रागानी, बुधरानी, केशवानी, भवनानी अशी कित्येक सिंधी आडनावे तुम्ही ऐकली असतील. कधीतरी तुम्हालाही प्रश्न पडला असेल की बहुतांश सिंधी नाव हे ‘अनी’ उच्चारानेच का संपते? मला हि नेहमी curiosity होती कि का बरे ह्यांच्या आडनावात शेवटी ‘अनी’ असते. एक दिवस मी माझ्या एका सिंधी मित्राला विचारले काय रे बाबा, काय गौडबंगाल आहे? माझ्या मित्राला ह्याचे उत्तर माहित नव्हते. तो म्हणाला माझ्या बाबांना नक्की माहित असेल. युरेका, उत्तर सापडले.
काकांनी मला दोन पुस्तके वाचण्याचे सुचवले. Sundar Iyer & Dr. Baldev Matlani ह्यांचे Unraveling the genesis of Sindhi Surnames आणि Berumal Advani ह्यांचे ‘Sindhi Hindu ji Tareek – History of Hindus in Sindh’ ह्या पुस्तकामध्ये सिंधी आडनावांचे मूळ आणि कूळ सर्व काही सापडले. तेच तुमच्या समोर मांडतोय!
ऋग्वेदिक काळात कुटुंबाचे आडनाव त्याच्या बाबांच्या/आजोबाच्या नावावरून ठेवले जात असे. उदाहरणार्थ ऋषी गर्ग ह्यांच्या मुलांना गार्गीन संबोधले जात असे. ऋषी दिकाश ह्यांच्या कुटुंबियांना दाक्षन किंवा दाक्षानी असे ओळखले जाई. यानी किंवा यान हे संस्कृत शब्द आहेत ज्याचा अर्थ होतो वंशज आणि ह्या शब्दांचा उच्चर सिंधी भाषेत अनी असा केला जातो.
आणखी दुसरे एक स्पष्टीकरण असे आहे कि अनी ह्या शब्दाचे मूळ आहे अंश. अंश म्हणजेच संतती. आणि हेच लॉजिक सिंधी आडनावांमागे आहे. आपल्या आजोबाच्या नावामागे अनी लावून बनते सिंधी आडनाव.
श्री बेरूमल मेहेरचंद अडवाणी ह्यांच्या ‘Sindhi Hindu ji Tareek – History of Hindus in Sindh’ ह्या पुस्तकात खूप उदाहरणे सापडतात. गिडवाणी ह्या आडनावाची निर्मिती झाली आहे दिवान गिडूमल ह्या नावातून. अडवाणी ह्यांचा पुस्तकात एक खूप इंटरेस्टिंग माहिती दिली आहे. खरेतर गिडूमल ह्यांना स्वतःचे मूळ नव्हते. दिवान गिडूमल समाजात खूपच प्रतिष्ठित व्यक्ती होत्या म्हणून त्यांच्या भावाच्या मुलांनी त्याचे नाव आपले आडनाव म्हणून वापरले. आणि अशा प्रकारे दिवान गिडूमल ह्यांच्या भावाची मुले आणि त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांनी गिडवाणी आडनाव वापरले.
पण guys तुम्ही असे समजू नका कि ह्या पृथ्वीतलावरचे चे सगळेच गिडवाणी दिवान गिडूमल ह्यांचे वंशज आहेत. त्या काळात असे अनेक गिडूमल असतील ज्यांच्या वंशजांनी गिडवाणी हे आडनाव घेतले असेल. जसे गिडवाणीचे मूळ गिडूमल मध्ये आहे तसे अडवाणी चे मूळ अडुमळ मध्ये. रामचंदानी चे मूळ रामचंद मध्ये आणि सेवकरमानीचे मूळ सेवकराम मध्ये. ह्या पुस्तकात अशी ही माहिती दिली आहे कि एकाच वंशावळी मध्ये ३-४ भिन्न आडनावे असू शकतात. म्हणजे समजा ४ भाऊ आहेत. वासन, रामचंद, तेजमल आणि बुधराम मग ह्या ४ भावांच्या वंशजांची आडनावे असतील वासनानी, रामचंदानी, तेजानी आणि बुधरानी.
वेदिक काळापासून इसवि सन पूर्व ७१२ पर्यंत सिंध प्रांतात फक्त हिंदूचे वास्तव्य होते. पण इस्लामिक आक्रमणानंतर काहींनी इस्लाम स्वीकारला तर काही सिंध सोडून आसपासच्या प्रदेशात स्थायिक झाले. धर्म सुटला पण ‘अनी’ सुटले नाही. म्हणूनच काही सिंधी मुस्लिम लोकांच्या आडनावांमध्ये अनी असते जसे शहानी आणि लखानी.
काही सिंधी आडनावे अशी सुद्धा आहेत ज्यांच्या शेवटी अनी नाहीये. ही आडनावे गाव, व्यवसाय आणि जात ह्यावरून पडली आहेत. सिंधी समाजात एक जात आहे अरोरवंशी. ज्या वेळेस सिंध प्रदेशावर राय राजांचे राज्य होते त्यावेळेस अरोर ही सिंध ची राजधानी होती. त्या काळात अरोर मध्ये राहणारे जे सिंधी होते तेच अरोरवंशी. सध्या रोहरी-सुक्कर येथे एक अरोर एक छोटेसे गाव आहे आणि फक्त त्याचे अवशेष पाहायला मिळतात.
अरोरवंशी जातीमध्ये ४५८ उपजाती आहेत. आणि त्यांची आडनावे आहेत हिंदुजा, माखिजा, धमीजा आणि वालेचा. ज्या अरोरवंशी सिंधींनी मुस्लिम धर्म स्वीकारला त्यांनी आपली जुनी आडनावे कायम ठेवली जसे जुनेजा, सिंधुजा आणि नरेजा. काही अरोरवंशीनी बजाज, सचदेव आणि मनचंदा हि नावे निवडली.
काही सिंधींनी आपल्या गावाचे नाव आडनाव म्हणून वापरले. जसे मीरपूर मध्ये राहणारे मिरपुरी, कच्छ मध्ये राहणारे कच्छी आणि भगवान झुलेलाल चे गाव नसरापूर मध्ये राहणारे नसरापूरी. सिंध प्रांत सध्या पाकिस्तान मध्ये आहे. अनेक परकीय आक्रमणे आणि नंतर भारताची फाळणी ह्या मुळे सिंधी समाज विखुरला. त्यांची पाळे-मुळे उखडली गेली. पण एक गोष्ट आहे जी त्यांना सदैव त्यांच्या मुळांशी सदैव जोडून ठेवेल म्हणजे ती त्यांची आडनावे.
प्रत्येक आडनावामागे एक इतिहास असतो, एक स्टोरी असते. तुम्ही हि तुमच्या आडनावाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करा बघा एक मस्त स्टोरी असेल त्यामागे!
0 Comments