बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान विविध कारणांमुळे प्रसिद्ध आहे. त्याचे फॅन फॉलोविंगही कमालीचे आहे. बिईंग ह्युमन या संस्थेमार्फत तो अनेक समाजसेवेची कामे करत असतो परंतु, ड्रिंक अँड ड्राइव्ह, हिट अँड रन यांसारख्या काही गुन्ह्यांसोबतही त्याचे नाव जोडले गेले आहे.
अशीच एक हिट अँड रनची घटना २००२ साली सलमानसोबत घडली. साधारण २७-२८ सप्टेंबर २००२ च्या रात्री सलमान खानच्या लँड क्रूजर गाडीने बांद्रा येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीसमोरील फूटपाथवर झोपलेल्या ५ लोकांवर गाडी चालवली. त्यात ४ जण जखमी झाले तर एकाचा जागीच मृत्यू झाला. हिट अँड रन घटनेत मृत्य झालेल्या व्यक्तीचे नाव नुरुल्ला शरीफ होते. गाडीत सलमानसोबत कमल खान आणि त्याचे बॉडीगार्ड कॉन्स्टेबल रवींद्र पाटीलही होते.
घटनेच्या काही काळ आधी, अंडरवर्ल्डकडून आपल्याला सतत धमक्या येत असल्याची तक्रार सलमानने केल्यानंतर कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांना सलमान खानचा अंगरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
सलमानचे बॉडीगार्ड पाटील यांनी मरेपर्यंत सातत्याने सांगितले की ते खानच्या शेजारी बसले होते जेव्हा सलमान स्वतःच ती गाडी चालवत होता. भरधाव वेगात असलेल्या गाडीचा ताबा सुटला आणि ती हिल रोडच्या फुटपाथवर चढली. फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना या गाडीने चिरडले. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला.
पाटील यांनीच खान विरुद्ध एफआयआर दाखल केला होता आणि या खटल्याची सुनावणी झालेल्या आधीच्या कोर्टात दिलेल्या निवेदनात त्यांनी अभिनेत्याला मद्यधुंद अवस्थेत असल्याने गाडी हळू चालवण्याचा इशारा दिला होता. मात्र, खान यांनी इशाऱ्याकडे लक्ष दिले नाही, असे पाटील म्हणाले.
मुंबई सत्र न्यायालयाने मे २०१५ मध्ये २००२ च्या या हिट अँड-रन प्रकरणात एका व्यक्तीची हत्या आणि इतर चार जणांना जखमी केल्याबद्दल अभिनेत्याला दोषी ठरवले होते. मे महिन्यात जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा अनेकांना न्यायसंस्था आणि राज्याने निराश केले असे वाटले.
तेरा वर्षांनंतर १० डिसेंबर रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानची सुटका केली. फिर्यादीचा खटला फेटाळताना, न्यायाधीश ए.आर. जोशी यांनी मुंबई पोलीस हवालदार रवींद्र पाटील यांनी दिलेले वक्तव्यही फेटाळून लावले आणि त्यांना ‘संपूर्ण विश्वासार्ह साक्षीदार’ मानले जाऊ शकत नाही, असे सांगितले.
अभिनेत्याविरोधातील विधान बदलण्यासाठी पाटील यांच्यावर प्रचंड दबाव होता आणि खटल्यादरम्यान ते बेपत्ताही झाले होते. खानच्या वकिलांना टाळण्यासाठी आणि पोलिस दलातील छळाचा आरोप टाळण्यासाठी ते अज्ञातवासात गेले होते असा समज आहे. विशेष म्हणजे, पाटील यांना २००६ मध्ये साक्षीदार म्हणून हजर न राहिल्यामुळे अटक करण्यात आली होती आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना पोलीस दलातून काढून टाकण्यात आले होते. ऑगस्ट २००७ मध्ये, पाटील शिवडीजवळील एका रस्त्यावर सापडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाटील यांची दिवसेंदिवस खूपच वाईट अवस्था होत होती. अखेर वयाच्या ३०व्या वर्षी ४ ऑक्टोबर २००७ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांनतर असे कळले की, पाटील दोन वर्षांपासून क्षयरोगाने त्रस्त होते, त्यांच्या कुटुंबाने त्यांना सोडून दिले होते. मिड – डे या वृत्तपत्राने अशी बातमी दिली आहे की, पाटील यांनी त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी एका मित्राला असे सांगितले होते की, त्यांच्यावर झालेल्या उपचारामुळे ते दुःखी आहेत.
“मी शेवटपर्यंत माझ्या विधानावर ठाम राहिलो, पण माझे डिपार्टमेंट माझ्या पाठीशी उभे राहिले नाही. मला माझी नोकरी परत हवी आहे, मला जगायचे आहे. मला एकदा पोलीस आयुक्तांना भेटायचे आहे.” असे पाटील यांचे शेवटचे शब्द होते.
ही घटना एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा काढण्यामागे एकच हेतू की, एका बेफिकीर हिरोमुळे एका चांगल्या होतकरू मराठी तरुणाचे आयुष्य उध्वस्त झाले आणि याबाबत प्रत्येकाने सारासार विचार करणे खूप गरजेचे आहे!
0 Comments