बऱ्याचदा लोकं नोकरी निमित्त स्थलांतर करतात आणि भाड्याने घर घेऊन राहतात. तसंही सर्वसामान्यांना नवं घर खरेदी करण तितकसं सहज सोपं नाही. तुम्हीही घर कधी ना कधी भाड्याने दिलं असेल किंवा घेतलं असेलच. या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती भाडे करार म्हणजेच रेंट ऍग्रीमेंट. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की ही भाडेकरार कायम ११ महिन्यांसाठीच का केला जातो? त्याच्या पेक्षा जास्त महिन्यांसाठी भाडेकरार होत नाहीत का? चला तर मग जाणून घेऊया…

जी लोकं काही कारणाने भाड्याने घर घेऊन राहत असतील त्यांना याची चांगलीच जाणीव असेल. ११ महिने संपत आले की त्यांच्या मनावर एक दडपणच येतं. कारण ११ महिने संपले की त्यांचा भाडेकरारही संपुष्टात येतो. आता त्यानंतर घरमालकाने काही कारणाने घर भाड्याने देण्यास नकार दिला तर परत धावपळ करत नवे भाड्याचे घर शोधा. सगळा संसार पाठीवर टाकून परत नवीन घरात ११ महिन्यांसाठी शिफ्ट व्हा.. त्यामुळेच बऱ्याच जणांना प्रश्नही सतावत राहतो. की फक्त ११ महिन्यांसाठीच का बरं भाडेकरार असतो?
सर्वात आधी भाडे करार म्हणजे काय, ते आपण पाहूया. जेव्हा आपण एखादं घर भाड्याने देतो वा घेतो, तेव्हा घरमालक आणि भाडेकरुंमध्ये एक भाडे करार केला जातो. घरमालक आणि भाडेकरु यांच्या दृष्टीने भाडे करार हा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. या करारात नमूद केल्याप्रमाणे अटी आणि शर्ती दोन्ही पक्षांना बंधनकारक असतात.
या करारमध्ये अटी आणि शर्तींसह, मालमत्तेचे वर्णन, दोन्ही पक्षांच्या सहमतीने ठरलेले मासिक भाडे व सुरक्षा ठेव, नेमकी मालमत्ता कोणत्या कारणासाठी वापरली जाणार याबाबत स्पष्टीकरण (व्यावसायीक वापरासाठी किंवा वैयक्तिक वापरासाठी). जागा सोडण्यासाठी किंवा सोडण्याआधीचा नोटीस कालावधी वगैरे सारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या असतात.
भविष्यात भाडेकरु आणि घरमालकात मालमत्तेवरुन होणारे वाद विवाद टाळण्यासाठी भाडेकरार केला जातो.नोंदणी अधिनियम कायदा १९०८ नुसारच भाडेपट्टी करार तयार केला जातो. या कायद्यानुसार भाडेपट्टी करार हा १२ महिन्यांपेक्षा अधिक मुदतीचा असल्यास तर त्याची नोंदणी करणे अनिवार्य आहे.

तुम्हाला नोंदणी करायचीच असेल तर त्याची प्रक्रीया बरीच क्लीष्ट आणि खर्चिकही आहे. नोंदणी जर केली तर मग नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क सारखे खर्च वाढत जातात. हे सगळ टाळण्यासाठीच घर मालक आणि भाडेकरू ११ महिन्यांचा भाडे करार करण पसंत करतात.
११ महिन्यांचा भाडेकरार घरमालकाच्या फायद्याचाही ठरतो. कारण ११ महिन्यांनंतर बाजार भावाप्रमाणे तो भाडे वाढवून नवे भाडे करार पत्र बनवू शकतो. मात्र हा करार ११ महिन्यांसाठी बंधन कारक नाही. दोन्ही पक्षांच्या सहमतीने तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी, नुतनीकरणयुक्त (Renewable) आणि विस्तारीत (extendable) असा करार करणेही शक्य आहे
0 Comments