हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत हे वाक्य तुमच्या कानी सुद्धा लहानपणापासून हजारदा आदळलं असेल. आता शाळेत शिकवतात त्या प्रमाणे कोटी ही संख्या आहे आणि त्यावर इतके शून्य आहेत की मोजताना बोटांचा वापर करावा लागतो. तर प्रत्येक सामान्य माणसाला त्यामुळे हेच वाटतं की हिंदू धर्मात तब्बल ३३ कोटी देव आहेत. पण मंडळी हा निव्वळ गैरसमज आहे. काय आहे खरी गोष्ट, चला जाणून घेऊ सोप्प्या भाषेत!
इथे ‘कोटी’ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. वेदांमध्ये आजही ३३ कोटी हा उल्लेख आढळतो. पण झालं काय कधीतरी कोणीतरी त्याचा अर्थ ३३ कोटी म्हणजे ३३ करोड असा घेतला आणि तिथून हा सगळा गैरसमजाचा खेळ सुरु झाला.
मराठी भाषेत कोटी शब्दाचे मुख्य दोन अर्थ होतात एक म्हणजे संख्या अर्थात गणितातले करोड आणि दुसरा ‘कोटी’ शब्द म्हणजे उच्च! मराठी भाषेत ‘कोटी करणे’ हा वाक्यप्रचार सुद्धा प्रचलित आहे. ज्याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची अतिउच्च पातळी गाठली. तर वेदांमध्ये जे ३३ कोटी देव असं म्हटलं आहे ते मुळात ३३ करोड देव नसून ३३ उच्च देव आहेत ज्यांना सनातन धर्मात सर्वश्रेष्ठ मानलं जात.
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि उपनिषदे यांमध्ये सांगितले गेले आहे की ८ वसु अर्थात निसर्गाचे विविध ८ घटक, १२ आदित्य म्हणजे सूर्यदेवाची रूपे आणि ११ रुद्र म्हणजे शंकर महादेवाची रूपे आणि २ अश्विनी कुमार मिळून ३३ कोटी देव आहेत.
आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की यांची नावे काय? डोन्ट वरी, ते पण जाणून घेऊया.
८ वसु आहेत – अपस अर्थात पाणी, द्यूस अर्थात अंतराळ, धरा अर्थात पृथ्वी, ध्रुव अर्थात ध्रुवतारा, अनिल अर्थात वायू, अनल अर्थात अग्नी, प्रभास अर्थात सूर्योदय आणि सोम अर्थात चंद्र!
१२ आदित्य आहेत – शक्र म्हणजेच नेतृत्व, अंश म्हणजेच भाग, आर्यमन म्हणजेच श्रेष्ठता, भाग अर्थात वारसा, धत्री म्हणजेच नियम पालन, वस्त्र म्हणजेच शिल्पकला, मित्र म्हणजेच मैत्री, पूषण म्हणजेच समृद्धी, पर्जन्य म्हणजेच शाब्दिक ताकद, विवस्वान म्हणजेच सामाजिक कायदा, वरूण म्हणजेच भाग्य आणि वामन म्हणजेच ब्रम्हांड! हे आदित्य म्हणजेच आपल्या सामाजिक वर्तणुकीचे प्रतिक आहेत.
११ रुद्र आहेत – शंभू, पिनाकी, गिरीश, स्थानु, भर्ग, भव, सदाशिव, शिव, हर, शर्व आणि कपाली! ही सर्व भगवान शंकराची रूपे आहेत.
२ अश्विनी कुमार आहेत – नासत्य आणि द्स्त्र तर काही ठिकाणी हे स्थान इंद्र आणि प्रजापती या देवांना देण्यात आले आहे.
तर असे आहेत हे आपले ३३ कोटी देव, त्यामुळे यापुढे कोणी ३३ कोटी देवांची नावे विचारली तर गडबडून जाऊ नका आणि त्यांना सुद्धा ३३ कोटी देव म्हणजे नेमके काय ते समजावून सांगा!
Good website