आजच्या युगात सगळीकडे जसा मोबाईल वापरला जातो तसंच इलेक्ट्रॉनिक मनीचा वापर होताना दिसतो. आपल्या पाकिटात फक्त शंभर रुपये ठेवून सुद्धा आपण भरपूर खरेदी करू शकतो. हे कसं शक्य आहे? अहो सोप्प आहे, नुसतं आपलं क्रेडिट कार्ड स्वाईप केलं की पैसे आपल्या बँकेतून व्यापाऱ्यांच्या बँकेत ट्रान्सफर! म्हणजे रोख पैश्यांची गरजच नाही.
पण थांबा ही गोष्ट जेवढी सोयीची वाटते तेवढीच तिची दुसरी बाजू तुम्हाला उध्वस्त सुद्धा करू शकते. कसं काय? आज तुम्हाला हीच क्रेडीट कार्डची कोणीही न सांगितलेली बाजू आपण जाणून घेणार आहोत.
क्रेडिट कार्ड हे एक प्लास्टिकचं कार्ड असतं जे दुकानात अर्थात मर्चंट एस्टॅब्लिशमेंटकडे स्वाईप केलं जातं. यानंतर आपले पैसे व्यापाऱ्यांकडे आपोआप ट्रान्सफर होतात. इथे दोन बँकांमध्ये व्यवहार होतो. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे जमा होतात.
अगदी गरज असतानाच तुम्ही क्रेडीट कार्ड वापरलं तर ठीक आहे, पण याचा अतिवापर केलात तर ते महागात पडू शकतं आणि तुमच्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जी चूक बाकीचे करतात ती चूक तुम्ही करू नका. कर्जाचा डोंगर जर का वाढत गेला तर त्यावर इंटरेस्ट म्हणजेच व्याज वाढत जाईल. त्यामुळे लवकरात लवकर पैसे भरणे हाच एक उपाय आहे.
एखादा ग्राहक जेव्हा एखाद्या दुकानात क्रेडीट कार्डच्या सहाय्याने खरेदी करतो तेव्हा त्याच्या क्रेडिट कार्ड वर त्याला मिळणारा इंटरेस्ट फ्री कालावधी हा ५१ दिवसांचा असतो. म्हणजे या कालावधीत जर त्याने पैसे परत केले तर त्याला व्याज लागणार नाही. हा कालावधी प्रत्येक बँकेनुसार वा वित्तीय संस्थेनुसार वेगळा असू शकतो.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जे क्रेडिट कार्ड बिल आहे ते वेळेवरच भरा.वेळच्या वेळेला क्रेडीट कार्ड बिल जर का भरले गेले नाहीत तर क्रेडिट कार्ड वरची व्याजाची आणि पेनल्टीची रक्कम वाढत जाईल. सामान्यतः हे व्याजदर किंवा फायनान्स चार्जेस दरमहा ३.५ % एवढे असतात. तर वार्षिक आधारावरती किंवा वर्षाला ३६-४२% असतात.
जर तुम्ही क्रेडिट कार्डची रक्कम थोडीच भरली आणि उरलेले पैसे पुढे रोल ओवर केले तर ते उरलेले पैसे लवकरात लवकर भरून टाकावे. असं केल्याने व्याजदर कमी होईल. यापुढे लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डचे पैसे भरण्याची तारीख. शक्यतोवर वेळच्या वेळी आणि जी रक्कम आहे ती एकत्र भरत राहिलात तर टेन्शन नाही आणि दंडही बसत नाही.
समज तुम्ही Due Date ला पैसे भरले नाहीत तर पुढच्या बिलामध्ये ९०० रुपये अधिक भरावे लागतात. ही रक्कम तुमचे पैसे किती बाकी आहेत त्यावर अवलंबून असते. म्हणजेच ९०० रुपयांपेक्षा सुद्धा जास्त रुपये सुद्धा तुम्हाला भरावे लागू शकतात.
आपण जेव्हा क्रेडिट कार्ड वापरतो तेव्हा साधारणतः बिलाच्या ५ टक्के तरी पैसे आपल्याला भरावे लागतात, यालाच Minimum Due Amount म्हणतात. जेव्हा क्रेडिट कार्ड वर कुठलीही नवीन खरेदी आपण करतो तेव्हा त्याचे पैसे वेळेवर भरले नाहीत तर जास्त तर व्याजदर लागू शकतंच शिवाय जे इंटरेस्ट फ्री दिवस मिळतात ते सुद्धा कमी होऊ शकतात.
साधारणत: सगळ्या क्रेडिट कार्ड वर ४५-५१ दिवस इंटरेस्ट फ्री म्हणून मिळतात. पण जर का या दिवसांमध्ये पैसे भरले नाहीत तर पुढच्या वेळेला हे दिवस कमी होतात. एकंदरीत काय तर क्रेडिट कार्ड वापरायचं असेल तर त्याची सगळी माहिती असणे फार गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जे क्रेडिट आपल्याला ह्या कार्डांवर ती मिळतं ते पैसे नियमित वेळेत भरणे तितकेच महत्त्वाचे आहे. असं जर का केलं नाही तर मात्र आपल्याला काही गोष्टीतून सूट मिळत नाही आणि भरायचे पैसे वाढतच जातात.
ह्या गोष्टी माहित नसल्याने कित्येक जण कर्जाच्या कचाट्यात सापडले आणि त्यातून बाहेर पडायला त्याला त्यांना कित्येक वर्षे गेली. त्यामुळे क्रेडीट कार्ड वापरा पण जपून!
0 Comments