लहान मुलांची कुठलीही वस्तू घ्या, खुप सुंदर रंग संगती असतात. त्यांच्या प्रत्येक वस्तूकडे लहान मुलच नाही तर आपणही आकर्षित होतो. मात्र तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, लहान मुलांच्या स्कुल बसचा रंग मात्र फक्त आणि फक्त पिवळाच असतो. बरं ही बाब फक्त भारतापुरतीच मर्यादित नाही, तर जवळपास जगभरातल्या बहुतांश देशांमध्येही स्कुल बस ही पिवळ्या रंगाचीच असते. असे का बरं असेल, याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे? इंद्रधनुष्यातल्या सात रंगांपैकी स्कुल बससाठी पिवळ्याच रंगाची निवड का बरे केली असावी?

2012 साली सर्वोच्च न्यायालयाने दखील सर्व खासगी शाळांना आदेश दिला, की शाळेतर्फे मुलांना ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा, बसचा रंग हा पिवळाच असावा.
अगदी न्यायालयानेही आदेश द्यावे, इतके काय वैशिष्ट्य आहे या पिवळ्या रंगाचे? हे आदेश देण्यामागे नेमके काय कारण आहे हेच आपण जाणून घेऊ या.
स्कुल बसचा रंग पिवळा ठेवण्यामागे शास्त्रीय कारण आहे. प्रकाशामध्ये खरंतर लाल रंग हा सर्वात जास्त तरंगलांबी असलेला रंग आहे म्हणजेच सुमारे ६५० एन.एम इतका असतो. त्यामुळे हा रंग दुरुनही ठळकपणे दिसून येतो. लाल रंगाच्या पाठोपाठ पिवळा रंगही तरंगलांबी असलेला आकर्षक रंग आहे. पण पिवळ्या रंगाची खासियत म्हणजे हा रंग अंधारातही सहज दृष्टीस पडतो. आता उदाहरणच द्यायचे झाले तर इतर रंगांच्या फुलांच्या तुलनेत पिवळ्या रंगाच्या फुलांचा गंध शोषण्यासाठी फुलपाखरे, भुंगे सर्वाधिक आकर्षित होतात. कारण ती फुलं कमी उजेडातही उठून दिसतात.

याच कारणामुळे जगभरातील बहुतांश शाळांच्या बसचा रंग पिवळाच असतो. या रंगामुळे ट्रॅफिकमध्येही स्कुल बस सहज उठून दिसते. तसेच पहाटे काहीसा अंधार आणि धुके असते, त्यावेळीही ही बस रस्त्यावर सहज नजरेस पडावी आणि अपघात टळावे याकरिताच सगळ्या स्कुल बसचा रंग पिवळा असतो.
0 Comments