जगातल्या ५ मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा ४ था क्रमांक लागतो. रेल्वेने भारताला जोडून ठेवले आहे. खरंतर रेल्वे ही फक्त सेवा नाही तर खुप मोठी व्यवस्थाच आहे. प्रत्येक स्तरातील लोकांसाठी रेल्वेने प्रवास करणं सोईचं आहे. त्याचबरोबर विमानाच्या तुलनेत याचं तिकीट खिशाला परवडणारंही आहे. काही अपवाद वगळता रेल्वेने प्रवास न केलेला भारतीय सापडणं जरा कठीणच नाही का? रेल्वेने प्रवास करायचा म्हटल्यावर प्रत्येक प्रवासी तिकीट खरेदी करणं हे अनिवार्यच आहे. तेव्हा अपेक्षित स्थानकावर पोहचेपर्यंत तुम्हाला ते तिकीट सांभाळून ठेवावं लागतं. कारण तिकिटाशिवाय प्रवास करणं हा कायद्याने गुन्हा आहे. असे केल्यास तुम्हाला दंड भरावा लागतो.
त्यामुळे प्रवास पूर्ण होईपर्यंत तिकीट सांभाळून ठेवणं हे गरजेचं आहे. रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान किंवा स्टेशनबाहेर पडताना टिसी (तिकीट चेकर) तुमचे तिकीट तपासू शकतात. तुम्हाला माहीत आहे का, वरवर साधं दिसणारं तिकीट म्हणजे माहितीचा खजानाच आहे. तुमच्या तिकिटावर तारीख आणि गंत्यव ठिकाणाव्यतरिक्त अनेक आकडे लिहिलेले असतात. हे आकडे तुम्हाला भारतीय रेल्वेशी निगडीत असलेली बरीच माहिती देतात. भारी आहे की नाही? चला तर आम्ही या आकड्यांचे डिकोडींग करुन तुमच्या ज्ञानातही जरा भर घालतो.
भारतीय रेल्वे तिकिटावर ५ अंकी रेल्वे क्रमांक (ट्रेन नंबर) लिहिलेला असतो. तो क्रमांक म्हणजे तुम्ही ज्या रेल्वेने प्रवास करणार आहात किंवा केला आहात त्या रेल्वेची ओळख असते. थांबा जरा विस्तारुन सांगते.
हे क्रमांक ० ते ९ यांचं एक कॉम्बिनेशन असतं. त्यातला पहिला अंक असतो, खूप खास असतो. तो त्या गाडीबद्दल माहिती देतो. म्हणजे पहिला अंक जर शून्य असेल तर ती गाडी विशेष गाडी म्हणजेच स्पेशल ट्रेन असते. समर स्पेशल, हॉलीडे स्पेशल, गणपती स्पेशल किंवा इतर कारणांसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्या)
सगळ्यात आधी १ ते ४ क्रमांकाच्या मागे काय माहिती दडली आहे हे जाणून घेऊ.
तिकीटावर सगळ्यात आधी १ किंवा २ हा क्रमांक असेल तर त्याचा अर्थ संबंधित रेल्वे लांब पल्ल्याचा प्रवास करणारी असेल. उदा. राजधानी, शताब्दी, गरीब रथ, दूरांतो, जनसाधारण किंवा संपर्क क्रांती सारख्या लांबच्या प्रवासाच्या गाड्या.
या तिकीटावर ५ अंकी क्रमांकात ३ आकडा आधी आला तर समजून जा ती ट्रेन ही कोलकाता सब अर्बन ट्रेन आहे.
४ हा आकडा त्या ५ अंकी क्रमांकात अग्रस्थानी आला तर ती ट्रेन दिल्ली, चेन्नई सह अन्य मेट्रो सिटीमध्ये धावणारी ‘सब अर्बन ट्रेन’ आहे.
५ ते ९ या आकड्यांमागे दडलेली माहिती
1- जर पाच अंकी क्रमांकात पहिले डिजीट ५ असेल तर ती ‘सवारी गाडी’ असते.
2- जर पाच अंकी क्रमांकात पहिले डिजीट ६ असेल तर ती ‘मेमू ट्रेन’ आहे.
3- जर पाच अंकी क्रमांकात पहिले डिजीट ७ असेल तर ती ‘डेमू ट्रेन’ आहे.
4- जर पाच अंकी क्रमांकात पहिले डिजीट ८ असेल तर ती ट्रेन ‘आरक्षित ट्रेन’ आहे.
5- जर पाच अंकी क्रमांकात पहिले डिजीट ९ असेल तर ती ‘सब अर्बन ट्रेन’ आहे.
जर तुमच्या तिकीटावरचा क्रमांक ०, १, २ यापैकी कुठल्याही अंकाने सुरू होत असेल तर बाकीचे चार डिजिट हे ‘रेल्वे झोन’ आणि ‘डिव्हीजन’ कोणते ते दर्शवतात.
जर पहिले डिजीट हे ५,६ किंवा ७ पैकी असेल तर त्यानंतर येणारा दुसरा डिजिट झोन बद्दल माहिती देतो आणि उरलेले डिजीट डिव्हीजन कोडबद्दल माहिती दर्शवतात. पुढच्या डिजीटचे डिकोडींग करायचं झालं तर ते पुढीलप्रमाणे होईल :-
0- कोकण रेल्वे.
1- सेंट्रल रेल्वे, नॉर्थ सेंट्रल रेल्वे आणि वेस्ट-सेंट्रल रेल्वे.
2- ‘सुपरफ़ास्ट’, ‘शताब्दी’ आणि ‘जन शताब्दी’
3- ईस्टर्न रेल्वे आणि ईस्ट सेंट्रल रेल्वे.
4- नॉर्थ सेंट्रल रेल्वे, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे आणि नॉर्थ रेल्वे.
5- नॅशनल ईस्टर्न रेल्वे, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे.
6- साउथर्न रेल्वे आणि साउथर्न वेस्टर्न रेल्वे.
7- साउथर्न सेंट्रल रेल्वे आणि साउथर्न वेस्टर्न रेल्वे.
8- साउथर्न ईस्टर्न रेल्वे आणि ईस्ट कोस्टल रेल्वे.
9- वेस्टर्न रेल्वे, नार्थ वेस्टर्न रेल्वे आणि वेस्टर्न सेंट्रल रेल्वे.
डोक्यालिटी आहे राव! ५ अंकी क्रमांक दिसायला सोपा असला तरी समजायला डोक्याचा भुगा करणारा वाटतो नाही? पण किती भारी लॉजिक आहे हे. कमी जागेत किती जास्त माहिती मिळते. नाहीतर ही सगळी माहिती शब्दात तिकीटावर छापली असती तर तिकीटाचा आकार साधारण ए फोर साईज तरी करावा लागला असता नाही?
0 Comments