‘पुष्पा’ मध्ये दाखवलेल्या रक्तचंदनासाठी लोकं स्वत:चा जीव सुद्धा धोक्यात का घालतात?

रक्त चंदनाच्या व्यवसायात उतरेला माणूस रंकाचा राजा कधी होतो ते त्यालाच समजत नाही.


दाक्षिणात्य हिरो अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पाः द राईज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट आपले जलवे दाखवतो आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनचा अभिनय तर लाजबाब आहेच, तसेच या चित्रपटाचे कथानक देखिल तगडं आहे.
पुष्पा नावाचा एक मजूर चंदन तस्करीच्या व्यवसायात घुसतो. तो या व्यवसायात असा जम बसवतो की, अवघ्या काही दिवसातच तो करोडपती होतो. या चित्रपटाचे कथानक जरी काल्पनिक असले तरी यामध्ये दाखविण्यात आलेल्या रक्त चंदनाच्या तस्करीबाबतच्या गोष्टी या सत्य घटनेवर आधारित आहेत.

रक्त चंदनाच्या व्यवसायात उतरेला माणूस रंकाचा राजा कधी होतो ते त्यालाच समजत नाही. भारतात उगवणारे रक्त चंदन हे लाल सोन्यापेक्षा कमी नाही बरं. या रक्त चंदनाच्या खोडांना जगभरातून खूप मागणी आहे.

हिंदू धर्मात रक्त चंदनाच्या झाडाला पवित्र समजले जाते. त्याचमुळे या झाडाचा वापर उदबत्ती, गंध बनविण्यापासून ते थेट देव्हारा बनविण्यापर्यंत होतो. रक्तचंदनामध्ये बरेच औषधी गुणधर्मही आहेत. पांढरा, लाल आणि पिवळ्या अशा तीन रंगांमध्ये चंदनाची झाडे आढळतात. लाल चंदन म्हणजेच रक्त चंदन, हे पांढऱ्या आणि पिवळ्या चंदना इतके सुगंधी नसते. मात्र त्याचे अनेक गुणधर्म असून Pterocarpus Santalinus हे रक्त चंदनाच्या झाडाचे वैज्ञानिक नाव आहे.

रक्त चंदनाच्या खोडाचा वापर जास्त करुन महागडे फर्निचर आणि सजावटीच्या वस्तू बनविण्यासाठी होतो. या लाकडापासून बनविलेल्या फर्निचरला बाजारात जास्त मागणी आहे. फर्निचर नंतर रक्त चंदन हे आयुर्वेदिक औषधी व सौदर्य उत्पादनांसाठी वापरले जाते. इतकंच नाही तर या चंदनापासून दारुही बनवितात. त्यामुळेच या चंदनाला जगभरातून जास्तीत जास्त मागणी असून याची तस्करी करण्याचे प्रमाणही जास्त आहे.

Source : indiatimes.in

रक्त चंदनाचे झाड हे आंध्रप्रदेशाशिवाय इतरत्र कुठेही उगवत नाही. नेल्लोर, चित्तूर, कडप्पा आणि कुरनूर या जिल्ह्यांत उगवलेल्या रक्त चंदनाचे गुणधर्म अनोखे आहेत. रक्त चंदनाचे खोड हे लाकूड असून पाण्यात बुडते. यावरुनच अस्सल रक्त चंदन ओळखता येते. या झाडाची सरासर उंची ही ८ ते ११ मीटर इतकी असते. जंगलात उगवलेलं हे लाल सोनं पाहून कोणाचीही नियत फिरेल. (तुम्हाला विरप्पन आठवत असेलच.)

चीन, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया सह अनेक देशांमध्ये रक्त चंदनाला मोठी मागणी आहे. चीनची तर कायम रक्त चंदनावर वक्र नजर राहिली. त्यामुळेच तस्करीचे प्रमाण वाढलं होतं. ही तस्करी रोखण्यासाठी रक्त चंदनाची झाडे असलेल्या क्षेत्रावर STF चे जवान तैनात करण्यात आले आहेत.

रक्त चंदनाची तस्करी थांबविण्यासाठी भारताने कडक कायदे लागू केले आहे. तरीही तस्करी करणारे वायु, जल आणि रस्ता या तिन्ही मार्गावरुन तस्करी करतात. सहजा सहजी पकडले जाऊ नये म्हणून बऱ्याचदा या चंदनाची पूड करुन त्याची तस्करी केली जाते. तस्करीच्या अतिप्रमाणामुळेच गेल्या काही वर्षात रक्तचंदनाच्या उत्पादनामध्ये ५० टक्के घट झाली. म्हणूनच भारतीय प्रशासनाने याबद्दलचे कायदे कडक केले. परिणामी बऱ्याच तस्करांना अटक केली. तस्करी करताना पकडले गेल्यास, गुन्हेगाराला ११ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागतो.

यावरुन तुम्हाला कळलं असेलच रक्त चंदन म्हणजे साधंसुधं लाकडाचे खोड नाही तर खरंच भारताच्या मातीत उगविणारं लाल सोनं आहे.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *