Second Hand कार खरेदी करताय? सावधान! ‘ह्या’ गोष्टी माहित नसतील तर फसवणूक होईल!

आता तर बाजारात सेकन्ड हॅन्ड कार विकणारे बरेच ऍप किंवा कंपनी उपलब्ध आहेत. तरी तुम्ही सेकन्ड हॅन्ड कार घेताना काही बाबींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.


कार खरेदी करणे प्रत्येकाचंच स्वप्न असते. मग अगदी मर्सडिज नाही घेता आली तरी एखादी सेकन्ड हॅन्ड कार का होईना घ्यावी असं प्रत्येकालाच वाटतं. हा पर्याय खरंच चांगला आहे. आता तर बाजारात सेकन्ड हॅन्ड कार विकणारे बरेच ऍप किंवा कंपनी उपलब्ध आहेत. तरी तुम्ही सेकन्ड हॅन्ड कार घेताना काही बाबींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकेल आणि तुमच्या खिशाला मजबूत भूर्दंड पडेल. पण फिकर नॉट मवाली तुमची फसगत कशी होऊ देईल? तुम्ही सेकन्ड हॅन्ड कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर मग आमच्या टीप्स नक्की फॉलो करा.

कागदपत्रांची पडताळणी

कोणतीही सेकन्ड हॅन्ड कार असो, ती खरेदी करण्यापूर्वी कार मालकाकडून RC म्हणजेच कारचे सर्टिफिकेट मागायला विसरू नका. त्याच बरोबर परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन कारबाबतचे प्रत्येक डिटेल्स चेक करा. म्हणजेच कारचा विमा वेळेत भरला गेला आहे का? कोणतेही चलान पेंडिंग तर नाही ना? सारख्या बाबी तुम्हाला संकेत स्थळावर तपासून पाहता येतील.

सर्व्हिस रेकॉर्ड बुक तपासून पहा
यूज़्ड कार खरेदीपूर्वी कारचे NOC देखील तपासून घ्या. कारण कारच्या बदल्यात मालकाने कोणते कर्ज असेल तर ते तुम्हाला NOC वरुन कळेल. त्याचबरोबर कारच्या रोड टॅक्सच्या पावत्या आणि बायो-फ्युएल किट्स संबंधित प्रमाणपत्रही पडताळून पहा. म्हणजे भविष्यात तुम्ही जेव्हा ती कार चालवाल, तेव्हा या प्रमाणपत्रांची मागणी तुम्हाला कोणी केली तर तुम्ही ते सहज दाखवू शकाल. ही कागदपत्र नसल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

किलोमीटर तपासून पाहताना खास काळजी घ्या
यूज़्ड कार खरेदी करताना आपण ती कार किती किलोमीटर धावली आहे हे तपासून घेतोच. मात्र काहीवेळा कार मालक मुद्दामहून मीटर जंप करुन जास्त किलोमीटर धावल्याचे दाखवून फसगत करु शकतो. त्यामुळे तुम्ही खात्रीच्या मेकॅनिककडून मीटर तपासून घ्या. कार मालकाने मीटरशी छेडछाड केली असल्यास तो तुम्हाला सावध करेल. अशी कार खरेदी करणे टाळा, नाहीतर पुढे कारचा मेंटेनन्स करता करता तुमचा खिसा फाटून हातात येईल.

मेकॅनिककडून संपूर्ण कारचे पार्ट्स तपासून घ्या
कारची डील फायनल करण्यापूर्वी खात्रीच्या कार सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन संपूर्ण कारचे पार्ट्स एकदा तपासून घ्या. खास करुन ब्रेक, क्लच, गियर,एस्कलेटर, इंजिन, कारचे टायर आणि बॅटरी हे पार्ट्स. कुठला पार्ट खराब किंवा बनावट तर नाही ना याची खात्री करुनच कार खरेदी करा.

स्वतः कार चालवून पहा
एवढी मोठी वस्तू खरेदी करता आहात, तर अर्थातच ती वापरुन तर पाहायलाच हवी ना? तर विकत घेण्याआधी स्वतः ती कार किमान ५ ते ७ किलोमीटर चालवून पहा. त्यामुळे तुम्हाला त्या कारचे ब्रेकिंग कंट्रोल समजतील. त्याचबरोबर कार स्मुथ चालते की काही बिघाड आहे हे देखिल जाणवेल. कारण शेवटी कार तुम्हालाच चालवायची आहे. त्यामुळे टेस्ट ड्राईव्ह तर जरुरीच आहे बॉस!

या सगळ्या बाबी पूर्ण झाल्या आणि ती कार परिक्षेत पास झाली तरच सेकन्ड हॅन्ड कार घ्या. नाहीतर उगाच स्वस्त आणि चांगलं डिल मिळतय समजून तुमच्या गळ्यात बिघडलेली कार पडायला नको.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *