पूर्वीच्या काळी हायवे तसे कमीच होते. पण जे होते त्याच्या दुतर्फा झाडी असायची. त्या झाडांच्या सावलीतून प्रवास करण्याची मजा काही औरच होती. खरंतर आता चकाचक हायवे झाले आहेत. आजूबाजूला नाही म्हटलं तरी निसर्ग सुंदर असतो. त्यात रस्त्याच्या मधोमध डिव्हायडरवर सुंदर दिसणारी झाडं लावलेली असतात. खरंतर या झाडांना इतकं मेंटेन केलेलं असतं, की त्यांना पाहिल्यावर गणवेश घालून शिस्तीत उभी राहिलेली लहान मुलंच भासतात. असो पण तुम्हाला माहिती आहे का, की हायवेवर ही झाडं लावण्यामागचा हेतू फक्त सुशोभीकरण नाहीये. त्यामागे काही शास्त्र देखील आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया, की हायवेवर मधोमध दुभाजकांवर म्हणजेच डिव्हायरवर ओ, त्यावर झाडं का लावली जातात.
राज्यमार्ग असो वा राजमार्ग रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर बांधलं जातं आणि त्यावर झाडं लावली जातात. यामुळे होतं काय की अप आणि डाऊन असे दोन्ही मार्ग वेगळे होतात. दोन्ही दिशांनी जाणाऱ्या गाड्यांच्यामध्ये ८ फुटांचे अंतर राखलं जातं. परिणामी अपघात होण्याची शक्यता कमी होते.
रात्रीच्या वेळी गाडी चालवणं तसं जोखमीचं असतं. दोन्ही दिशांनी येणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईट, टेललाईटमुळे, रस्त्यावरच्या गाड्या नेमक्या कुठून कुठे जातात याबाबत वाहन चालकाला संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. अर्थातच डिव्हायर आणि त्यावरच्या झाडांमुळे रस्त्याचे दोन भाग पडतात आणि संभ्रम होण्याची शक्यताच मिटते.
आजकाल वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी प्रदुषणही. प्रदुषणाची समस्या तर संपूर्ण जगालाच भेडसावतेय. अशातच हायवेवर तर भरमसाठ ट्रॅफिक. म्हणूनच हायवेवर खास प्रदूषण कमी करणारी आणि हवा शुध्द करणारी झाडं लावली जातात. या झाडांचा हिरवागार रंगही सुखद असतो. त्यामुळे ड्रायव्हिंग करणाऱ्याच्या डोळ्यांना थंडावाही मिळतो. प्रदूषणामुळे डोळ्यांची होणारी जळजळही कमी होण्यास मदत होते.
राज्यमार्ग असो वा राजमार्ग बऱ्याचदा तो एखाद्या जंगलाच्या वाटेने किंवा गावाजवळून जातो. पूर्वी ही जंगली जनावरं किंवा गावातली पाळीव जनावर या मार्गावर येऊन रस्ता ओलांडायचा प्रयत्न करायचे. बऱ्याचदा याच कारणामुळे अपघातही व्हायचे. यात या जनावरांचा तर कधी माणसांचाही बळी जायचा. आता रस्त्याच्यामध्ये दुभाजकांवर लावलेल्या झाडांमुळे असे अपघात होण्याची शक्यता कमी झाली आहे.
एकुणच काय तर या झाडांमुळे आपले हायवे देखणे आणि चकाचक तर दिसतातच. पण त्याच बरोबर या झाडांमुळे फक्त प्राणवायूच नाही मिळत तर कित्येकांचे प्राणही वाचतात.
0 Comments