महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहत नाही असा माणूस सापडणे कठीण आणि त्यात तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडतं? असा प्रश्न विचारला तर बहुतांश लोकांचं उत्तर असेल की समीर चौगुले किंवा ओमकार भोजने! आता समीर दादाबद्दल वेगळं काय सांगायचं? त्याने तर अख्ख्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण हा चिपळूणचा नवीन पोरगा ओमकार भोजने त्यांच्या मागोमाग अखंड मराठी हास्यरसिकांच्या मनातला ताईत होतो आहे.
त्याचं अफलातून टायमिंग, त्याचे हावभाव, पंच काढण्याची कला हे सगळं इतकं लाजवाब आहे की त्याचे स्कीट्स पुन्हा पुन्हा पाहताना सुद्धा कंटाळा येत नाही. पण कोण आहे हा तरुण हास्यकार? कुठून त्याची सुरुवात झाली? कोकण ते मुंबई हा त्याचा प्रवास कसा झाला? याचाच थोडक्यात आढावा आपण खास त्याच्यासाठी लिहिलेल्या या लेखातून जाणून घेऊ.
ओमकारचा जन्म चिपळूण मधला, तेथील निसर्गसौंदर्यात वाढता वाढता त्यांच्या अंगी अभिनायचे रस सुद्धा बाळसं धरू लागलं. त्याच्या घरी तसा कोणाचा थेट रंगभूमी वा चित्रपटसृष्टीशी संबंध नाही. पण एका सामान्य मराठी घरात जसं आवडीने चित्रपट, मालिका, नाटके पाहिली जातात तशी त्याच्या घरात सुद्धा या सगळ्याची आवड होती.
ओमकार मधला अभिनेता खरा बाहेर आला कॉलेज मध्ये! तेव्हा तो चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता आणि गावात उत्तम कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओमकारला एकांकीकांच्या जगाने ओढून घेतलं. स्वप्नांची नगरी मुंबईच्या दिशेने येण्याचा त्याचा प्रवास इथूनच सुरु झाला.
त्याने केलेल्या बहुतांश एकांकिका मधून त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या जोरावर कॉलेजने कित्येक एकांकिका स्पर्धांमध्ये बाजी सुद्धा मारली. ओमकारचं एवढं नाव झालेलं की तो ज्या स्पर्धेत आहे तिथे तो हमखास अभिनयात बक्षीस घेऊन जाणार हे ठरलेलंच असायचं. त्याला ओळख देणाऱ्या एकांकीकांबद्दल सांगायचे झाले तर ‘गिरगाव व्हाया दादर’ ही त्याच्या कारकिर्दीमधील सर्वात गाजलेली एकांकीका ठरली.
हळूहळू ओमकार प्रसिद्ध होत होता आणि त्याला ‘बॉयज-2’ चित्रपटामध्ये खलनायक म्हणून भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचा पहिला भाग गाजलेला असल्याने दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी गर्दी केली आणि ओमकारचा अभिनय महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पोहोचला. याशिवाय युट्युबवर त्याचा ‘मी कोळी नंबर 1’ हा म्युझिक व्हिडियो सुद्धा प्रसिद्ध आहे. ओमकारने या व्हिडियोमध्ये जबरदस्त डान्स करून धम्माल उडवून दिली आहे.
मात्र यापुढेही त्याला खरी ओळख मिळाली मराठी कॉमेडी शो मधून! ‘कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस’, ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या शो मध्ये त्याने केलेलं स्कीट्स मुंबईमधील निर्मात्यांच्या नजरेस पडले आणि त्याला मिळाला सध्याचा सर्वात जास्त टीआरपी शो अर्थात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि जणू त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
मोठमोठ्या दिग्गज कलाकारांसोबत स्टेज शेअर करत असल्याने साहजिक त्याचे नाव झाले आणि आज आपण त्याची प्रसिद्धी पाहू शकतो.
ओमकार हा पडद्यावर अत्यंत विनोदी दिसत असला तरी तो खऱ्या आयुष्यात फार अबोल आणि लाजाळू आहे असे सहकलाकार सांगतात. शिवाय तो सोशल मिडीयावर सुद्धा जास्त सक्रीय नसतो. आपल्याला त्यातलं फार कळत नाही असं सुद्धा त्याने बिनधास्त कबूल केलं आहे. यातून त्याच्यातला एक नम्र व्यक्ती दिसून येतो.
‘हा मुलगा खूप पुढे जाणार’ असं आपण अनेकांबाबतीत म्हणतो आणि ओमकारच्या बाबतीत सुद्धा शेवटी हेच म्हणावंस वाटतंय की, “ही फक्त सुरुवात आहे, हा मुलगा अजून खूप पुढे जाणार!
0 Comments