’कटप्पा को किसने मारा?’’ हा प्रश्न भारतातल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात अक्षरशः पिंगा घालत होता. 2015 आणि 2016 या कालावधीत याबाबत कोणालाच काही उत्तर मिळालं नव्हतं. मात्र त्यानंतर २०१७ साली अखेर बाहुबली, द कन्लुजन हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा अनुभव नवा होता. त्यामुळेच दिग्दर्शक राजामौली यांच्याबाबत आता एकच वक्तव्य केलं जातं, ते म्हणजे राजामौली हे नुसता चित्रपट बनवत नाही तर चित्रपटांचा इतिहास घडवितात. आता त्यांच्या RRR या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे कथानक मात्र बाहुबलीपेक्षा वेगळ्या धाटणीचे आहे. इतिहासातल्या खऱ्या नायकांवर हा चित्रपट बेतला आहे. या चित्रपटाचे नेमके वैशिष्ट काय, याबाबतच आज आपण जाणून घेऊ.
सध्या RRR या चित्रपटाच्या स्टारकास्टवरुन खुप चर्चा होत आहे. या चित्रपटात दक्षिणेतले दोन सुपरस्टार एकत्र काम करणार आहेत. एक म्हणजे राम चरण आणि दुसरा नंदमुरी तारक रामा राव म्हणजेच आपवा NTR ज्युनिअर ओ. या दोन्ही सुपरस्टार्सना एकत्र आणण्याचे काम फक्त आणि फक्त राजामौली यांनाच शक्य होतं. खरं तर हे दोघेही चतुरस्त्र अभिनेते आहेत त्यात त्यांचे स्टारडम तर जगजाहीर आहे. त्यामुळे दिग्दर्शक राममौलींनी या दोघांना एकत्र स्क्रिनवर आणण्याचे आव्हान जे स्वीकारले आहे त्याची जादू प्रेक्षकांवर किती चालेल हे काळच ठरवेल.
या चित्रपटाचे नाव आणि विषय काय असेल या मुद्द्यावरुनही चर्चा होत आहे. RRR याचा फुलफॉर्म काय म्हणजे Rise Roar Revolt म्हणजेच उठा, गर्जा आणि विद्रोह करा.
त्याचबरोबर अजून एक योगायोग म्हणजे चित्रपटांचे दोन्ही नायक आणि दिग्दर्शक ह्या तिघांचीही नावं R या अक्षरानेच सुरु होतात. हा चित्रपट दोन खास ऐतिहासिक क्रांतिकारी पात्रांवर बेतलेला आहे. आंध्र प्रदेश-तेलंगातल्या मातीतले क्रांतिकारी अल्लूरी सीताराम राजू आणि क्रांतिकारी कोमाराम भीम या रिअल लाईफ नायकांची काल्पनिक कहानी या चित्रपटाद्वारे पडद्यावर साकारली आहे. ट्रेलर पाहून तुमच्याही मनात या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली असेलच. सगळ्यात आधी आपण या दोन्ही क्रांतिकाऱ्यांबाबत जाणून घेऊ या.
१८८२ चा काळ होता. इंग्रजांनी मद्रास फॉरेस्ट ऍक्ट पास केला होता. ऍक्टनुसार स्थानिक आदिवासी समुदायांना जंगलात जाण्यास प्रतिबंध घातले गेले. हे आदिवासी जंगल जाळून शेती करत. या शेतीच्या प्रकाराला ‘पोडू’ शेती असे म्हणत. मात्र इंग्रजांना या जंगलाचा वापर औद्योगिक कारणासाठी करायचा होता. जंगल जाळणे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी हा कायदा सुरु केला. आदिवासी लोकांमध्ये इंग्रजांबाबत द्वेष निर्माण झाला पण त्यांच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणी करु शकले नाही.
१८९७ साली विशाखापट्टणला अल्लूरी सीताराम राजू या बाळाचा जन्म झाला. हाच अल्लूरी पुढे अदिवासी बांधवांच्या हक्कासाठी लढला. १९२२ ते १९२४ ह्या काळात सीताराम राजू यांनी राम्पा विद्रोहचे नेतृत्व केले. या विद्रोहामुळे सगळ्यांच्याच मनात असलेल्या रागाच्या ठिणगीचे मोठ्या आगीत रुपांतर झाले. अर्थातच या आगीची झळ इंग्रजांना बसू लागली. ७ मे १९२४ रोजी इंग्रजांनी सीताराम राजूला अटक केली आणि कोयुरी गावात नेऊन एका झाडाला बांधले. त्यांच्यावर बेछूट गोळी चालवून त्यांची हत्या केली. असे करुन त्यांना सगळ्या क्रांतिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करायची होती. पण सीताराम यांनी पेटवलेली विद्रोहाची आग शांत करायला इंग्रजांना दोन वर्ष लागले. त्यासाठी त्यांना तेव्हा ४० लाख रुपये सुद्धा खर्च करावे लागले. सीताराम यांचे बलीदान व्यर्थ गेले नव्हते.
कोमाराम भीम यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९०० साली तेलंगनामधील आदिलाबादच्या संकपल्ली गावात गोंड आदिवासी जमातीत झाला. लहानपणापासूनच त्यांनी जगण्याचा संघर्ष बघितला. गावातले आदिवासी पाडू शेती करायचे, मात्र उगवलेले धान्य निजाम कर स्वरुपी हिसकावून नेई. आदिवासी लोकांवर अत्याचार करित. त्यांच्या वडिलांनी निजामाविरुध्द अन्यायाला वाचा फोडली तर त्यांनाही मारण्यात आले. भीमलाही अन्याय सहन होत नव्हता. क्रांतिकाराचे बीज तर त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले होते. एकदा पोडू शेतात कापणी सुरु होती. तेव्हा तिथे वसुली करण्यासाठी लक्ष्मण राव आणि निजामाचा सिद्दिकी आले आणि आदिवासी लोकांना जोर-जबरीने कर भरण्यास भाग पाडू लागले.
तिथल्या परिस्थितीची चीड येऊन कोमाराम भीम यांनी सिध्दीकीला ठार मारले आणि भारतमातेला बंधनातून काहीही केल्या मुक्त करायचे हा पणच घेतला. १९२८ ते १९४० दरम्यान त्यांनी निजामाविरुध्द गनिमी कावा वापरून युध्द सुरु ठेवले. सरते शेवटी निजामाने कोमाराम भीम यांच्या सैन्याला मारण्यासाठी स्वतःचे ३०० सैनिक पाठवले. १९४० साली निजामाच्या सैन्याशी दोन हात करतानाच कोमाराम भीमासह त्यांच्या सैन्याला अमरत्व आले.
हे दोन्ही क्रांतीकारी एकाच राज्यामध्ये जन्मले असून वयातही जास्त अंतर नाही. या दोघांमध्ये अजून एक साम्य असे आहे की दोघेही काही वर्षांसाठी अज्ञातवासात गेले होते आणि तेव्हा त्यांनी काय केले याबाबत इतिहासात काहीच नोंद नाही. दिग्दर्शक राममौली यांनी चित्रपटासाठी हाच ब्लाइंड स्पॉट निवडला आणि कथानक रंगवले. या अज्ञातवासात दोन्ही क्रांतीकारी एकमेकांना भेटतात आणि त्यांच्यात मैत्री निर्माण होते. असं काहीसं चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.
काय मग आहे की नाही इंटरेस्टिंग… असणारच कारण आधी म्हटल्याप्रमाणे राजामौली फक्त चित्रपट बनवत नाही तर इतिहास घडवतात.
0 Comments