आपला देशात असंख्य संस्कृती आणि परंपरा पहावयास मिळतात. इथे प्रत्येक घाटाच्या वळणावर भाषा बदलते. त्याचप्रमाणे इथे पूर्वापार अनेक रुढी परंपराही लोकं पाळतं आले आहेत. काही परंपरांना नक्कीच शास्त्रीय आधार आहे, मात्र काही परंपरा अगदीच विचित्र वाटतात. पण तरिही लोक या प्राचीन रुढींचं किंवा मान्यतेचं मनापासून पालन करतात. आजही तुम्हाला आम्ही अशाच अजब मीनाराची गोष्ट सांगणार आहोत. या मीनारावर बहिण भाऊ एकत्र चढू शकत नाही. म्हणजे त्यांना चढूच देत नाही… का बरं असं करत असावेत, यामागची कहाणी काय? हेच जाणून घेऊया.
उत्तर प्रदेशातले ‘लंका मीनार’ हे नाव तुम्ही सुद्धा ऐकलंच असेल. उत्तर प्रदेशातील जलौन जिल्ह्यात लंका मीनार आहे. हे मीनार संपूर्णतः रावणाला समर्पित केलं आहे. लंका मीनाराच्या आत लंकापती रावण आणि त्याच्या कुटुंबियांची चित्र आणि शिल्प पाहायला मिळतात. खरं तर हे मीनार फार उंच नाही. तरिही देखणं आहे. हजारो पर्यटक हे मीनार पहाण्यासाठी येतात.
आता तुम्ही म्हणाल उत्तर प्रदेशात रावणाला समर्पित असे मीनार का आणि कोणी बनवलं? तर या मीनारामागची कथा अशी आहे. साधारणतः १८५७ चा काळ होता. मथुरेत तेव्हापासून रामलीला सादर करण्याची परंपरा जी सुरु झाली ती आजही चालू आहे. तर तर तेव्हा रामलीला मध्ये मथुरा प्रसाद नावाचे कलाकार रामलीलेचे आयोजन करायचे आणि रावणाची भूमिका ते स्वतः वठवायचे.
अनेक वर्ष भूमिका साकारत असलेले मथुरा प्रसाद अगदी रावणमय झाले. त्यांच्या डोक्यात सतत रावणाचेच विचार यायचे. जणू रावणाने त्यांना झपाटले असावे. आणि म्हणूनच मथुरा प्रसाद यांनी हे मीनार बांधले आणि त्यामध्ये रावणासंबंधी चित्र रेखाटली आणि शिल्प साकारली. जणू काही लंकाच त्यांना या मीनारामध्ये रेखाटायची होती. तर अशा भूमिकेने झपाटलेल्या कलाकाराने लंका मीनार उभारले.
इथल्या स्थानिकांच्या मते हा मीनार बनवायला तब्बल २० वर्ष लागली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आतील रचना बनविण्यासाठी शिंपले, उडीद डाळ आणि शेणाचा वापर करण्यात आला होता. त्या अवलीयाने हे मीनार बनविण्यासाठी तब्बल १ लाख ७५ हजार खर्च केले होते.
या मीनारात रावणाचे भाऊ कुंभकरण आणि मेघनाथ यांच्याही मोठाल्या मुर्ती पहायला मिळतील. कुंभकरणाची मुर्ती १०० फुटांची आहे तर मेघनाथाची मुर्ती ६५ फुट उंच आहे. त्याच बरोबर चित्रगुप्त आणि रावणाचे श्रध्दास्थान असलेल्या शीव शंभोंची मुर्तीही इथे आहे. इथले अजून एक आकर्षण म्हणजे इथे १८० फुट लांब असे नागाचे शिल्प साकारले आहे. हे नागाचे शिल्प मीनाराच्या नागीण दरवाज्यावर बघायला मिळतं. नागपंचमीला इथे भव्य सोहळ्याचे आयोजनही केले जाते.
.
ही झाली या मीनाराची माहिती. पण मग इतक्या सुंदर मीनारावर बहिण-भाऊ एकत्र का जात नाहीत? या मीनारावर जाण्यासाठी ७ प्रदक्षिणा घालाव्या लागतात. तुम्हाला सात फेऱ्यांचं महत्त्व माहीत आहेच. तर बहिण –भाऊ एकत्र या सात प्रदक्षिणा घेऊ शकत नाहीत. म्हणूनच इथले गावातले लोक बहिण-भावांना या मीनारावर एकत्र पाठवत नसत.
अर्थात ही फक्त अंधश्रध्दा आहे. पण इथले स्थानिक पिढ्यांपिढ्या याचं पालन करतायत.
0 Comments