतात ना देव अगदी तुमची वेळ आली की तुम्हाला देतो. त्याप्रमाणे आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रमुख पात्रासाठी मधुराणी यांची निवड झाली आणि आज त्या महाराष्ट्रामधील घराघरात पोहोचल्या आहेत.
0 Comments