आजकाल इंटरनेटवर सगळी उत्तरं मिळतात पण काहीवेळा असं होतं की एकाच प्रश्नाची वेगवेगवेळी उत्तरंही तुम्हाला इथं सापडतात. आणि मग नेमकं खरं उत्तर कोणतं हा नवीन प्रश्न पडून डोक्याची पार मंडई होते. आपल्या दैनंदिन जीवनातल्या एका वस्तुबद्दल असाच एक प्रश्न इंटरनेटवर वारंवार विचारला गेला आहे. पण त्याची निरनिराळी उत्तरं इथे सापडतात. म्हणूनच तुमचं कंन्फुजन दूर करण्याचं आम्ही ठरवलं.
आपण रोज टुथपेस्ट वापरतो तेव्हा त्याच्या ट्युबवर खाली रंगीत लाल, हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात. त्यालाच कलर कोड असंही म्हणतात. तर या कलर कोडमागचा नेमका अर्थ काय आहे. हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काही लोकांचं म्हणणं आहे की या कलर कोडमुळे टुथपेस्टमध्ये कोणती सामग्री वापली आहे हे आपल्याला कळतं. उदाहरणच द्यायचं झालं तर टुथपेस्ट ट्युबच्या तळाशी हिरवा रंगाची पट्टी असेल तर त्यात म्हणे नैसर्गिक सामग्रींचाच वापर केला जातो. निळी पट्टी असल्यास त्यात नैसर्गिक सामग्रींसोबत काही केमिकल वापरले आहेत. तर लाल पट्टी म्हणजे संबंधित टुथ पेस्ट फक्त आणि फक्त वेगवेगळी केमिकल टाकून बनवली आहे.
तुम्ही आताही गुगल गुरुजींना जाऊन विचारा, तुम्हाला बऱ्यापैकी अशीच उत्तरं मिळतील. आणि कधीही चुकीचं मार्गदर्शन न करणारे गुरुजी यावेळी तुमची दिशाभूल करतील. काही चाणाक्ष ग्राहकांची यामुळे दिशाभूल झाली सुध्दा.
टुथपेस्टच नाही तर प्रत्येक खाद्य पदार्थाच्या पॅकिंगवरचं कलर कोड पाहून ही मंडळी प्रोडक्ट निवडू लागली. अर्थातच सगळ्यात जास्त प्राधान्य हिरव्या रंगाला मिळालं. तुम्हाला म्हणून सांगते, लावणाऱ्याने लॉजिक चांगलं लावलंय मात्र यात काही म्हणजे काहीच तथ्य नाहीये बरं. हो म्हणजे गुगल गुरुजींनी दिलेली ही उत्तर साफ चुकीची आणि खोटी आहेत. अधुनिक जमान्यातली ही अंधश्रध्दाच हो.
आता तुमची उत्सुकता जास्त न ताणता उत्तर देतेच. टूथपेस्ट बनवणाऱ्या कोलगेटच्या म्हणण्यानुसार, हे कलर कोड पॅकेजिंगशी संबंधित असतात. त्यांचा आणि टुथपेस्टमधल्या घटकांचा दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाही.
वास्तविक, हे रंग कोड लेसर लाईट सेन्सरला सांगतात की इथून पॅकेजिंग कापायचे किंवा वेगळे करायचे. अशाप्रकारे, मशीन तिथून ट्युब कापते आणि सील करते.
टुथपेस्टवर बारिकश्या रंगीत पट्ट्या म्हणजेच कलर कोड मागचं कोडं आता सुटलं की नाही. आता यापुढे टुथपेस्टमध्ये नेमकी काय सामग्री वापरली आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचंच असेल तर मग टयुबवर लिहलेली सामग्री सूची वाचा. आणि मगच ठरवा कोणती टुथपेस्ट घ्यायची ती.
पट्टी पाहून आतमध्ये काय आहे याचा अंदाज बांधणं ही सपशेल चूक ठरेल हो. आता चला पटापट हा लेख तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा आणि त्यांचेही अज्ञान दूर करा.
0 Comments