आपले प्राण तळहातावर घेऊन, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज राहणाऱ्या प्रत्येक सैनिकामुळेच आपण मोकळेपणाने, निर्धास्त होऊन जगू शकतो. ते सीमेवर थंडी,ऊन, वारा, पाऊस कशाचीच तमा बाळगत नाही. वेळ आलीच तर भारत मातेच्या रक्षणासाठी ते आपले प्राण पणाला लावतात आणि देशासाठी प्राणार्पण करुन शहीद होतात. या शहीद जवानांचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे पांग फेडणे आपल्याला या जन्मी तरी शक्य नाही.

देशाच्या रक्षणासाठी कित्येक आयांची कूस रिती होते, कित्येकांना आपल्या पतीच्या बलिदानाची जखम आयुष्यभर अभिमानाने जपत जगावं लागतं, कित्येक लहानग्यांनी आपले पितृछत्र गमावावं लागतं. या शहीद जवानांच्या आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या शौर्याला सलाम करत, तिरंग्यासह सन्मानाने, शासकीय इतमामात त्यांचे अंतिम संस्कार केले जातात. हे अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे.
जेव्हा कुठला जवान शहीद होतो तेव्हा सेनेचे काही जवान, त्याचे पार्थिव कुटूंबियांपर्यंत पोहचवतात. ज्या तिरंग्याच्या सन्मानासाठी तो अंतिम श्वासापर्यंत लढला तोच तिरंगा सन्मानाने त्याच्या निष्प्राण पार्थिवावर लपेटला जातो.
यावेळी तिरंग्याबाबत काही नियमांचे पालन केले जाते. तिरंग्याची भगवी बाजू, ज्या बॉक्समध्ये शहीद जवानाचे पार्थिव ठेवले त्याच्या पुढील भागावर येईल अशाप्रकारे झेंडा लपेटला जातो. जेणेकरुन तो सरळच राहील.

शहीद जवानावर अंतिमसंस्कार करण्यापूर्वी लष्करी बॅंडच्या वतीने शोक संगीत वाजवून मानवंदना दिली जाते आणि जवानाला विशिष्ट पध्दतीने बंदूकीची सलामी देऊन श्रध्दांजली दिली जाते. यावेळी प्रत्येक सैनिकाच्या मनात द्वंद सुरु असतं. कालपर्यंत आपल्या सोबतचा आपला मित्र निधड्या छातीने शत्रुशी लढत होता आणि आज तो तिरंग्यामध्ये लपेटून भारतमातेच्या कुशीत कायमचा निजणार आहे. हे त्यांच्यासाठी सहन करणं खरंतर असह्य असतं पण काळजावर दगड ठेऊन अत्यंत अभिमानाने ते आपल्या दोस्ताला निरोप देतात.
त्यानंतर अंतिम संस्काराच्या वेळी पार्थिवाच्या पेटीवरुन तिरंगा काढला जातो. त्यानंतर अशोकचक्र बरोबर केंद्रस्थानी येईल अशाप्रकारे तिरंग्याची विशिष्ट पध्दतीने घडी घातली जाते आणि भारतमातेसाठी बलिदान देणाऱ्या त्या लेकराची अखेरची आठवण म्हणून तो तिरंगा सन्मानपूर्व शहीद जवानाच्या कुटूंबियांकडे सुपूर्त केला जातो.
भारतीय झेंडा संहिता 2002 च्या अनुसार, आपला राष्ट्रीय ध्वज फक्त सैनिक, राजकीय व्यक्तिंच्या शासकीय इतमामात होणाऱ्या अंतिमसंस्कारांसाठीच वापरण्यात येतो. तो त्या व्यक्तिचा सन्मान करण्यासाठीच वापरला जातो. या ध्वजाचा वापर इतर कुठल्याही बाबतीत करणे हा गुन्हा ठरतो.

ही प्रक्रिया तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिली असेलचं. ती पाहताना उर भरुन येतं. शहीद झालेल्या जवानांचे आपण कायम कृतज्ञ आहोत. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून तरी प्रत्येकाने किमान चांगला नागरिक होण्याचा प्रयत्न करावा.
‘सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो’ याची जाणीव कायम मनामध्ये असू द्यावी आणि कृतितूनही.
0 Comments