आई प्रमाणेच वडील हे सुद्धा आयुष्याचा आधार असतात हे शाश्वत सत्य आहे. ते आईसारखे मायाळू नसले तरी त्यांना सुद्धा आपल्या मुलांची काळजी असते. त्यांच सगळं नीट व्हावं हेच त्यांना वाटत असतं. वडील आपल्यासाठी जे करतात त्याची परतरफेड आपण कधी करू शकत नाही पण त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याच्या बदल्यात त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटावा असं काम करणे आणि आपल्या पैश्यांनी एक चांगले आयुष्य त्यांना देणे ही गोष्ट आपण करूच शकतो.
पण म्हणतात ना आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला हव्या त्या वेळेवर होत नाही आणि यामुळेच प्रत्येक मुलाला आपल्या वडिलांसाठी जे करायचे आहे ते करायची संधी मिळत नाही. अभिनेते नाना पाटेकर यांची सुद्धा हीच शोकांतिका आहे आणि हीच खदखद त्यांनी कोण होईल करोडपती या कलर्स वाहिनीच्या कार्यक्रमात बोलून दाखवली.

नाना पाटेकर हे एका मध्यम वर्गीय घरातले, त्यामुळे त्यांच्या सुद्धा मनात इच्छा होती कि पैसे कमवावे, खूप मोठं व्हावं आणि आपल्या आई वडिलांना जे आजवर मिळालं नाही ते द्यावं. पण वडिलांना त्या आधीच गमावल्याची सल कायम मनात राहील असे नाना सांगतात.
नाना स्वत:ला खूप भाग्यवान समजतात की त्यांना असे वडील मिळाले जे अगदी मित्रासारखे होते. तुम्हाला वाटत असेल की नानाला अभिनयाची गोडी स्वत: लागली असेल तर तसे नाही. त्यांच्या वडिलांनीच त्यांना अभिनयाचं बाळकडू पाजलं. कदाचित ते आपलं अधूर स्वप्न आपल्या मुलामध्ये पाहत होते. त्यांना तमाशा, नाटक आणि चित्रपट तिन्ही गोष्टींचं अप्रूप होतं. लालबागला असणाऱ्या नेराळेंच्या हनुमान तमाशा थियेटरमध्ये ते अनेकदा जायचे. मुख्य म्हणजे ते नानांना सुद्धा एखादा चांगला वग असेल तर घेऊन जायचे.
तेव्हाचा काळ असा होता की वडील लोक आपल्या मुलांना अशा गोष्टींपासून दूर ठेवायचे, पण नानाचे वडील स्वत: नानाला तमाशा दाखवायला घेऊन जायचे आणि अभिनयाचे बारकावे समजून सांगायचे. तर इथूनच कुठेतरी नाना मधला अभिनेता हळूहळू घडत गेला.

नानांना दु:ख एकाच गोष्टीच वाटतं की वडिलांच्या शेवटच्या दिवसांतही जे हवं ते सुख ते वडिलांना देऊ शकले नाही. तेव्हा नानांची आर्थिक स्थिती काही ठीक नव्हती. वडिलांच्या औषधासाठीही त्यांना बाहेरून पैसे गोळा करावे लागले आणि त्या आजारपणातच केईएम हॉस्पिटलच्या जनरल वॉर्ड मध्ये नानांचे वडील गेले.
पण नानांना एका गोष्टीचं समाधान आहे की, ते आपल्या वडिलांना अभिनेता होऊन दाखवू शकले. त्यांच्या वडिलांची एकतरी इच्छा त्यांनी पूर्ण केली. वडिलांच्या आजारपणावेळी नानांना महासागर हे नाटक मिळाले. ते नाटक पाहण्याची आणि आपल्या मुलाला त्यात काम करताना पाहण्याची त्यांची खूप इच्छा होती.
तेव्हा ते खूप आजारी होते. त्यांना चालता येत नव्हते. अशा स्थितीत नानांनी स्वत:च्या हाताने उचलून त्यांना शिवाजी मंदिर मध्ये पहिल्या रांगेत नेऊन बसवले. ते अखेरचे नाटक जे नानांच्या वडिलांनी पाहिले आणि जणू समाधानाने काही दिवसांत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वडिलांना जरी नाना सांपत्तिक सुख देऊ शकले नसले तरी आज त्यांनी जी प्रतिष्ठा मिळवली आहे ते पाहून वरून पाहणाऱ्या त्यांच्या वडिलांना नक्कीच समाधान वाटत असेल.
0 Comments