मल्ल्या, मोदी, चोक्सी घोटाळे करून लंडन मध्येच का पळाले? इंग्रज त्यांच्यावर एवढे मेहरबान का?

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे की खुद्द इंग्लंड वा लंडनचे प्रशासनच या लोकांना आश्रय देते. म्हणूनच या हे घोटाळे बहाद्दर किंवा गुन्हेगार इकडे सुरक्षित राहतात.


तुम्हालाही घोटाळेबहाद्दरांमध्ये एक गोष्ट कॉमन दिसली असेल ना की हे महाभाग घोटाळे करतात आणि घोटाळा उघडकीस आला रे आला की देशाबाहेर पळून जातात. पण बहुतांश वेळा हा देश इंग्लंडच असतो. विजय मल्ल्या घ्या, निरव मोदी घ्या किंवा ललित मोदी घ्या, घोटाळे बाहेर आले तसेच हे लंडनला पळून गेले. पण असे का? असे काय खास आहे लंडनमध्ये की इकडे एवढे मोठे कांड करून सुद्धा तिकडे हे लोक आरामात जगात असतात. त्यांना कशाचीही भीती का नसते? का पळून जाण्यासाठी लंडनचीच निवड केली जाते? चला जाणून घेऊ.

Source : thequint.com

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे की खुद्द इंग्लंड वा लंडनचे प्रशासनच या लोकांना आश्रय देते. म्हणूनच या हे घोटाळे बहाद्दर किंवा गुन्हेगार इकडे सुरक्षित राहतात.

लंडन मध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी एक योजना आहे की जर तुम्ही लंडन मध्ये येऊन २ मिलियन पौंड पर्यंतची गुंतवणूक केली असेल वा तुम्ही इथे एवढ्या रक्कमेचा एखादा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला गोल्डन व्हिसा मिळतो आणि या गोल्डन व्हिसा अंतर्गत तुम्हाला लंडन मध्ये राहण्याची परवानगी मिळते. मग भले तुम्ही तुमच्या देशातील गुन्हेगार का असेना!

आता तुम्हाला वाटत असेल ना की ही गोष्ट तर चुकीची आहे, पण मंडळी इंग्लंड वा लंडनच्या सरकारसाठी ही गोष्ट चुकीची नाही. त्यांना आपली अर्थव्यवस्था वाढवायची आहे आणि चांगली ठेवायची आहे. त्यासाठी सतत पैसा येणे महत्त्वाचे आहे. हेच कारण आहे की केवळ भारतच नाही तर विविध देशांतील गुन्हेगार एक प्रकारे पैसा भरून लंडन मध्ये येतात आणि इथेच आश्रय घेतात आणि त्याबदल्यात येथील कायदे या गुन्हेगारांना संरक्षण देतात. सध्या भारतात गुन्हेगार घोषित झालेले १३१ लोक इंग्लंड मध्ये आहेत आणि भारत सरकारने त्यांना आपल्याकडे सोपवण्याची मागणी प्रत्यार्पण संधीनुसार केली आहे. मात्र इंग्लंडने केवळ १% गुन्हेगारांनाच परत केले आहे.

Source : amazonaws.com

आता ही प्रत्यार्पण संधी म्हणजे काय? तर भारताने इंग्लंड सोबत केलेला एक करार आहे ज्यानुसार भारत जो व्यक्ती हवा आहे, त्याने केलेल्या गुन्ह्याबाबतचे सबळ पुरावे सादर करून त्याला पुन्हा देशात परत आणू शकतो. पण एवढ्याने तो व्यक्ती सोपवला जात नाही. या पुराव्यांच्या आधारावर प्रथम इंग्लंडच्या सत्र न्यायालयात खटला चालतो. मग तो खटला उच्च न्यायालयात जातो आणि मग तेथून कधी कधी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा दादा मागितली जाते. याचा अर्थ काय? तर ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तब्बल ५-६ वर्षे सहज जातात.

तुमच्याही लक्षात आले असेलच हे सर्व का? तर त्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी! पण कधी कधी इग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयातून सुद्धा त्या गुन्हेगारा विरोधात निकाल येतो आणि त्याला भारताकडे सोपवण्याचा निर्णय दिला जातो. पण अशावेळी अजून एक पळवाट त्या गुन्हेगाराकडे उपलब्ध असते. ती पळवाट म्हणजे ‘युरोपीयन कोर्ट ऑफ ह्युमन राईट्स’ होय.

युरोपीयन कोर्ट ऑफ ह्युमन राईट्स हे मानवी हक्कांबाबत खटले लढणारे विशेष न्यायालय आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पणाचा निर्णय दिला तर तो गुन्हेगार ह्या न्यायालयाकडे हे सांगून दाद मागू शकतो की “मला भारतात पाठवू नका, तेथील तुरुंगाची सुरक्षा चांगली नाही, मला नाहक त्रास दिला जाऊ शकतो किंवा माझ्या जीवाला धोका आहे.” बस्स एवढी याचिका केली तरी ही न्यायालये प्रत्यार्पण थांबवतात. मग पुन्हा त्यावर नवीन खटला सुरु आणि मग पुन्हा काही वर्षांचा वेळ वाया!

Source : ejtn.eu

तर एकंदर पाहता खुद्द ब्रिटीश सरकारनेच अशा गुन्हेगारांच्या बचावासाठी अशी प्रक्रिया तयार केल्याचे जाणवते. त्यामुळे एकदा का एखादा गुन्हेगार लंडन मध्ये पळून गेला की त्याला भारतात आणणे महाकठीण काम होऊन बसते.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Shraddha More